Vidhan Sabha 2019 : युतीत निष्ठांवतांचा आक्रोश

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे निवासस्थान "अ-9', मुख्यमंत्र्यांच्या "वर्षा' आणि उद्धव ठाकरे यांच्या "मातोश्री' निवासस्थानी तिकीट न मिळालेल्या नाराज निष्ठांवतांचा आक्रोश दोन दिवसांपासून सुरू आहे.

तिकीट न मिळाल्याने नाराज नेत्यांची "वर्षा', "मातोश्री'वर गर्दी 
मुंबई - भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे निवासस्थान "अ-9', मुख्यमंत्र्यांच्या "वर्षा' आणि उद्धव ठाकरे यांच्या "मातोश्री' निवासस्थानी तिकीट न मिळालेल्या नाराज निष्ठांवतांचा आक्रोश दोन दिवसांपासून सुरू आहे. 

भाजपचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे, प्रकाश महेता, एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे यांची नावे पहिल्या यादीत नसल्याने भाजपमध्ये दिल्लीच्या धक्‍कातंत्राची जोरदार चर्चा सुरू आहे. पुण्यातील कोथरूड मतदारसंघातून मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी नाकारल्याची तीव्र प्रतिक्रिया पुण्यात उमटली असून, नाराजांनी दिल्ली गाठण्याची तयारी सुरू केली आहे. बाहेरून आलेल्या आमदारांना तसेच बड्या नेत्यांना तिकिटे दिल्याने संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी कालपासून "अ-9', "वर्षा' तसेच प्रदेश कार्यालयात गर्दी केली आहे. नाशिक येथे बाळासाहेब सानप यांना तिकीट दिले जाणार काय, याबद्दल दोन मते असल्याने पक्षात अस्वस्थता पसरली आहे. नागपुरात शहर अध्यक्ष राहिलेल्या सुधाकर कोहळे यांची आमदारकीची संधीही गेल्याने त्यांचे कार्यकर्ते नाराज आहेत. तेथे मोहन मते यांना उमेदवारी देण्यात आली. मुलुंड येथे सातत्याने निवडून येणाऱ्या तारासिंग यांचे वय 75 वर्षांपेक्षा अधिक असल्याने त्यांच्याजागी मिहीर कोटेचा यांना संधी मिळाली.

आयारामांना मिळालेल्या संधीमुळे निष्ठावंत कार्यकर्ते नाराज आहेत. विनोद तावडे यांनी आज "अ-9' या ठिकाणी धाव घेतली. तेथे चंद्रकांत पाटील यांनी त्यांची समजूत काढल्याचे समजते. 

शिवसेनेत विनोद घोसाळकर यांना मुंबईबाहेर पाठवले गेले तर तृप्ती सावंत यांना बांद्रयातून अद्याप उमेदवारी जाहीर झालेली नाही. काल रात्री उशिरापर्यंत "एबी' फॉर्म बदला, असे सांगणाऱ्या शिवसैनिकांची "मातोश्री'वर गर्दी होती. हा राग कार्यालयाबाहेर जाऊ नये, याची काळजी दोन्ही पक्षांकडून घेतली जात आहे. तसेच वडाळ्यातून भाजपने कालिदास कोळंबकर यांना तिकीट दिल्याने शिवसेनेच्या श्रद्धा जाधव बंडाच्या पवित्र्यात आहेत. 

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड मतदारसंघातील उमेदवारीला "आम्हाला पुण्याचाच उमेदवार पाहिजे'च्या फलकाने विरोध करण्यापासून सर्वदूर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नाराजी नोंदवली. मेधा कुलकर्णी यांनाच पुन्हा संधी द्या, या मागणीने पुणेकर विरोध नोंदवत आहेत.

कुलाब्याचे आमदार राज पुरोहित यांच्याऐवजी महापालिकेत उत्तम कामगिरी बजावणारे मकरंद नार्वेकर किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील राहुल नार्वेकर यांचा विचार होणार असल्याच्या चर्चेने पुरोहित संतापले आहेत. 

भाजपमधील आयात उमेदवार - शिवेंद्रराज भोसले (सातारा), संदीप किंवा गणेश नाईक (ऐरोली), वैभव पिचड (अकोले), राधाकृष्ण विखे पाटील (शिर्डी), हर्षवर्धन पाटील (इंदापूर), जयकुमार गोरे (माण), राणा जगजितसिंग (तुळजापूर), कालिदास कोळंबकर (वडाळा), मदन भोसले (वाई). 

शिवसेनेतील आयात उमेदवार - अब्दुल सत्तार (सिल्लोड), निर्मला गावित (इगतपुरी), संग्राम कुपेकर (चंदगड), भास्कर जाधव (गुहागर).


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra VidhanSabha 2019 Yuti Politics