Vidhan Sabha 2019 : राज्यात पुन्हा युतीचेच सरकार - स्मृती इराणी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 15 October 2019

‘मी तालुका दत्तकच घेतो’
जलसंपदामंत्री गिरीश महाजन म्हणाले, ‘‘या वेळी युतीच्या २४० जागा लागतील. युतीची सत्ता येणार असल्याने इंदापुरातून हर्षवर्धन पाटील यांना निवडून द्या. तुमचा बाबीस गावांचा पाण्याचा प्रश्‍न व खडकवासला कालव्याचा प्रश्‍न कायमचा मार्गी लावण्यासाठी मी तुमचा तालुकाच 
दत्तक घेतो.’

विधानसभा 2019 : निमगाव केतकी  - राज्याला विकासाचा दृष्टिकोन असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे नेतृत्व मिळाले आहे. राज्यात पुन्हा युतीचेच सरकार येणार असल्याने इंदापुरातून भाजपचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांना मोठ्या मताधिक्‍याने निवडून देण्याचे आवाहन केंद्रीय महिला, बालकल्याण विकास आणि वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांनी केले.

इंदापूरचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारार्थ निमगाव केतकी येथे झालेल्या सभेत सोमवारी त्या बोलत होत्या. या वेळी उमेदवार पाटील, पद्माताई भोसले, पृथ्वीराज जाचक, अशोक घागरे, बाळासाहेब घोलप, लालासाहेब पवार, देवराज जाधव, कृष्णाजी यादव, छाया मिसाळ, नानासाहेब शेंडे, वसंत मोहळकर,  मच्छिंद्र चांदणे, सारिका काळे उपस्थित होते. 

इराणी म्हणाल्या, ‘‘राज्यात देवेंद्र फडणवीस सरकारने २४ हजार कोटींचे शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले आहे. या पाच वर्षांत राज्यातील साठ हजार शाळा डिजिटल केल्या आहेत. सरकारने शेतकऱ्यांच्या विविध योजनांवर १५ हजार कोटी खर्च केले. राज्यात पुन्हा हेच सरकार येणार आहे. त्यामुळे तुम्ही पाटील यांना निवडून द्यावे.’’

हर्षवर्धन पाटील म्हणाले, ‘‘पाच वर्षे निष्क्रिय आमदारामुळे तालुक्‍याला हक्काचे पाणी न मिळाल्याने शेतीचे नुकसान झाले आहे. आमचे हक्काचे पाणी पुन्हा आम्हाला मिळावे, ही आमची मुख्य मागणी आहे. सत्ता युतीचीच येणार असल्याने जनतेने मला विजयी करावे.’’ या वेळी इतरांचीही भाषणे झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra Vidhansabha 2019 Yuti government in maharashtra smriti irani politics