Vidhan Sabha 2019 : प्रचाराचे धूमशान

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 12 October 2019

दिवसभरात

  • पनवेलमध्ये नागरिकांचा मतदानावर बहिष्कार
  • मुख्यमंत्र्यांनी धोका दिल्याचा ज्योती कलानींचा आरोप
  • सोलापुरात काँग्रेस नेत्या इंदुमती पाटील यांचे बंड
  • नाशिकमध्ये संजय राऊत राष्ट्रवादी नेत्याच्या घरी
  • औरंगाबाद काँग्रसमध्ये गटबाजी कायम
  • लातूरमध्ये काँग्रेस नेत्या प्रतिभा कव्हेकर भाजपत
  • नांदेडमध्ये व्हॉट्‌सॲप प्रचार; ग्रुप ॲडमिनला नोटीस
  • स्वाभिमानीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष भगवान काटे भाजपत
  • कल्याण पश्‍चिममधील बंडखोर नरेंद्र पवार यांनी भाजप सोडला

विधानसभा 2019 : पुणे - राज्याच्या रणांगणातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार संघर्ष शिगेला पोचला असून, आजही विविध राजकीय पक्षांच्या दिग्गज नेत्यांच्या प्रचार तोफा धडाडल्या. भाजपचे अध्यक्ष अमित शहा, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रवादीचे नेते डॉ. अमोल कोल्हे आदी नेत्यांनी परस्परांवर टीकेचे बाण सोडले. नेत्यांच्या या सभांमुळे राज्यात प्रचाराचे धूमशान पहायला मिळत आहे.

काँग्रेसजन हे भुरटे चोर तर भाजपवाले डाकू आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता आमची येईल आणि भाजप विरोधी पक्षाच्या रूपात दिसेल.
- प्रकाश आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीचे नेते
बल्लारपूर येथील सभेत

सरकारवर अंकुश ठेवायचा असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांना निवडून द्या. गेल्या पाच वर्षांमध्ये चौदा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या कोणाला त्याचे सोयरसूतक नाही.
- राज ठाकरे, अध्यक्ष मनसे
भांडूप (मुंबई) येथील सभेत

जम्मू-काश्‍मीरमधील ३७० कलम रद्द करण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा कधीही विरोध नव्हता, सत्ताधारी भाजपकडून याबाबत दिशाभूल केली जात आहे. 
- शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
उरुळी कांचन येथील सभेत

काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे कुटुंब चालविणारे पक्ष असून भाजप हा देश चालविणारा पक्ष आहे. शरद पवार हे केवळ त्यांच्याच परिसराचा विकास करत असून त्यांनी जनतेसाठी काहीही केले नाही.
- अमित शहा, अध्यक्ष, भाजप
चिखली येथील सभेत

आम्ही बंद हॉलमधील माणसे नाही आहोत, आम्ही उघड्या मैदानात लढतो. करतो, पाहतो ही शिवसेनेची भाषा नाही. आम्ही जे बोलतो तेच करतो. मी सामना जिंकलेला असून धावसंख्याही निश्‍चित झाली आहे.
- उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख
अमरावती येथील सभेत

मावळच्या नागरिकांनी हिंमत दाखविली आणि तिथे आलेलं पार्सल परत पाठवलं, आता कर्जत जामखेडमध्ये आलेलं पार्सल तुम्ही परत पाठविणार का? मतदानाच्या दिवशी याचा फैसला होऊन जाऊ द्या.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
कर्जत जामखेड येथील सभेत 

मला कोथरूडमध्ये अडकवून ठेवलं असा शरद पवार यांचा समज आहे; पण तुम्ही या पाटलाला ओळखलेलं नाही. मी चेहऱ्यावर कुठलाही भाव ठेवत नाही. मी कसा फटका लगावतो हे समजत नाही. माझा अनुभव तुम्ही घेतलेला नाही.
- चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप
कोल्हापुरातील सभेत

सत्तर वर्षे देशावर सत्ता गाजविलेल्या काँग्रेसने गरिबी हटावचा नारा दिला होता, वर्षांमागून वर्षे लोटली तरीसुद्धा गरिबी हटविण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत. सध्या केंद्रातील मोदी सरकार कल्याणकारी योजना राबविताना दिसते.
- हरिभाऊ बागडे, भाजप नेते
फुलंब्री येथील सभेत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra Vidhansabha 2019 Political party promotion politics