Vidhansabha 2019 : मराठवाडा : आक्रमक युतीचे आघाडीपुढे आव्हान

Marathwada
Marathwada

विधानसभा 2019 : लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या दणदणीत यशामुळे बॅकफूटवर गेलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांना मराठवाड्यात गेल्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या जागा टिकविण्याचे आव्हान आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आक्रमक महाजनादेश यात्रेला मिळालेला प्रतिसाद, शिवसेनेकडून युवानेते आदित्य ठाकरे यांनी काढलेल्या जनआशीर्वाद यात्रेच्या प्रभावामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चलबिचल दिसली. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर पक्षांतरही झाले. काँग्रेसची अवस्था चिंतित करणारी आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या झंझावाती प्रचार दौऱ्यामुळे मराठवाडा ढवळून निघाला. एकीकडे फडणवीस यांचा आत्मविश्‍वास, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना असलेली विजयाची खात्री आणि त्याविरुद्ध शरद पवार नावाच्या एका व्यक्तीच्या नावाने चाललेले विरोधकांचे शक्तिप्रदर्शन, असे मराठवाड्यातील चित्र आहे. विद्यमान आमदार वगळता उरलेल्या २३ पैकी काही मतदारसंघांत शिवसेना-भाजपमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्याचा फायदा उचलण्याची संधी काँग्रेस-‘राष्ट्रवादी’ला आहे.

कर्जमाफीचा मुद्दा, दुष्काळ आणि शेतकऱ्यांचे इतर अनेक प्रश्‍न निवडणुकीत प्राधान्यक्रमावर येतात; मात्र तेवढ्यापुरतेच. पक्षांतर, काश्‍मीर प्रश्‍न अशा मुद्द्यांशी मराठवाड्यातील ग्रामीण भागात काहीही देणेघेणे नाही. उलट मोठ्या प्रमाणावर झालेल्या पक्षांतराविषयी जनमानसात नाराजीचाच नाही, तर संतापाचा सूर आहे.

नांदेडमध्ये काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या बालेकिल्ल्यात त्यांचा पराभव करून भाजपने खासदारकी मिळवली. आता काँग्रेसला आपल्या जागा टिकवून ठेवण्याचे आव्हान असेल. ‘राष्ट्रवादी’च्या वाट्याला किनवटची एकमेव जागा आहे. कंधार-लोहा मतदारसंघाच्या निर्णयाकडे लक्ष लागून आहे. खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासमोरही या मतदारसंघात मुलगा की दाजी, असा पेच आहे. हिंगोलीत भाजपचे विद्यमान आमदार तानाजी मुटकुळे यांची उमेदवारी निश्‍चित असल्याने त्यांनी प्रचार सुरू केला आहे. आघाडीमध्ये काँग्रेसला असलेल्या या जागेवर उमेदवाराची अद्याप निश्‍चिती नाही. कळमनुरीत काँग्रेसचे विद्यमान आमदार डॉ. संतोष टारफे यांची उमेदवारी निश्‍चित असून, तेथे युतीचे घोडे अडले आहे.

शिवसेनेचे इच्छुक उमेदवार संतोष बांगर, भाजपचे इच्छुक उमेदवार गजानन घुगे; तर रासपचे इच्छुक उमेदवार विनायक भिसे यांनी प्रचार सुरू केला आहे.

वसमतमध्ये आघाडी व युतीचा उमेदवार निश्‍चित नाही. परभणी जिल्ह्यातील चारपैकी परभणी मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार डॉ. राहुल पाटील हे परत रिंगणात उतरणार आहेत. काँग्रेसकडून कोणाचे नाव समोर आले नसले, तरी अनेक इच्छुक आहेत. जिंतूर-सेलूमधून विद्यमान आमदार विजय भांबळे यांची उमेदवारी पक्की आहे. भाजपकडून मेघना बोर्डीकर इच्छुक आहेत. पाथरीत भाजपकडून विद्यमान आमदार मोहन फड इच्छुक आहेत. पण, ही जागा शिवसेनेकडे असल्याने ते शिवसेनेत जातात का, याची चर्चा आहे. गंगाखेडमधून आमदार डॉ. मधुसुदन केंद्रे हे ‘राष्ट्रवादी’चे उमेदवार असतील.

शरद पवार यांनी बीडहून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करताना याच जिल्ह्यासाठी पाच नावे घोषित केली आहेत. आघाडीत आष्टीची जागा कुणाला, याचा निर्णय व्हायचा आहे. धनंजय मुंडेंसाठी परळीची जागा ‘राष्ट्रवादी’ने आपल्याकडे घेतल्याने आष्टी काँग्रेसकडे जाण्याची शक्‍यता आहे. लातूर जिल्ह्यात सहापैकी निलंग्याचा अपवाद सोडला, तर उर्वरित पाच मतदारसंघांत इच्छुकांची संख्या मोठी आहे. निलंग्यात भाजपकडून पालकमंत्री संभाजी निलंगेकर पाटील हेच उमेदवार असतील. ‘राष्ट्रवादी’चे राणा जगजितसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे उस्मानाबाद चर्चेत आले. ही जागा शिवसेनेकडे आहे. राणांच्या प्रवेशामुळे ती भाजपकडे जाते किंवा कसे, हे औत्सुक्‍याचे आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यात नऊ मतदारसंघ असून, आघाडीतील एकाही उमेदवाराची निश्‍चिती झालेली नसली; तरी शरद पवार यांनी औरंगाबाद दौऱ्यात काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांसोबत चर्चा केली. काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी शिवबंधन बांधल्याने सिल्लोड चर्चेत आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com