Vidhan Sabha 2019 : प्रबळ विरोधक बनवा - राज

सकाळ वृत्तसेवा
Friday, 11 October 2019

राज म्हणाले...
- सर्व मोठ्या पक्षांनी निवडणुकीवर बहिष्कार घालायला हवा होता; पण कुणी तयार झाले नाही.
- आता शिवस्मारकाबद्दल कोणी काहीच बोलत नाही
- लग्नसमारंभांना देण्यासाठी गडकिल्ले नाहीत
- विकासाला विरोध नाही, बुलेट ट्रेनला विरोध
- बीपीटीच्या जमिनीवर कारशेड का नाही? 
- ‘कलम ३७०’चा राज्यातील निवडणुकीशी संबंध काय?
- सर्व शहरांचा विचका झालाय

विधानसभा 2019 : मुंबई - 'मी एक भूमिका घेतली आहे. माझी तुमच्याकडे एक मागणी आहे. तुमच्याकडे एक गोष्ट मागायची आहे. या राज्याला एका प्रबळ विरोधी पक्षाची गरज आहे. यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मतदान करा,’’ असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. सांताक्रुझ व गोरेगावमध्ये दोन जाहीर सभा घेऊन त्यांनी प्रचाराचा नारळ फोडला. उद्धव ठाकरेंच्या युती आणि राजीनामाप्रकरणीही त्यांनी खिल्ली उडवली. शिवसेना पक्षप्रमुख केवळ राजीनामे देणार, असे म्हणाले; पण दिले नाहीत. यावर ‘इतकी वर्षे युतीत सडली आणि १२४ वर अडली’ असा टोलाही राज यांनी लागावला.

‘‘राज्यात विरोधी पक्ष उरलाय कुठे? जे काँग्रेसचे विरोधी पक्षनेते होते; तेही भाजपात गेले. आता तुमचे प्रश्न मांडणार कोण? सरकारमधील आमदारांना ‘ब्र’ काढायचीही परवानगी नसते. सत्तेतला आमदार प्रश्न विचारू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. पण, विरोधी पक्षातील आमदार सरकारला प्रश्न विचारू शकतो. तो सरकारला वठणीवर आणू शकतो. यासाठी मनसेच्या मागे उभे राहा,’’ असे आवाहन राज यांनी केले.

‘आरे’प्रकरणी राज ठाकरेंनी शिवसेनेवर सडकून टीका केली. ‘‘आरे’ची २७०० झाडे रातोरात कापली गेली. यांना विरोध करायला कोणी नाही, हे लोकांना फक्त मूर्ख बनवतात. शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणतात आम्ही सत्तेत आलो, की ‘आरे’ला जंगल म्हणून घोषित करू. तुम्हाला आता जाग आली का? पर्यावरणमंत्री तुमचेच होते; मग ते कारवाई का थांबवू शकले नाहीत?’’ असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra Vidhansabha 2019 raj thackeray politics