Vidhan Sabha 2019 : अकरा आमदारांना ‘नोटा’ पावला

NOta
NOta

विजयाच्या फरकापेक्षा अधिक पसंती
नाशिक - अनेक राजकीय नेत्यांनी वारंवार आवाहन करूनदेखील यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी कोणताही उमेदवार पसंत नसल्यानंतर दाबावयाच्या ‘नोटा’च्या बटनाचा अधिक वापर केला. कमी फरकाने निवडून आलेल्या ३७ आमदारांपैकी किमान अकरा जागांवर ‘नोटा’ला मिळालेली मते विजयी उमेदवाराच्या मताधिक्‍यापेक्षा अधिक आहेत, तर त्याशिवाय आणखी तितक्‍याच विधानसभा मतदारसंघांमधील ‘नोटा’चे प्रमाण अभ्यासकांना विस्मयचकित करणारे आहे.

केवळ राजकीय नेतेच नव्हे, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनीही मतदारांना आवाहन केले होते की, ‘नोटा’ला पसंती देऊन मत वाया घालवू नये. तरीदेखील विदर्भ आणि मुंबई-ठाणे या टापूत मतदारांनी ‘नोटा’ला पसंती दिल्याने महाराष्ट्र विधानसभेच्या चौदाव्या निवडणुकीत १.३५ टक्‍के म्हणजे ७ लाख ४२ हजार १३४ मते ‘कोणीही पसंत नाही’ या पर्यायाला मिळाली. ही मते प्रत्येकी दोन आमदार निवडून आणणारी ‘एमआयएम’ व समाजवादी पार्टी या प्रमुख राजकीय पक्षांबरोबरच ज्यांना एकही जागा जिंकता आली नाही असे आम आदमी पक्ष, फॉरवर्ड ब्लॉक, बहुजन समाज पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष, मुस्लिम लीग, जनता दल सेक्‍युलर यांना मिळालेल्या मतांपेक्षा अधिक आहेत.

स्व. विलासराव देशमुख यांचे चिरंजीव धीरज देशमुख यांना निवडून देणारा लातूर ग्रामीण आणि स्व. पतंगराव कदम यांचे चिरंजीव विश्‍वजित कदम यांना आमदारकी देणारा पलूस-कडेगाव या मतदारसंघांत अनुक्रमे २७ हजार ५०० व २० हजार ६३१ अशी दुसऱ्या क्रमांकाची मते ‘नोटा’ला मिळाली.

तितकी चर्चा पनवेलमधील १२ हजार ३९९, जोगेश्‍वरीमधील १२ हजार ३१ किंवा बोरिवलीतल्या दहा हजार मतांची झाली नाही. युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांना विजयश्री देणाऱ्या वरळीत जवळपास पाच टक्‍के (६,३०५) मते ‘नोटा’ला पडली. राजू पाटील यांच्या रूपाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एकमेव विजय देणाऱ्या कल्याण ग्रामीणमध्येही सहा हजारांपेक्षा अधिक मते ‘नोटा’ला मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पश्‍चिम नागपूर मतदारसंघातही तीन हजारांपेक्षा अधिक मते ‘नोटा’ला मिळाली.

‘नोटा’चा प्रभाव
राज्यातील अकरा विधानसभा मतदारसंघांचा निकाल ‘नोटा’चा विचार करता लक्ष्यवेधी आहे. या ठिकाणी विजयी उमेदवाराचे मताधिक्‍य ‘नोटा’ला मिळालेल्या मतांपेक्षा कमी आहे.

    काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष के. सी. पाडवी अक्‍कलकुआ मतदारसंघातून अवघ्या २०९६ मतांनी विजयी झाले. तिथे ४८५७ मतदारांनी ‘नोटा’ बटन दाबले.

    पाचव्यांदा निवडून येणारे माजी राज्यमंत्री गोवर्धन शर्मा अकोला पश्‍चिम मतदारसंघातून २५९३ मतांनी विजयी झाले. तिथे ‘नोटा’ला २६१७ मते मिळाली.

    अर्जुनी मोरगाव मतदारसंघात ‘नोटा’ला २०५४ ‘मते’ मिळाली, तर राष्ट्रवादीचे मनोहर चंद्रिकापुरे यांनी माजी मंत्री राजकुमार बडोले यांचा ७१८ मतांनी पराभव केला.

    माकपला डहाणू ही एकमेव जागा यंदा जिंकता आली. पण, विजयी विनोद निकोले ४७०७ मतांनी विजयी होत असताना ‘नोटा’चा वापर ४८२४ जणांनी केला.

    बोईसरमध्ये बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील यांनी शिवसेना नेते विलास तरे यांचा २७५२ मतांनी पराभव केला, तर ‘नोटा’ला ४६२२ ‘मते’ पडली.

    समाजवादी पक्षाचे रईस शेख यांनी भिवंडी पूर्व मतदारसंघात शिवसेनेचे रूपेश म्हात्रे यांचा अवघ्या १३१४ मतांनी पराभव केला. तिथे ‘नोटा’ला मिळालेल्या मतांची संख्या १३५८. 

    उल्हासनगरमध्ये गेल्या वेळी निसटत्या मताधिक्‍याने विजयी झालेल्या राष्ट्रवादीच्या ज्योती कलानी यांचा या वेळी भाजपचे कुमार आयलानी यांनी २००४ मतांनी पराभव केला. ‘नोटा’ला दुपटीहून अधिक ४९७८ मते मिळाली.

    चांदिवलीत शिवसेनेचे दिलीप लांडे यांनी काँग्रेसचे नसीम खान यांचा अवघ्या ४०९ मतांनी पराभव केला. यंदाच्या निवडणुकीतले हे सर्वांत कमी मताधिक्‍य आहे. याच जागेवर ३३६० मतदारांनी ‘नोटा’ला पसंती दिली.

    दौंडमध्ये भाजपच्या चिन्हावर लढणारे रासपचे राहुल कुल यांनी राष्ट्रवादीचे रमेश थोरात यांचा ७४६ मतांनी पराभव केला, तर ‘नोटा’ला ९१७ मते मिळाली.

    खडकवासला मतदारसंघात भाजपचे भीमराव तापकीर २५९५ मतांनी विजयी झाले, तर ‘नोटा’चा वापर ३५६१ जणांनी केला.

    कोपरगावात नोटाला मिळाली १६२२ ‘मते’, तर राष्ट्रवादीचे आशुतोष काळे यांनी भाजपच्या स्नेहलता कोल्हे यांच्यावर ८२२ मतांनी विजय मिळविला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com