
Crime News : फ्रीजनंतर आता बेड स्टोरेज; लिव्ह इन पार्टनरची हत्या करून पळून जाण्याचा प्रयत्न फसला!
मुंबईजवळ एका ३७ वर्षीय महिलेची तिच्या लिव्ह-इन पार्टनरने हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपीने तिचा मृतदेह त्यांच्या भाड्याच्या घरात बेडच्या स्टोरेज एरियामध्ये लपवून ठेवला होता, असे पोलिसांनी आज सांगितले. त्यानंतर आरोपी हार्दिक शाहने पालघर जिल्ह्यातून पळून जाण्याचा प्रयत्न केला पण त्याला रेल्वे पोलिसांनी अटक केली.
हार्दिक बेरोजगार होता तर मेघा ही परिचारिका म्हणून काम करत होती. तसंच ती घराचा खर्च उचलत होती. यावरून त्यांच्यात वारंवार भांडणे होत होती, ज्यामुळे खून झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
मेघाला मारल्यानंतर हार्दिकने घरातील काही वस्तू विकल्या आणि पैसे घेऊन फरार झाला. तो रेल्वेने पळून जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याचे ठिकाण शोधून काढले आणि रेल्वे पोलिसांनी त्याला मध्य प्रदेशातील नागदा येथून अटक केली.
गुन्हे शाखेचे पथक आरोपीला ताब्यात घेण्यासाठी जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असलेले हार्दिक आणि मेघा गेल्या सहा महिन्यांपासून एकत्र राहत होते. सुमारे महिनाभरापूर्वी ते भाड्याच्या घरात राहायला गेले होते. त्यांच्या शेजाऱ्यांनीही त्यांच्या वारंवार होणाऱ्या भांडणाची तक्रार केली, असेही पोलिसांनी सांगितले.