esakal | Vidhan Sabha 2019 : राज्यात प्रचाराचा धुरळा
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad-and-Devendra

निवडणूक आघाडीवर

  • राणेंचा ‘स्वाभिमान’ भाजपत विलीन
  • मुंबईत शिवसेनेची बंडखोरांवर कारवाई
  • नाशिकमध्ये शिवसेनेत बंड
  • युतीच्या जाहीरनाम्यात ‘मराठी’ वाऱ्यावर
  • अकोल्यात आज मोदींची सभा
  • हिंगोलीत मतदानासाठीची तयारी यंत्रणेकडून पूर्ण
  • नाशिकमध्ये सट्टाबाजारात महायुतीला भाव

Vidhan Sabha 2019 : राज्यात प्रचाराचा धुरळा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

विधानसभा 2019 : पुणे - राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राची सत्ता पुन्हा काबीज करण्यासाठी महायुतीने कंबर कसली आहे, तर त्यांना सत्तेवरून खाली खेचण्याचा चंग महाआघाडीच्या नेत्यांनी बांधला आहे. मतदानासाठी अवघे सहा दिवस राहिले आहेत. सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या सभांनी राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, मनसेचे राज ठाकरे, वंचितचे प्रकाश आंबेडकर आणि रिपब्लिकनचे रामदास आठवलेंसह अनेक राजकीय नेत्यांनी मंगळवारी राज्यात प्रचाराचा धुरळा उडवला.

भाजप सरकारबद्दल जनतेत नाराजी - पवार
हडपसर - मुख्यमंत्री सांगतात महाराष्ट्रात निवडणूकच नाही. इथे विरोध करायला माणसंच नाहीत. निवडणुकीची मजा येत नाही; मग देशाचे पंतप्रधान नऊ वेळा महाराष्ट्रात का येतात? विरोधकच नाही; मग गृहमंत्री कानाकोपऱ्यात फिरून २० सभा का घेतात? मुख्यमंत्री प्रत्येक तालुक्‍यात का हिंडतात? त्यांना आता कळले आहे, की या जनतेच्या मनात भाजप सरकारबद्दल नाराजी आहे. महाराष्ट्रातील जनता यांना पाठिंबा देईल, याची खात्री त्यांना नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. महाआघाडीच्या उमेदवारांच्या झालेल्या प्रचार सभेत पवार बोलत होते.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रचारात भाजप वाजवत असलेल्या कलम ३७० रद्दच्या तुणतुण्यावरून पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना चांगलेच फटकारले. काहीही झाले, तरी कलम ३७० आम्ही रद्द केले. शेतकरी आत्महत्या झाल्या, कलम ३७०; कारखाने बंद पडले, कलम ३७०; बेरोजगारी वाढली तरी कलम ३७०, अशी उपरोधिक टीका पवार यांनी केली.

राज्यातील सत्ताधारी भाजप सरकारवर टीका करताना ते म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांचे अरबी समुद्रात स्मारक बांधू, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करू, अशी आश्वासने देऊन भाजप सत्तेत आली. पण, पाच वर्षे होऊनही छत्रपतींच्या स्मारकाची एक वीटसुद्धा रचली नाही आणि शेतकाऱ्यांची कर्जमाफी झाली नाही.’’ 

राज्यात तरुणांची फळी निर्माण करून अनेक कर्तृत्वान युवकांकडे राज्याची सूत्रे सोपवायची आहेत. त्यामुळे महाआघाडीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्‍याने निवडून आणा, असे आवाहन या वेळी पवार यांनी केले. 
माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, जयदेव गायकवाड, कमल ढोले पाटील, सुरेश घुले, राजलक्ष्मी भोसले, नगरसेवक वैशाली बनकर, प्रशांत जगताप, आनंद अलकुंटे, बंडूतात्या गायकवाड, योगेश ससाणे, हेमलता मगर, नंदाताई लोणकर, पूजा कोद्रे, अनिस सुंडके, हाजीगफूर पठाण, रईस सुंडके, नारायण लोणकर, प्रशांत तुपे, नीलेश मगर, प्रवीण तुपे उपस्थित होते.

पुन्हा महायुतीचेच सरकार - मुख्यमंत्री
वडगाव मावळ - ‘आघाडी सरकारने पंधरा वर्षांत जेवढी कामे केली, त्यापेक्षा दुप्पट कामे गेल्या पाच वर्षांत युती सरकारने केली आहेत. पंधरा वर्षांच्या सत्ताकाळात आघाडी सरकारने भ्रष्टाचाराव्यतिरिक्त काही केले नाही. लोकसभेचा निकाल ही विधानसभा निकालाची नांदी होती. त्यामुळे राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार येणार आहे,’’ असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (ता. १५) येथे व्यक्त केला.

महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी तळेगाव दाभाडे येथे आयोजित सभेत ते बोलत होते. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसवर त्यांनी सडकून टीका केली. फडणवीस म्हणाले, ‘‘आघाडी सरकारने पंधरा वर्षांचा हिशेब द्यावा, आम्ही पाच वर्षांचा देऊ. दुप्पट कामे केली नसल्यास पुन्हा मते मागणार नाही. त्यांनी स्वतःची घरे व परिवार मोठे केले. युती सरकारने शेतकऱ्यांना पन्नास हजार कोटींची सर्वांत मोठी कर्जमाफी दिली. मावळ तालुक्‍यालाही मोठ्या प्रमाणावर निधी दिला. 

‘‘लोकसभा निवडणुकीच्या वेळी आपण भाकीत केले होते, की राष्ट्रवादीला आम्ही नॅनो पार्टी बनवू. ते तंतोतंत खरे ठरले. आता या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या इतिहासात सर्वांत कमी जागा मिळतील व हा पक्ष रसातळाला जाईल,’’ अशा शब्दांत त्यांनी पक्षाची संभावना केली.
बाळा भेगडे यांनी मावळच्या विकासाचा आढावा घेतला. या वेळी जिल्हा बॅंकेचे संचालक बाळासाहेब नेवाळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

...तर भेगडे यांना कॅबिनेट मंत्रिपद
सभेची ही गर्दी पाहून बाळा भेगडे यांचा विजय निश्‍चित आहे, यात शंका नाही. त्यांना गेल्या वेळेपेक्षा दुप्पट मतांनी विजयी केल्यास कॅबिनेट मंत्रिपद देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. तळेगावातील मिसाईल प्रकल्पग्रस्तांना वाढीव मोबदला मिळवून देण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांची भेट घेण्याचे आश्‍वासनही त्यांनी दिले.

खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रसाद लाड, माजी आमदार दिगंबर भेगडे, रूपलेखा ढोरे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे आदी उपस्थित होते.

शेतकऱ्यांचे अश्रूच ज्यांना दिसत नाही त्यांचे ज्ञान चाटायचे का? सत्तेत आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू. आमची बांधिलकी ही शेतकऱ्यांसोबत आहे.
- उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख
इस्लामपूर येथील सभेत

सध्या उद्योगपतींचे खिसे भरण्याचे काम सुरू असून, पंतप्रधानांनी देश १५ ते २० लोकांच्या हवाली केला आहे. मोदी सामान्यांच्या प्रश्‍नांवर बोलत नाहीत. ते फक्त उद्योगपतींचे गोडवे गातात.
- राहुल गांधी, काँग्रेस नेते
वणी येथील सभेत

loading image