Vidhansabha 2019 : युती जवळपास निश्‍चित; भाजप-शिवसेना लढणार एवढ्या जागांवर

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 22 September 2019

केंद्रात भाजप मोठा भाऊ असला, तरी महाराष्ट्रात शिवसेनाच मोठा भाऊ असल्याच्या गर्जना शिवसेना करीत होती. मात्र, आता शिवसेना महाराष्ट्रातही लहान भावाची भूमिका मान्य करण्यास तयार असल्याचे सूतोवाच होत आहे. विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजताच युतीचा फॉर्म्युलाही निश्‍चित झाला असून, भाजप 162 तर शिवसेना 126 जागांवर निवडणूक लढविणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

विधानसभा 2019 : मुंबई - केंद्रात भाजप मोठा भाऊ असला, तरी महाराष्ट्रात शिवसेनाच मोठा भाऊ असल्याच्या गर्जना शिवसेना करीत होती. मात्र, आता शिवसेना महाराष्ट्रातही लहान भावाची भूमिका मान्य करण्यास तयार असल्याचे सूतोवाच होत आहे. विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजताच युतीचा फॉर्म्युलाही निश्‍चित झाला असून, भाजप 162 तर शिवसेना 126 जागांवर निवडणूक लढविणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. 

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या अटी व शर्थींवर भारतीय जनता पक्षाने युती केली. त्याचवेळी विधानसभेतदेखील युती करण्याचा शब्द भाजपने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला. मात्र, जागावाटपाचे सूत्र निश्‍चित झाले नव्हते. आता दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये जागावाटप व जागांच्या अदलाबदलीबाबत सविस्तर चर्चा झाली असताना भाजपने शिवसेनेला 105 पेक्षा जास्त जागा देता येणार नाहीत, असा पवित्रा घेतला होता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे यांच्यात समन्वयाने जागावाटपाचे सूत्र निश्‍चित झाल्याची माहिती आहे. शिवसेनेला 135 व भाजपला 135 असा फॉर्म्युला शिवसेनेचा होता. मात्र, तो भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना मान्य नव्हता. त्यामुळे युतीच्या चर्चेत खीळ बसली होती. अखेर भाजपने 105 ऐवजी शिवसेनेला 126 जागा देण्याची तयारी दर्शविली. उद्धव ठाकरे यांना हे सूत्र मान्य झाले असून, नव्या सूत्रावर 27 सप्टेंबरनंतरच युतीची अधिकृत घोषणा होईल, असे सूत्रांचे मत आहे. 

दरम्यान, 2014 ला भाजप-शिवसेना स्वबळावर लढल्यानंतर भाजपची राज्यातील ताकद वाढली आहे. त्याअगोदर शिवसेना 171, तर भाजप 117 जागांवर निवडणूक लढवीत होते. आता शिवसेनेला केवळ 126 जागा देऊन भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत विधानसभेला सामोरे जाणार असल्याचे निश्‍चित झाल्याची माहिती आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhansabha 2019 Yuti BJP Shivsena Politics