Vidhansabha 2019 : ‘युतीचा फॉर्म्युला आधीच ठरलाय’ - उद्धव ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 21 September 2019

‘भाजप-शिवसेना युतीचा फॉर्म्युला आधीच ठरला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी अमित शहा, मुख्यमंत्री आणि आमच्या बैठकीत युतीबाबत चर्चा झाली, त्यानुसार फॉर्म्युलाही  ठरला आहे,’’ असे प्रतिपादन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केले. मात्र तो भाजपलाच मान्य नसेल, तर मुख्यमंत्र्यांनीच शिवसेनेची यादी तयार करावी,’’ अशी खोचक टिप्पणीही त्यांनी केली.

मुंबई - ‘भाजप-शिवसेना युतीचा फॉर्म्युला आधीच ठरला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी अमित शहा, मुख्यमंत्री आणि आमच्या बैठकीत युतीबाबत चर्चा झाली, त्यानुसार फॉर्म्युलाही  ठरला आहे,’’ असे प्रतिपादन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केले. मात्र तो भाजपलाच मान्य नसेल, तर मुख्यमंत्र्यांनीच शिवसेनेची यादी तयार करावी,’’ अशी खोचक टिप्पणीही त्यांनी केली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सेनेचे मंत्री आणि नेत्यांची आज शिवसेना भवनात बैठक घेतली. या बैठकीत भाजपसोबत युती करण्यावर शिक्‍कामोर्तब करण्यात असले तरी, जागावाटपाचा भाजपचा फॉर्म्युला शिवसेना नेत्यांना मान्य नाही.  भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे युती होणार असल्याचे ठाकरे आणि सेनानेते सांगत आहेत. याबाबत उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘भाजप-शिवसेना युतीचा फॉर्म्युला आधीच ठरला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी अमित शहा, मुख्यमंत्री आणि आमच्या बैठकीत युतीबाबत चर्चा झाली, त्यानुसार फॉर्म्युलाही  ठरला आहे. परंतु, या वेळी मी वेगळी पद्धत अवलंबली आहे, मुख्यमंत्री उमेदवारांची यादी तयार करून देतील आणि आमच्या नेत्यांशी चर्चा करून युती जाहीर होईल.’’ 

युतीत कोणताही तणाव नाही. लवकरच युतीची घोषणा होईल, लोकसभेच्या वेळेला विधानसभेचा फॉर्म्युला ठरला आहे, असे त्यांनी एका प्रश्‍नावर बोलताना पुन्हा स्पष्ट केले. 

काय ठरले होते?
लोकसभा निवडणुकीवेळी उद्धव ठाकरे, अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १८ फेब्रुवारी २०१९ रोजी एकत्र पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा केली होती. त्या वेळी लोकसभेला शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्या वेळी शिवसेनेच्या दुसऱ्या अटीनुसार विधानसभा निवडणुका शिवसेना आणि भाजप एकत्र लढणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. विधानसभेलाही निम्म्या निम्म्या जागा लढवल्या जातील. विधानसभा निवडणुकीच्या वेळी मित्रपक्षांशी चर्चा केली जाईल आणि उरलेल्या जागा निम्म्या निम्म्या लढवल्या जातील, असे मुख्यमंत्री म्हणाले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhansabha 2019 Yuti Formila Uddhav Thackeray Politics