Vidhan Sabha 2019 : राज्यभर बहुरंगी लढती

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 8 October 2019

काही लक्षवेधी लढती

  • नागपूर नैॡत्य - देवेंद्र फडणवीस (भाजप) विरुद्ध आशिष देशमुख (काँग्रेस)
  • बारामती - अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस) विरुद्ध गोपीचंद पडळकर (भाजप)
  • कणकवली - सतीश सावंत (शिवसेना) विरुद्ध नितेश राणे (भाजप)
  • इस्लामपूर - जयंत पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस) विरुद्ध गौरव नायकवडी (शिवसेना) व निशिकांत पाटील (भाजपचे बंडखोर)
  • तासगाव-कवठेमहांकाळ - सुमन पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस) विरुद्ध अजितराव घोरपडे (शिवसेना)
  • भोकर - अशोक चव्हाण (काँग्रेस) विरुद्ध बापूसाहेब देशमुख गोरठेकर (भाजप)
  • लातूर ग्रामीण - धीरज विलासराव देशमुख (काँग्रेस) विरुद्ध सचिन देशमुख (शिवसेना)
  • मुक्ताईनगर - रोहिणी खडसे-खेवलकर (भाजप) विरुद्ध चंद्रकांत पाटील (शिवसेनेचे बंडखोर)

विधानसभा 2019 : मुंबई - शिवसेना-भाजप युतीच्या नेत्यांना बंडोबांना थंड करण्यात बऱ्यापैकी यश आले आहे, तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या नेत्यांच्या शिष्टाईमुळे आघाडीच्या बंडखोरांनी तलवार म्यान केली आहे. यामुळे राज्यातील बहुसंख्य मतदारसंघांत दुरंगी, तर काही मतदारसंघांत तिरंगी आणि चौरंगी लढती होणार असल्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे. विधानसभेच्या २८८ मतदारसंघांसाठी अर्ज मागे घेण्याचा आज अखेरचा दिवस होता.

निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपची युती झाली आहे, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि वंचित बहुजन आघाडी या दोन पक्षांनी स्वतंत्र उमेदवार दिले आहेत. त्यामुळे थेट चौरंगी लढती आहेत. मात्र, बहुसंख्य ठिकाणी युती आणि आघाडीचे उमेदवार यांच्यात जोरदार लढत होणार आहे. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पुणे, नाशिक या पट्ट्यात मनसेचे काही उमेदवार तुल्यबळ लढत देतील, असे चित्र आहे. ‘वंचित’ने राज्यभरात उमेदवार उभे केले असल्यामुळे ‘वंचित’ आपला प्रभाव किती दाखविणार, याकडे लक्ष आहे.

शिवसेना-भाजपची युती झाल्यामुळे अनेक ठिकाणी या दोन्ही पक्षांतील इच्छुकांनी बंडखोरी केली होती. मात्र, आज अखेरच्या दिवशी जवळपास सर्व बंडखोरांना खाली बसविण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना यश आले आहे. मात्र, तरीही काही ठिकाणी बंडखोरी कायम आहे.

बंडखोरीमध्ये वांद्रे येथे ‘मातोश्री’च्या अंगणात शिवसेनेच्या विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांनी बंडखोरी केली आहे, तर वर्सोवामध्ये भाजपचा मित्रपक्ष ‘शिवसंग्राम’च्या विद्यमान आमदार भारती लव्हेकर यांच्याविरोधात शिवसेनेच्या नगरसेवक राजूल पटेल यांनी बंडखोरी केली आहे. कोकणात नितेश राणे यांच्याविरोधात कणकवलीमध्ये शिवसेनेचे बंडखोर सतीश सावंत यांनी अर्ज कायम ठेवला आहे.

देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदासाठी रिंगणात उतरले आहेत. नैॡत्य नागपूर मतदारसंघातून ते रिंगणात आहेत.

त्यांच्याविरुद्ध काँग्रेसचे उमेदवार आशिष देशमुख रिंगणात आहेत. तसेच, बारामती आणि पुण्याच्या कोथरूड मतदारसंघांतील निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीकडून सांगलीत लढलेल्या गोपीचंद पडळकर यांना भाजपने अजित पवार यांच्याविरोधात उतरविले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोथरूडमधून उभे आहेत. मनसेच्या किशोर शिंदे यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिल्याने येथे काट्याची लढत होणार आहे.

सिंधुदुर्गात शिवसेना-भाजप आमनेसामने
राज्याच्या विविध भागांतून शिवसेना व भाजपच्या बंडखोरांनी आज माघार घेतली असताना सिंधुदुर्गात मात्र दोन्ही पक्षांनी एकमेकांविरुद्ध दंड थोपटले आहेत. कणकवली मतदारसंघात नितेश राणे हे भाजपच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर, सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांना शिवसेनेने नितेश यांच्याविरुद्ध उमेदवारी दिली. सावंत यांनी आपला अर्ज मागे घेतला नसल्याने या मतदारसंघात नितेश यांना ते जोरदार टक्कर देतील.

सावंतवाडीत राज्याचे अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्यापुढे भाजपच्या बंडखोराचे आव्हान असणार आहे. येथून राजन तेली यांनी बंडखोरी करीत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

कुडाळ-मालवण मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार वैभव नाईक हे पुन्हा एकदा निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व नारायण राणे यांचे समर्थक रणजित देसाई यांनी येथून नाईक यांना आव्हान दिल्याने या मतदारसंघातही चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhansabha 2019 Politics