Vidhan Sabha 2019 : ‘विकासाचे स्वप्न प्रत्यक्षात आणले’ - देवेंद्र फडणवीस

Devendra-Fadnavis
Devendra-Fadnavis

विधानसभा 2019 : जनतेचे जीवनमान उंचावत अगदी शेवटच्या माणसाच्या जगण्यात परिवर्तन करणारे निर्णय आम्ही राबवतोय. त्यामुळेच महाराष्ट्राच्या शाश्‍वत सिंचनाची, एक कोटी युवकांना रोजगाराची, मालकीहक्‍काच्या घरात पेयजल पोचवण्याची हमी देणाऱ्या भाजप-शिवसेना महायुती सरकारला महाराष्ट्र पुन्हा एकदा दोनतृतीयांश जागांचा कौल देईल, असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘सकाळ’च्या प्रतिनिधी मृणालिनी नानिवडेकर यांच्याशी बोलताना व्यक्‍त केला. या मुलाखतीचा हा अंश...

प्रश्‍न : महाराष्ट्रात दोन तृतीयांश जागा जिंकू, हा दावा आपण कोणत्या बळावर करताय? 
फडणवीस :
महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्याला मी भेटी दिल्या आहेत. त्या दौऱ्यात जनतेच्या मनात आमच्याबद्दल असलेला विश्‍वास स्पष्ट जाणवतो. या वेळी आमची सभागृहातील संख्या अभूतपूर्व असेल. कोट्यवधी शौचालये उभारणाऱ्या, ८ कोटी गॅस जोडण्या झोपड्यात पोचवणाऱ्या आमच्या योजना घराघरांत लोकप्रिय आहेत. जनतेच्या आशा-आकांक्षांशी नाते सांगणाऱ्या भाजपलाच जनता निवडून देईल, हे प्रचारात प्रत्येक गावागावात जाणवते आहे. पाच वर्षांपूर्वी आम्ही जलयुक्‍त शिवाराचे स्वप्न दाखवले, ते प्रत्यक्षात आणले. यावर्षीच्या दमदार पावसाने या योजनेतील अनेक बंधारे भरलेत. आमच्या कामगिरीबाबत समाधानाचे शब्द ऐकायला मिळताहेत.

प्रश्‍न : आर्थिक धोरणांबद्दल जनतेच्या मनात रोष आहे. त्यामुळे ‘शायनिंग इंडिया’प्रमाणे या वेळी भाजपचा पराभव होईल, अपक्षांचे पीक येईल, असे म्हणतात?
फडणवीस :
दुसऱ्या प्रश्‍नाचे उत्तर मी आधी देतो. या वेळी बंडखोर बरेच आहेत, हे मान्य. ते आमच्या आणि शिवसेनेच्या दोघांच्याही मतदारसंघात त्रासदायक ठरताहेत, असे चित्र असले तरी प्रत्यक्षात नागरिकांचा कल चिन्हावर बटण दाबण्याकडे आहे. आर्थिक मंदी म्हणजे विकासदर उणे होणे. तसे काहीही झालेले नाही. ५.८ टक्‍के हा विकासदर मंदीचा नाही, तो काहीसा कमी आहे, हे मान्य; पण आमच्या सरकारनेच नव्हे; तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही ७ टक्‍के दराचा अंदाज व्यक्‍त केलाय. शंभर लाख कोटी रुपयांची गुंतवणूक पायाभूत सुविधांमध्ये होते आहे. लाखो रोजगार निर्माण होतील. परदेशातून गुंतवणूक येतेय. महाराष्ट्र गेली काही वर्षे गुंतवणुकीत मागे होता. पार चौथ्या क्रमांकावर गेला होता. तो गेल्या चार वर्षांत पहिल्या क्रमांकावर आलाय. महाराष्ट्राची क्रयशक्‍तीही मोठी आहे. त्यामुळे जनतेच्या मनात रोष नाही. 

प्रश्‍न : भाजपचे दृष्टिपत्र एक कोटी नोकऱ्यांचे आश्‍वासन देतेय. या नोकऱ्या कशा निर्माण होतील की, चुनावी जुमला आहे? 
फडणवीस :
जुमला नव्हे, ही महाराष्ट्रातील तरुणाईला भाजपने दिलेली हमी आहे. पाच वर्षांत आम्ही ५९ लाख रोजगार निर्माण केलेत. ते मुख्यत्वे छोट्या आणि मध्यम उद्योगातले होते. त्यामुळे एक कोटी रोजगार कसे निर्माण होतील, याचे सविस्तर विश्‍लेषण आम्ही देऊच. 

प्रश्‍न : नदी जोड प्रकल्पाबाबतचा भाजप सरकारचा अनुभव चांगला नाही. आपण नदीजोड प्रकल्पाचे जे चित्र दाखवताय, ते प्रत्यक्षात येऊ शकेल काय? 
फडणवीस :
दमणगंगा, नारपार, तापी मेगा रिचार्ज, कृष्णा-भीमा स्थिरीकरण अशा कितीतरी योजना प्रत्यक्षात येताहेत. सांगली, कोल्हापूर परिसराला पुराचा त्रास होतो. हे आपल्या हक्‍काचे पाणी आहे. ते अडवण्याची योजना हाती घेतोय. खरे तर महाराष्ट्रात जलआराखडाच नव्हता. तो आता तयार आहे. त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. 

प्रश्‍न : महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या थांबल्या नाहीत. दोन दिवसांपूर्वी तर भाजपचा शर्ट घालून तरुण शेतकऱ्याने स्वत:ला टांगून घेतले होते? 
फडणवीस :
तो शेतकरी घरगुती वादातून विषण्ण झाला होता. दुर्दैवी घटना आहे. त्याच्या पत्नीच्या जबाबातूनच हे तथ्य समोर आलंय. आत्महत्यांचे मुख्य कारण हे सिंचनसोयींचा अभाव आहे. ज्या भागात सिंचन सोयी आहेत, तेथे आत्महत्या होत नाहीत. त्यामुळे सिंचनक्षमता वाढवण्यावर भर आहे. 

प्रश्‍न : शिवसेनेच्या वचननाम्यात १० रुपयांत जेवण नमूद केले आहे. झुणका भाकरसारख्या योजनेच्या माध्यमातून युती सरकारच्या काळात जागा लाटण्याचा प्रकार झाला. या वेळीही तसेच होईल काय? 
फडणवीस :
माझे शिवसेनेशी या वचनाबाबत बोलणे झालेले नाही. त्यामुळे तपशील माहीत नाही. मतदान झाल्यावर आम्ही भेटू, निवडून आल्यावर समान मुद्दे समोर ठेवून वचननामा राबवू.

प्रश्‍न : शिवसेनेशी युतीची काय गरज होती? ते मेट्रोसारख्या प्रकल्पांना विरोध करतात. ‘नाणार’ही त्यांनी पळवून लावले?
फडणवीस :
शिवसेना आमचे वैचारिक सहप्रवासी आहेत. आम्ही सरकार पाच वर्षे समवेत चालवले, त्यामुळे आम्ही निवडणुका एकत्र लढवतोय. दोन पक्ष असल्याने आमचे मतभेद काही बाबतीत होतात, पण आता त्याची सवय झाली आहे. ‘नाणार’चे म्हणाल, तर रिफायनरी होणार! जिथे जनतेचे त्याबाबत बहुमत आहे, तेथे हा प्रकल्प होईल. या स्थळाची घोषणा आम्ही महिन्यातच करू. हे ठिकाण रायगड जिल्ह्यातले असू शकेल.

प्रश्‍न : मुख्यमंत्री आमचा आणि उपमुख्यमंत्रीही आम्हीच ठरवू, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा म्हणालेत. शिवसेनेला असे गृहित धरणे चालेल? 
फडणवीस :
अमितभाई म्हणाले आहेत की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील. शिवाय ते महाराष्ट्रातील परिस्थिती लक्षात घेऊन उपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेतील. लोकसभा निवडणूक निकालानंतर आम्ही शिवसेनेने उपमुख्यमंत्रिपद स्वीकारावे, असा प्रस्ताव ठेवला होता. आता विधानसभेच्या निकालांनंतर आदित्य ठाकरेंनी मंत्री की, उपमुख्यमंत्री व्हायचे हे ठरवायचे आहे. तो त्यांच्या पक्षाचा निर्णय असेल. आम्हाला त्यांचे स्वागत करायला आवडेल.

प्रश्‍न : आपण दिल्लीत जाणार लवकरच, असे म्हणतात...
फडणवीस :
मी मुंबईत मुख्यमंत्री व्हायचे की नागपूरला घरी जाऊन बसायचे, याचा निर्णय माझा पक्ष घेत असतो. आज एवढेच सांगतो, मी करत असलेले काम महाराष्ट्राच्या हिताचे आहे, असे पक्षाला वाटते आहे. म्हणून ती जबाबदारी मला पुन्हा सोपवण्याचा निर्णय झाला आहे. 

प्रश्‍न : मेट्रोला विरोधाचा मुद्दा राहिलाच; रात्रीत झाडे तोडणे आवश्‍यक होते काय? 
फडणवीस :
सांगतो ना! आरेत कारशेड बांधावे की, कांजूरला यावर न्यायालयाने निर्णय दिलाय. कांजूरच्या जागेसाठी ५४०० कोटी खर्च आला असता. शिवाय ती जागा हाती यायला कित्येक वर्षे लागली असती. आज झाडे कापली याचे दु:ख आहेच; पण मेट्रो उभी झाल्यावर इंधनाची जी बचत होईल, त्यामुळे होणारे उत्सर्जन कितीतरी पटीने घटेल. जो खर्च वाचणार त्याचेही महत्त्व आहेच. आम्ही या विषयावर शिवसेनेशी चर्चा करू. 

प्रश्‍न : इतके अनुकूल वातावरण आहे, तर बाहेरचे नेते पक्षात का घेतले? प्रचाराला पंतप्रधान का आले? 
फडणवीस :
शक्‍तिसंचय केला नाही तर शक्‍तिपात होतो. अनेकांना खरे तर बहुतेक सगळ्याच नेत्यांना आमच्याकडे यायचे होते. आम्ही योग्य वाटले त्यांना घेतले. पंतप्रधानांचे म्हणाल, तर मोदीजींनी यानिमित्ताने महाराष्ट्रात यावे, जनतेशी संवाद साधावा असे वाटते. संवाद साधण्याची संधी निवडणुकीनिमित्त उपलब्ध होते.

प्रश्‍न : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गावोगाव प्रचार करीत आहेत. ते विरुद्ध तुम्ही असे चित्र निर्माण झाले आहे. त्यांना ‘ईडी’च्या कारवाईचे लक्ष्य करण्याचे कारण काय? भाजप ‘ईडी’चा वापर करीत आहे, यंत्रणा हातात घेतल्या जात आहेत. 
फडणवीस :
पवारसाहेब महाराष्ट्रात ठिकठिकाणी जात आहेत हे खरे. त्यांच्या पक्षात हे काम करू शकणारा कोणी सक्षम नेता का नाही, हा प्रश्‍न आहे. पवारांनी त्यांच्या काळात रूढ केलेला फसवणुकीचा पॅटर्न जनतेला आता मान्य नाही. त्यांच्या पक्षाला या वेळी नाकारले जाईल. नेतृत्व करणारा कुणी नेता काँग्रेसकडे नाही. त्यामुळे सतत प्रचारात असणारे पवारसाहेब यांच्याशी माझी तुलना होत असावी. संभाव्य पराभव अनेक वेळा चिडचिडा करतो. त्यामुळे ते चिडत असावेत. सद्‌सद्विवेकबुद्धी संपते. जिंकणाऱ्या पक्षाने तसे करून चालत नाही. ‘ईडी’बद्दल बोलायचे तर ती स्वतंत्र तपासयंत्रणा आहे. राज्य सहकारी बॅंकेची तक्रार, ही पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळातील आहे. त्यावर न्यायालयाच्या निर्देशामुळे ‘एफआयआर’ नोंदवला गेला. आमच्या हस्तक्षेपाचा प्रश्‍न येतोच कुठे? पवारसाहेबांचे नाव कसे आले, हा मलाही पडणारा प्रश्‍न आहे; पण मला जी काय माहिती मिळाली त्यानुसार, ज्या साखर कारखान्यांची जमीनविक्री संशयाचा विषय झाली, त्यांनी पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण प्रकल्प राबवतो आहोत, असे ठराव केले असल्याने त्यांचे नाव तपासात आल्याचे समजते. याविषयाची एवढीच माहिती आहे. 

प्रश्‍न : प्रफुल्ल पटेल यांच्यावरही ‘ईडी’ने कारवाई सुरू केली आहे. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी ते निष्पाप असतील, असे नमूद केले आहे.
फडणवीस :
डॉ. मनमोहनसिंग यांनी मुंबई बाँबस्फोटाशी संबंधित अंडरवर्ल्डच्या माणसाच्या कुटुंबाशी व्यवहार करणे म्हणजे केवळ कायदेशीर नव्हे तर नैतिक गुन्हा आहे, हे समजून घ्यावे. 

प्रश्‍न : आरक्षणामुळे सेव्ह मेरीटचे आंदोलन सुरू झाले? 
फडणवीस :
खुल्या प्रवर्गाला आरक्षण निर्णयापूर्वी होत्या तितक्‍याच जागा तयार होत आहेत.

प्रश्‍न : शिवसेनेने राणेंबाबत आपल्याला सल्ला दिला आहे. 
फडणवीस :
खरे तर बराच काळ लोटला आहे. त्यामुळे शिवसेनेने आणि नारायण राणेंनी जुने काय झाले ते विसरावे. यासंबंधात वेळ पडल्यास मी मध्यस्थी करण्यास तयार आहे. 

प्रश्‍न : काही दिग्गज भाजपनेत्यांची तिकिटे कापली गेली? 
फडणवीस :
हो. हे निर्णय पक्षाच्या केंद्रीय संसदीय समितीचे आहेत. मी त्या समितीचा सदस्य नाही. या दिग्गजांना उमेदवारी द्यावी, अशी शिफारस मी आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केली होती. पक्षश्रेष्ठींचे मत वेगळे होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com