Vidhan Sabha 2019 : काँग्रेसचा विक्रम महायुती तोडणार - जावडेकर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

पवारांना स्वतःचाच पक्ष सांभाळणे अवघड
एकेकाळी शरद पवार स्वतःच्या पक्षासोबत इतरही पक्ष चालवायचे. पण, काँग्रेसच्या वैचारिक दिवाळखोरीमुळे आज त्यांना स्वतःचाच पक्ष चालविणे अवघड होऊन बसले आहे. ‘आता तेही थकले आणि आम्हीही थकलो,’ असे माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे नुकतेच म्हणाले. त्यामुळे राज्यात आज त्यांची स्थिती दयनीय झाली असल्याचे मत जावडेकर यांनी व्यक्त केले.

विधानसभा 2019 : नागपूर - एकेकाळी काँग्रेसने महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत २२१ जागांवर विजय मिळविला होता. या वेळी महायुती काँग्रेसचा हा विक्रम तोडणार असून, एक नवीन इतिहास कायम करणार आहे. कारण, कलम ३७० रद्द केल्यामुळे जगभर भारताचे माहात्म्य वाढले आहे. ‘देशात नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र’ हा नारा जनतेत कमालीचा ‘क्‍लिक’ झाला असल्याचे केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज सांगितले.

महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ नागपुरात आले असताना पत्रकार परिषदेत ते बोलत होते. एअर इंडिया डबघाईस आणण्यास माजी मंत्री प्रफुल्ल पटेल कारणीभूत असल्याचा आरोप जावडेकरांनी केला. १८ हजार कोटींच्या कंपनीला क्षमता नसताना ६० हजार कोटींचा सौदा करायला लावला. इंडिगो आणि जेटसारख्या कंपन्यांची विमाने २० तास काम करायची, तेथे एअर इंडियाची विमाने केवळ नऊ तासच काम करायची. त्यामुळे एअर इंडियाची स्थिती बिघडली, असे ते म्हणाले.

सावरकरांना विरोध का?
स्वातंत्र्यवीर सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्यासाठी काँग्रेसचे नेते विरोध करीत आहेत. पण, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सावरकरांचे टपाल तिकीट काढले होते, हे काँग्रेसजन का विसरतात? एनआरसी करार राजीव गांधींनीच केला होता, हे काँग्रेसजन का विसरतात? असे सवाल जावडेकर यांनी केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra Vidhansabha 2019 Congress record mahayuti prakash javdekar politics