esakal | Vidhan Sabha 2019 : बेरोजगारीच्या मुद्द्यावर सरकारला घेरणार - मल्लिकार्जुन खर्गे
sakal

बोलून बातमी शोधा

mallikarjun kharge

विधानसभेसाठी काँग्रेस सज्ज - थोरात
प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेसची वॉर रूम सज्ज आहे. विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आघाडीची पूर्ण तयारी झाली आहे. राज्यभरात स्टार प्रचारकांच्या सभा होणार आहेत.

Vidhan Sabha 2019 : बेरोजगारीच्या मुद्द्यावर सरकारला घेरणार - मल्लिकार्जुन खर्गे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

विधानसभा 2019 : मुंबई - भाजप-शिवसेना सरकारच्या पाच वर्षांच्या काळात महाराष्ट्राची अधोगती झाली असून, सर्वच समाजघटकांमध्ये सरकारविरोधात तीव्र संताप आहे. दुष्काळ, पूर हाताळण्यात सरकारला आलेले अपयश, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, आर्थिक मंदी या मुद्द्यांवर काँग्रेस पक्ष सरकारला घेरणार आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले. 

विधानसभा निवडणुकीसाठी टिळक भवन येथे उभारण्यात आलेल्या प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अद्ययावत वॉर रूमचे उद्‌घाटन खर्गे यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. 

‘आरे’मधील वृक्षतोडीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, सरकारने पोलिसी बळाचा वापर करून मध्यरात्री ‘आरे’मधील झाडांची कत्तल केली. याला विरोध करणाऱ्या मुंबईकरांना, तरुण विद्यार्थी आणि पर्यावरणवाद्यांना पोलिसांनी अटक करून जेलमध्ये डांबले आहे. ‘मॅन वर्सेस वाईल्ड’ कार्यक्रमामध्ये मोदी यांनी आपल्या काकांना लाकडाचा व्यवसाय करायचा होता, पण आजीने वृक्षामध्ये जीव असतो, लाकडाचा व्यवसाय करू नको, असे सांगितले होते. याची आठवण करून देत पर्यावरणाबाबत किती संवेदनशील आहोत हे पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना सांगावे आणि अटक केलेल्या तरुण आणि विद्यार्थ्यांची सुटका करण्याचे आदेश द्यावेत, असे खर्गे म्हणाले.