सहा ZP साठी मतदानाला सुरुवात, OBC आरक्षणामुळे दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Co-operative society elections
Co-operative society elections

मुंबई : अखेर राज्यात सहा जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या पोटनिवणुकांसाठी (maharashtra zp election 2021) आज मतदान होत आहे. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम, नागपूर या जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्या, तसेच पालघर जिल्हा परिषदेतील ओबीसी आरक्षण अतिरिक्त ठरल्यामुळे ओबीसी सद्स्यांचे सदस्यत्व रद्द झाले होते. त्यानंतर आता येथे पोटनिवणुका घेण्यात येत आहे. त्यासाठी आज सकाळी ८ वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली असून ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) गाजलेल्या मुद्द्यानंतर आता या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Co-operative society elections
पालघर : जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला धक्का

सहा ही मिनी मंत्रालयात ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. यावरून ओबीसी जनतेच्या मनात ओबीसी आरक्षणाविषयी असलेला रोष कमी करण्याचा प्रयत्न होतोय. नागपुरात चंद्रशेखर बावनकुळे यांनी विशेष लक्ष दिले आहे.

किती जागांसाठी मतदान -

  • धुळे – 15

  • नंदूरबार – 11

  • अकोला – 14

  • वाशिम -14

  • नागपूर -16

जिल्हा परिषदांची स्थिती काय?

नागपुरात काँग्रेस विरुद्ध भाजप सामना -

नागपूर जिल्हा परिषदेच्या १६ व पंचायत समितीच्या ३१ जागांसाठी होणाऱ्या या पोटनिवडणुकीत ६ लाख १६ हजार १६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. विजयासाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी केली आहे. जि.प.च्या १६ जागांसाठी ७९ तर पं.स.च्या ३१ जागांसाठी १२५ उमेदवार मैदानात आहेत. ही निवडणूक उमेदवारांपेक्षा नेत्यांसाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. कारण या निवडणुकीतील निकालावरच विधान परिषद निवडणुकीतील विजय-पराभवाचे गणित अवलंबून आहे. त्यामुळे ही निवडणूक जिंकण्यासाठी कॉंग्रेस व भाजपच्या नेत्यांनी पूर्ण ताकद झोकली आहे. कॉंग्रेसकडून मंत्री सुनील केदार, प्रदेश अध्यक्ष नाना पटोले व इतर नेत्यांनी धुरा सांभाळली तर भाजपकडून माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व अरविंद गजभिये यांनी प्रचाराची धुरा खांद्यावर घेतली.

नागपुरात दोन्ही काँग्रेस एकत्र, तर सेना-भाजप स्वतंत्र्य -

जिल्हा परिषदेत कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी करून निवडणूक लढत आहे. १० जागा कॉंग्रेस तर ५ जागा राष्‍ट्रवादीच्या वाट्याला आल्या. एक जागा शेकापला देण्यात आली. भाजप सर्व जागांवर लढत असून शिवसेनाही स्वतंत्रपणे निवडणूक लढत आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रिंगणात आहे.

अकोल्यात बच्चू कडूंची ओपनिंग लक्षवेधी ठरणार, तर वंचितची अग्निपरीक्षा

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांच्या आमदारांची प्रतीष्ठा पणाला लागली आहे. दुसरीकडे जिल्हा परिषदेतील सत्ता टिकविण्यासाठी ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या अनुपस्थितीत वंचित बहुजन आघाडीला अग्नीपरीक्षेस सामोरे जावे लागत आहे. काठावरच्या बहुमताने सत्तेत आलेल्या वंचित बहुजन आघाडीला ओबीसी सदस्यांचे पद रद्द झाल्याचा सर्वाधिक फटका बसला होता. त्यात ऐन निवडणुकीच्या तोंडावर ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याने ते निवडणुकीच्या प्रचारात सहभागी होऊ शकले नाही. त्यांच्या अनुपस्थितीत स्थानिक नेत्यांना किल्ला लढविताना शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आमदार नितीन देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर आणि विधान परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांचा सामना करावा लागला. राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील तीन घटक पक्षांपैकी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व प्रहार जनशक्ती पक्षाने एकत्र निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली होती, तर काँग्रेसने एकला चलोचा नारा दिला. या पोट निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील तिन्ही आमदारांची प्रतीष्ठा पणाला लागली. आमदार रणधीर सावरकर यांनी एकहाती किल्ला लढविला तर शिवसेना आमदार नितीन देशमुख यांच्या मदतीला शेवटच्या टप्प्यात खासदास अरविंद सावंत यांनी प्रचारामध्ये उडी घेतली होती. आमदार अमोल मिटकरी यांच्या गृह ग्रामातच निवडणुकीचा फड रंगला असल्याने त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे.

राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वातातील प्रहार जनशक्ती पक्षाने प्रथमच अकोला जिल्ह्यातील निवडणुकीत थेट सहभाग घेतला आहे. पक्षाच्या चिन्हावर नसले तरी शिवसेनेच्या नावाने हा पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. पालकमंत्र्यांची अकोला जिल्ह्यातील ही ‘ओपनिंग’ चांगलीच लक्षवेधी ठरणार आहे.

वाशिम जिल्हा परिषदेत तिरंगी लढत -

वाशीम परिषदेच्या १४ तर, पंचायत समितीच्या २७ जागांची पोटनिवडणूक होत आहे. जिल्ह्यात या निवडणुकीत प्रत्येक ठिकाणी अटातटीचा सामना होत आहे. जिल्हा परिषदेतील १४ जागा कोण घेणार? यावरच जिल्हा परिषदेतील सत्तासंतुलन अवलंबून असेल. रिसोड तालुक्यात कवठा गटात अपक्ष स्वप्निल सरनाईक, काँग्रेसकडून वैभव सरनाईक तर, शिवसेनेच्या मंगला सरनाईक असा, तिरंगी सामना होत आहे. गोभणी गटातून काँग्रेसच्या रेखा उगले, शिवसेनेच्या बेबी ठाकरे, जिल्हा विकास आघाडीच्या पुजा भूतेकर रिंगणात आहेत. भर जहागीर गटात वंचितचे अनिल गरकळ, भाजपचे विनोद नरवाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अमित खडसे, अपक्ष योगेश वाळके, पांगरी नवघरे गटातून सहा उमेदवार रिंगणात आहेत. कारंजा तालुक्यातील भामदेवी गटातून सहा उमेदवार, मानोरा तालुक्यातील कुपटा गटातून चार उमेदवार, तळप गटात चुरशीचा सामना होत असून, चार उमेदवाराचे भाग्य आज ठरणार आहे. फुलउमरी गटातही तीन उमेदवार आपले भाग्य अजमावत आहेत. वाशीम तालुक्यातील काटा गटात शिवसेनेच्या लता खानझोडे, राकाँच्या प्रियंका देशमुख, काँग्रेसच्या संध्या देशमुख, भाजपच्या रुंदा भिसे, वंचितच्या शालिनी राऊत, पार्डी टकमोर गटातून काँग्रेसचे विठ्ठल चौधरी, भाजपचे सुनिल चौधरी, राकाँचे विनोद पट्टेबहादूर, वंचितचे प्रल्हाद वाणी, अपक्ष सरस्वती चौधरी व रामेश्वर कालापाड, उकळीपेन गटात सर्वाधिक चुरस निर्माण झाली आहे या गटातून तब्बल बारा उमेदवार आपले भाग्य अजमावत आहेत.

धुळे जिल्हा परिषद -

धुळे जिल्हा परिषदेत 42 उमेदवार रिंगणात असून चार पंचायत समित्यांमध्ये ७५ उमेदवार रिंगणात आहेत. एकूण 5,50,572 मतदार असून आतापर्यंत शिरपूर तालुका 13 टक्के, शिंदखेडा व धुळे तालुका प्रत्येकी 10 टक्के, साक्री तालुका 9 टक्के मतदान झाले आहे.

पालघर जिल्हा परिषदेकडे सर्वांचं लक्ष, खासदार पुत्र रणांगणात

पालघर जिल्हा परिषदेच्या 15 जागा आणि जिल्ह्यातील पंच्यायत समितीच्या 14 जागांसाठी आज सकाळ पासून मतदानाला शांततेत सुरुवात झाली. महाविकास आघाडी राज्यावर सत्तेत आल्या नंतर जिल्हात होणारी ही पहिलीच निवडणूक आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढत नसून सर्वच पक्ष आपले नशीब अजमावण्यासाठी वेगवेगळे लढत असले तरी शिवसेनेने मात्र ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. या निवडणुकीत खासदार पुत्र उभे असल्याने साऱ्यांचे लक्ष पालघरवर लागले आहे. या निवडणुकीत सत्तेतील साऱ्याच पक्षाचे मंत्री ठाण मांडून बसल्याने निवडणुकीत रंग भरले गेल्याचे चित्र दिसत होते.

मीरा रोड येथून येऊन पालघरचे आमदार खासदार झालेल्या राजेंद्र गावित यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आपल्या मुलाला उतरवल्याने डहाणू तालुक्यातील वणई गट नकाशावर आला आहे. या गटात सहा रंगीत लढत होत असून, खासदार राजेंद्र गावित आणि बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी ही जागा प्रतिष्ठेची केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com