Vidhan Sabha 2019 : आघाडीचाही मित्रपक्षांना ठेंगा

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 10 October 2019

निवडणूक प्रशिक्षणाने शिक्षक बेजार
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिक्षकांना निवडणूक कामकाजाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. आतापर्यंत शिक्षकांना हक्काच्या तीन सुट्ट्यांना मुकावे लागले आहे. तसेच पुढील रविवारी प्रशिक्षण आणि मतदानाचा दिवसही निवडणूक कामात जाणार असल्याने शिक्षकांना हक्काच्या सुट्टीच्या बदल्यात आठवडाभराची सुट्टी देण्याची मागणी शिक्षकांकडून निवडणूक आयोगाकडे करण्यात येत आहे. बुधवारी (ता. ९) शिक्षकांसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आल्याने त्याचा फटका अनेक शाळांतील परीक्षांना बसला. अनुदानित शाळांतील अनेक शाळांनी उपलब्ध कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून परीक्षा घेतल्या. मात्र, अनेक शाळांनी परीक्षा लांबणीवर टाकल्या आहेत.

राज्यात ३८ जागांचे आश्‍वासन हवेतच
मुंबई - विधानसभेसाठी महायुतीच्या जागावाटपात घटकपक्षांची भाजपने परवड केल्यानंतर काँग्रेस आघाडीनेही मित्रपक्षांना ३८ जागा सोडण्याचे जाहीर करत प्रत्यक्षात त्यांना ठेंगा दाखवला आहे. दोन्ही काँग्रेसने शेतकरी कामगार पक्षासह जनता दल, कम्युनिस्ट पक्षाला वाऱ्यावर सोडल्याने शिवसेना- भाजप महायुतीच्या विरोधात महाआघाडी उभी करण्याच्या प्रयत्नांना आघाडीकडूनच खीळ बसली आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी १२५ आणि घटक पक्ष ३८ जागा लढणार असल्याची घोषणा ‘राष्ट्रवादी’चे सर्वेसर्वा शरद पवार यांनीच केली होती. मात्र, प्रत्यक्षात उमेदवारी जाहीर करताना दोन्ही काँग्रेसचा उडालेला गोंधळ आणि ‘एबी’ अर्जाच्या घोळामुळे घटक पक्षांच्या वाट्याला समाधानकारक जागा आल्या नाहीत, त्यामुळे छोटे पक्ष दोन्ही काँग्रेसवर नाराज आहेत. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाने दोन्ही काँग्रेसकडे १० ते १२ जागा मागितल्या होत्या. त्यापैकी प्रत्यक्षात शिराळा, मिरज, वरूड-मोर्शी अशा तीन जागा शेट्टी यांना देण्यात आल्या आहेत.

नंदुरबार आणि खामगाव या जागा ‘स्वाभिमानी’ला सोडल्या होत्या; परंतु काँग्रेसने या दोन्ही ठिकाणी स्वतंत्र उमेदवार दिले आहेत. काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन समाजवादी पक्षाला तीन जागा सोडणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, प्रत्यक्षात सपच्या पदरात दोन जागा पडल्या आहेत. 

शेतकरी कामगार पक्षाने सांगोल्यासह रायगड जिल्ह्यातील काही जागा सोडण्याची मागणी केली होती; परंतु ‘राष्ट्रवादी’ने सुरवातीला सांगोल्यात दीपक साळुंखे यांना उमेदवारी दिली, नंतर ती मागे घेण्यात आली. पेण, अलिबाग, महाडमध्ये काँग्रेसने; तर कर्जत, श्रीवर्धनमध्ये ‘राष्ट्रवादी’ने उमेदवार उभे केले आहेत. जनता दलाने (धर्मनिरपेक्ष) कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडची एकमेव जागा मागितली होती; परंतु ती जागाही न सोडल्याने जनता दलाने लोहा, मालाड, परांडा, मिरज, खानापूर आणि जत या जागा स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. विधान परिषद सदस्य कपिल पाटील यांनी आघाडीकडे गोरेगावची जागा मागितली होती, मात्र ती नाकारण्यात आली. दोन्ही कम्युनिस्ट पक्षांना आघाडीने वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra vidhansabha 2019 aghadi other party politics