Vidhansabha 2019 : मनसेही आता उतरणार निवडणुकीच्या रिंगणात?

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 21 September 2019

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजकीय अस्तित्व टिकून राहावे यासाठी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी मनसेने सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीकडेही पाठ फिरवण्याच्या मनःस्थितीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे असताना कार्यकर्त्यांच्या प्रचंड रेट्यापुढे अखेरीस राज ठाकरेंनाही नमते घ्यावे लागले असून, विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी पक्षाचा आढावा घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

विधानसभा 2019 : मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजकीय अस्तित्व टिकून राहावे यासाठी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी मनसेने सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीकडेही पाठ फिरवण्याच्या मनःस्थितीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे असताना कार्यकर्त्यांच्या प्रचंड रेट्यापुढे अखेरीस राज ठाकरेंनाही नमते घ्यावे लागले असून, विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी पक्षाचा आढावा घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. 

मनसे निवडणूक लढविणार का आणि किती जागांवर निवडणूक लढविणार, याबाबतचा निर्णय लवकरच राज ठाकरे स्वतःच जाहीर करणार असल्याची माहिती मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. मनसे १०० जागांवर निवडणूक लढविणार असल्याची चर्चा आज दिवसभर सुरू होती, मात्र मनसेने अधिकृत त्याला दुजोरा दिला नाही. 

पक्ष टिकवण्यासाठी आणि वाढविण्यासाठी निवडणुकीला सामोरे जाण्याशिवाय पर्याय नाही. त्याशिवाय राज ठाकरेंच्या मागे उभे असणाऱ्या कार्यकर्त्यांना टिकवून ठेवण्यासाठी निवडणुका हाच एकमेव पर्याय असल्याने निवडणुका लढवल्या जाव्यात, अन्यथा मनसेलाही गळती लागण्यास वेळ लागणार नसल्याचे मत मनसेच्या नेत्यांनी राज ठाकरे यांच्याकडे व्यक्‍त केल्याचे समजते. मुंबईतील मनसेच्या विभागप्रमुखांचे मत मनसेच्या नेत्यांनी जाणून घेतले. त्यानंतर मनसेचे नेते बाळा नांदगावकरांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी कृष्णकुंज येथे भेट घेऊन कार्यकर्त्यांनी व्यक्‍त केलेले मत त्यांना कळवले आहे. 

याविषयी पत्रकारांशी बोलताना बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केले, की बहुतांश मनसैनिकांचे मत निवडणूक लढवावी असे आहे. काही जणांनी निवडणूक लढवली जावू नये असेही मत व्यक्‍त केले आहे.

लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षाला बाहेरून पाठिंबा दिला असला तरी राज ठाकरेंनी विरोधी पक्षाच्या बाजूने प्रचारात मोठी आघाडी उघडली होती. विधानसभा निवडणूक लढवली तरी कोणत्याही आघाडीत मनसे जाणार नसल्याचे बाळा नांदगावकर यांनी सांगितले. तसेच, ईव्हीएमऐवजी मतपत्रिकांवर निवडणुकीचा मनसेचा आग्रह होता, याविषयी नांदगावकर यांना विचारले असता त्यांनी ईव्हीएमद्वारेच  निवडणुका व्हाव्यात असे घटनेत लिहिलेले नसल्याचे सांगितले. ईव्हीएमला आमचा विरोध आहेच, तो कायमही राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhansabha 2019 MNS Election Politics