Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी आज महत्त्वाची बैठक

भाजपाने आता या राजकीय गोंधळात थेट एन्ट्री घेतली आहे.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavisesakal

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ या निवासस्थानी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आलीय. आज सकाळी ११ वाजता होणाऱ्या या बैठकीला महाराष्ट्र भाजपचे प्रभारी सीटी रवी हेही उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत सरकारच्या शपथविधी संबंधी चर्चा हेणार असल्याचं बोलले जातंय.

ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रतिक्रिया दिलीय. हिंदुत्त्वाची भूमिका धरून ठेवली असती, तर ही वेळ आली नसती, अशी खोचक टीका पाटलांनी केलीय. उद्धव ठाकरे जर राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत गेले नसते, तसेच त्यांनी हिंदुत्वाची भूमिका धरून ठेवली असती, तर ही वेळ आली नसती. सरकार बनवण्याचा दावा कधी करणार त्यावर निर्णय व्हायचा बाकी आहे. मी आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) दिल्लीशी बोलून यासंदर्भात निर्णय घेऊ. अजून याबाबत कोणता निर्णय घेतलेला नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

शिंदे गटातले बंडखोर आमदार गुवाहाटीहून गोव्यामध्ये काही वेळापूर्वीच दाखल झाले आहेत. उद्या सकाळी ते मुंबईकडे रवाना होणार आहे. गोव्यातल्या ताज हॉटेलमध्ये ते राहणार आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतही या आमदारांसोबत हॉटेलमध्ये गेले आहेत.

राजीनामा देऊन परतताना उद्धव ठाकरेंनी घेतलं देवदर्शन

राजभवनाशेजारीच असलेल्या खंडोबा मंदिरात ठाकरे गेले. त्यांच्यासोबत तेजस आणि आदित्य हे त्यांचे चिरंजीवही आहेत. या मंदिरात उद्धव ठाकरेंनी पूजाही केली आहे.

राज्यपालांनी राजीनामा स्विकारला असून त्यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळण्यास सांगितलं आहे. जनतेनी आमची परिस्थिती समजली आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या नीलम गोऱ्हे यांनी दिली आहे.

अधिकृतरित्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सुपूर्द

उद्धव ठाकरे यांनी अधिकृतरित्या आपला राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सुपुर्द केला आहे. स्वतः ड्राईव्ह करत उद्धव ठाकरे राजभवनावर पोहोचले. त्यांच्यासोबत आदित्य आणि तेजस हे त्यांचे दोन्ही पुत्रही आहेत. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी राजीनाम्याची घोषणा केली आहे. राज भावना बाहेर शिवसेना अंगार है बाकी सब भंगार है च्या घोषणा देण्यात आल्या.

Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySakal

महाविकास आघाडी सरकार पडताच तिकडे भाजपाच्या सर्व आमदारांची बैठक सुरू झाली आहे. देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत आहे. विधिमंडळाची बैठकही उद्या होणार असून त्यानंतर भाजपा सत्तास्थापनेचा दावा करु शकतं.

अनिल परब, निलम गोऱ्हे, मिलिंद नार्वेकर राजभवनावर दाखल झाले असून मुख्यमंत्र्यांचा राजीनामा ते राज्यपालांकडे देणार आहेत.

1 जुलैला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.

उद्या देवेंद्र फडणवीस हे राज्यपालाकडे सत्तास्थापनेचा दावा करणार असल्याची माहिती आहे.

उद्धव ठाकरे राजभवनकडे रवाना झाले असून आपला राजीनामा ते राज्यपालांकडे सुपूर्द करणार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला असून विधानपरिषद सदस्यत्वाचा सुद्धा राजीनामा दिला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले...

  • येवढे वर्षे आम्ही बोलत होतो पण आम्ही शेतकऱ्यांनी कर्जमुक्त केलं आहे त्याचा आनंद झाला.

  • स्वत: शिवसेनाप्रमुखांनी जे नाव ठेवलं ते नाव आपण संभाजीनगरला दिलं आहे.

  • पुढची वाटचाल सगळ्यांच्या आशिर्वादाने सुरू राहील. औरंगाबादच्या नामांतरावरून मला आनंद वाटला.

  • एखादी गोष्ट चांगली सुरू असली की त्याला दृष्ट लागते.

  • मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवेसनेचे ४ मंत्री उपस्थित होते. ज्यांना मोठं केलं ते आज विसरले. एवढे दिवस शिवसेना काय आहे ते अनुभवत आलोय.

  • साधी साधी माणसं आम्हाला प्रोत्साहन देत राहिली. ज्यांना दिलं ते नाराज आहेत, ज्यांना नाही दिलं ते खूष आहेत याचं वाईट वाटतं.

  • बाळासाहेबांनी अनेकांना मोठं केलं आहे.

  • कोर्टाने निर्णय दिला आहे, त्यामुळे आता न्यायालयाचा मान राखला पाहिजे, उद्या बहुमताला सामोरं जावं लागणार आहे, लोकशाहीचं पालन झालंच पाहिजे. लोकशाहीचा मान राखल्याबद्दल राज्यपालांचे आभार मानतो

  • काँग्रेसच्या अशोक चव्हाणांनी पण बैठकीनंतर सांगितलं की तुम्ही नाराज होवू नका आम्ही तुम्हाला बाहेरून पाठिंबा देतो.

  • केंद्राच्या सूचनेवरून मुंबईत सुरक्षा वाढवली जातेय. उद्या चीन सीमेवरील सुद्धा सुरक्षा मुंबईत येईल याची लाज वाटते. एवढी लाज सोडली? पण आमचा शिवसैनिक त्यांना कसलाच त्रास देणार नाही.

  • उद्या लोकशाही जन्माला येतीय त्याचाच पाळणा हलतोय.

  • उद्याच्या शिवसैनिकांना कुणीही आडवं येवू नये. तुम्हाला कोणीही अडवणार नाही.

  • उद्या शिवसेनाप्रमुखाच्या पोराला मुख्यमंत्रीपदावरून खाली खेचण्याचं पुण्य त्यांना लाभणार आहे. मला पद जाण्याची खंत अजिबात नाही, बहुमतामध्ये मला रस नाही.

  • मी आज मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत आहे. तसेच विधानपरिषद सदस्यत्वाचा सुद्धा राजीनामा देत आहे.

  • आता मी फक्त शिवसेनेचीच धुरा संभाळणार आहे.

काही क्षणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संबोधन करणार असून ते राजीनामा देण्याची शक्यता आहे. 

अनिल परब राजभवनात दाखल झाले आहेत.

उद्या अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना बहुमताच्या चाचणीसाठी हजर राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान थोड्याच वेळात मुख्यमंत्री संबोधन करणार असून ते राजीनामा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मविआचं भवितव्य धोक्यात; उद्या अग्निपरिक्षेला जावं लागणार सामोरं, कोर्टाचे आदेश

साडेतीन तासाच्या युक्तिवादानंतर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला असून महाविकास आघाडीला उद्या बहुमत चाचणीला सामोरं जावं लागणार आहे. त्यामुळे आता महाविकास सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले असले तरी आमदारांच्या अपात्रतेचा निकाल काय होईल याचाही विचार करण्यात येईल असंही स्पष्ट केलं आहे .

कोर्टरूममध्ये तिन्ही पक्षांचे वकील दाखल झाले आहेत. काही क्षणात कोर्टाचा निकाल समोर येणार आहे.

तब्बल साडेतीन तास चाललेला तिन्ही पक्षांचा युक्तिवाद संपला असून थोड्याच वेळात सुप्रीम कोर्टाचा निकाल येणार असून बहुमत चाचणी होणार की पुढे ढकलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. दरम्यान, यावर राज्यातील महाविकास आघाडी सरकारचं भविष्य ठरणार आहे.

सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांचा युक्तिवाद पूर्ण, सेनेच्या वकिलांचा प्रतियुक्तिवाद सुरू... रात्री ९ वाजता कोर्टाचा निर्णय येणार

सेनेचे वकील सिंघवी प्रतियुक्तिवादात म्हणाले...

  • विधानसभा अध्यक्ष चुकू शकतात पण राज्यपाल नाही असं कसं? याच राज्यपालांनी १२ आमदारांच्या नियुक्तीला १ वर्षापासून निर्णय दिला नाही. राज्यपाल हे सध्या राजकीय निर्णय घेत आहेत.

  • राज्यपाल म्हणजे 'पवित्र गाय' आहेत का? ते देवदूत नाहीत असा युक्तिवाद सिंघवी यांनी केला आहे.

  • बहुमत चाचणी आणि आमदारांची अपात्रता एकमेकांशी संबंधित आहेत.

  • राज्यपालांकडून निर्णय देण्याआधी मुख्यमंत्र्यांना विचारणाही केली नाही. अरूणाचलचे रेबिया प्रकरण इथे तंतोतंत लागू होऊ शकत नाही.

  • अपात्रतेची केस आधी घेण्यात यावी आणि बहुमत चाचणी एका आठवड्याने पुढे ढकलण्यात यावी असा युक्तिवाद सिंघवी यांनी केला आहे.

सॉलिसिटर जनरल तुषार मेहता हे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची बाजू कोर्टात मांडत आहेत

  • अध्यक्ष बहुमत प्रभावित करू शकत नाहीत. मतदान कोण करेल हे विधानसभा अध्यक्ष ठरवू शकत नाहीत. राज्यपालांच्या निर्णयांवर आक्षेप घेता येणार नाही, त्यांच्या निर्णयाची समीक्षा फक्त कोर्ट करू शकते. असा युक्तिवाद तुषार मेहता यांनी केला आहे.

  • राज्यपालांच्या निर्णयावर आक्षेप घेण्यासाठी अपुरी कारणे आहेत असं म्हणत तुषार मेहता यांच्याकडून कोर्टात राज्यपालांच्या आदेशाचं वाचन करण्यात येत आहे.

  • ३९ आमदारांना जीवाचा धोका होता असा मीडिया रिपोर्ट मेहता यांनी वाचून दाखवला आहे. तर याकडे राज्यपाल दुर्लक्ष करू शकत नाहीत असाही युक्तीवाद त्यांनी केला.

  • "विधानसभा अध्यक्षच आता २४ तासांच्या अवधीविषयी विचारतायत"

    विधानसभा उपाध्यक्षांनीच बंडखोर आमदारांना अपात्रतेच्या नोटीशीला उत्तर देण्यासाठी फक्त दोन दिवसांची वेळ दिली होती. आता तेच म्हणतायत की बहुमत चाचणीसाठी फक्त २४ तासांचाच अवधी का? – तुषार मेहता यांचा सवाल

बहुमत चाचणी रोखा म्हणणं नैसर्गिक न्यायाला धरून नाही असं शिंदे गटाचे वकीलांनी सांगितलं. तर सध्याची स्थिती अपरिवर्तनीय नाही असं न्यायाधिशांनी सांगितलं आहे. दरम्यान बहुमत चाचणी योग्य अधिकारांशिवाय झाल्यास रद्दबातल ठरवता येते असं कोर्टाने सांगितलं आहे.

एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे असा दावा एकनाथ शिंदे यांच्या वकिलांनी केला आहे.

शिंदे गटाने शिवसेना सोडलेली नाही - वकिलांचा दावा

शिंदे गटाने शिवसेना सोडलेली नाही असा दावा शिंदे गटाच्या वकिलांनी केला आहे. तर शिवसेनेच्या ५५ पैकी ३९ आमदार आमच्या गटात आहेत आणि या गटातील ३९ पैकी १६ जणांवर अपात्रतेची मागणी शिवसेनेकडून केली जात आहे. तसेच ९ अपक्षांचा आम्हाला पाठिंबा असून शिवसेनेतल्या उरलेल्या १६ आमदारांचा आम्हाला विरोध आहे असं कौल यांनी कोर्टाला सांगितलं आहे.

अपात्रतेचा निर्णय आणि बहुमत चाचणी या दोन वेगळ्या गोष्टी आहेत असा युक्तीवाद शिंदे यांच्या वकिलांनी केला आहे. यावेळी २०१९ च्या प्रकरणाचा दाखला वकील कौल यांच्याकडून देण्यात आला आहे आणि बहुमत चाचणीची परवानगी देण्यात यावी अशी मागणी कौल यांनी केली आहे.

शिंदे गट आणि शिवसेना या दोन्ही बाजूकडून सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद सुरू असून दोन तासांपासून जास्त वेळ ही सुनावणी सुरू आहे.

बहुमत चाचणीआधी मुख्यमंत्री राजीनामा देणार असून त्यांचं निरोपाचं भाषण होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

बहुमत चाचणीवर निर्णय घेण्याचा अधिकार राज्यपालांना - कौल 

कोरोनामुक्त झाल्यानंतर राज्यपालांनी आपलं कर्तव्य पूर्ण केलं आहे. सरकारकडे बहुमत नाही आणि बहुमत चाचणी लांबवणं चुकीचं आहे त्यामुळे उद्याच बहुमत चाचणी होणं गरजेच आहे. विधानसभा उपाध्यक्षांना कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार नाही कारण त्यांच्यावर अविश्वासाचा ठराव मांडला आहे. दरम्यान सिंघवी यांनी राज्यपालांविरोधात केलेला युक्तीवाद चुकीचा होता असा युक्तीवाद शिंदेंच्या वकिलांकडून करण्यात आला आहे.

राज्यपालांच्या निर्णयावर कोर्ट समीक्षा करू शकते पण या प्रकरणात खरंच समीक्षेची गरज आहे का? असा युक्तीवाज शिंदे गटाचे वकील कौल यांनी केला आहे.

कोर्टाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देण्याचा निर्णय घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.

शिंदे गटाचे वकील नीरज किशन कौल म्हणाले की, फ्लोर टेस्ट घेण्याचे सर्वाधिकार राज्यपालांना आहे. त्यामुळे राज्यपालांचा हा निर्णय इतका आक्षेपार्ह आहे का? असा प्रश्नदेखील कौल यांनी उपस्थित केला आहे. तसेच बहुमत चाचणी आधी घ्या, नंतर बाकीचे निर्णय घ्या असेही कौल यांनी म्हटले आहे.

सरकारच नाही तर पक्षही अल्पमतात - कौल 

कौल म्हणाले की, प्रलंबित अपात्रतेची कार्यवाही फ्लोर टेस्ट थांबवू शकत नाही. अपात्रता सिद्ध झाल्यास फ्लोर टेस्टही घेतली जाईल. ते म्हणाले की, केवळ सरकारच अल्पमतात नाही तर, सत्तेत असलेले पक्षही पक्षांतर्गत अल्पमतात आहेत. फ्लोअर टेस्ट लवकर करून घेण्याची विनंती केली जाते हे आपण पाहिले आहे. मात्र, हे सरकार फ्लोअर टेस्टला स्थगिती देण्याची मागणी करत असल्याचे कौल म्हणाले.

दरम्यान, सप्रीम कोर्टाच्या युक्तीवादादरम्यान, शिंदे यांच्या गटाने मुख्यमंत्री विश्वासदर्शक अल्पमतातील सरकार सत्तेत राहण्याचा प्रयत्न करतंय असे कौल म्हणाले. मुख्यमंत्री बहुमत चाचणीपासून वाचण्याचा का प्रयत्न करतायंत? असा प्रश्नदेखील कौल यांनी उपस्थित केला आहे.

मला सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद - मुख्यमंत्री

राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक संपल्यानंतर मला सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले आहे. याशिवाय माझ्याच लोकांनी दगा दिल्यानं ही परिस्थिती ओढावल्याचं ठाकरे यांनी म्हटले आहे. ज्या खात्याचं विषय राहिले ते पुढच्या कॅबिनेटमध्ये घेऊ असा विश्वासही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. तसेच यावेळी काही चूक झाली असेल तर, माफ करा असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.

कोर्टात आलो तेव्हाच आमच्याकडे बहुमत होते. एकनाथ शिंदे यांचे वकील कौल यांनी म्हटले आहे. याशिवाय बहुमत चाचणीला उशीर होऊ नये. सभागृहाचा विश्वास समजण्यासाठी बहुमत चाचणी गरजेची असेही कौल म्हणाले. तसेच उपाध्यक्षांना पदावरून हटवल्याशिवाय अपात्रतेसंदर्भातला निर्णय घेता येणार नसल्याचेही कौल यांनी म्हटले आहे.

शिंदे गटांचे वकील कौल यांचा युक्तिवाद सुरू 

सिंघवी यांनी कोर्टात युक्तीवाद करताना मध्यप्रदेशमधील केसचा दाखला दिला आणि बहुमत चाचणीच्या आधी आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय घेण्यात यावा अशी मागणी केली. त्यावर स्पष्टीकरण देताना मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राची परिस्थिती वेगळी आहे, मध्यप्रदेशातील विधानसभा अध्यक्षांना अधिकार होता पण महाराष्ट्रातील विधानसभा उपाध्यक्षांच्या विरोधात अविश्वाचा ठराव दाखल करण्यात आला आहे, त्यामुळे मध्यप्रदेशच्या निकालाचा दाखला देता येणार नाही असं स्पष्टीकरण कोर्टाने दिलं आहे.

उद्या बहुमत चाचणी होणार असून बंडखोर आमदारसुद्धा उद्या मुंबईत येणार असून सुरक्षेच्या कारणास्तव मुंबईत सीआरपीएफचे (CRPF) २ हजार जवान दाखल झाले आहेत. तीन विमानांनी जवान मुंबईत दाखल झाले आहेत. तर बंडखोर आमदारांच्या सुरक्षेची काळजी घेतली जाणार आहे.

दरम्यान मंत्रिमंडळाच्या बैठकीत काँग्रेसच्या नेत्यांनी पुण्याचे नाव जिजाऊनगर करा अशी मागणी करण्यात आली आहे. तर शिवडी न्हावाशेवा मार्गाला बॅ.ए. अंंतुले यांचं नाव आणि नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी काँग्रेसने मंत्रिमंडळाच्या बैठकीत केली आहे.

बहुमत चाचणी उद्या केली नाही तर आभाळ कोसळेल का? असा युक्तिवाद सिंघवी यांनी केला आहे. राज्यपालांनी घेतलेल्या निर्णयाची समीक्षा करण्याचे कोर्टाला अधिकार आहेत असंही ते म्हणाले आहेत.

बहुमत चाचणीच्या सुनावणीत काय झाला युक्तीवाद?

  • शिवसेनेचे वकील शिंघवी म्हणाले की आम्हाला सात ते आठ मुद्दे मांडायचे आहेत. ही बहुमत चाचणीसाठी खूप कमी वेळ देण्यात आला आहे. चाचणीसाठी सर्व आमदार हजर हवेत तरंच ती खरी ठरेल. एवढ्या वेगानं बहुमत चाचणीची मागणी का? असा युक्तीवाद शिवसेनेच्या वकिलांनी केला आहे.

  • मतदानासाठी कोण पात्र कोण अपात्र हे आधी ठरवायला हवं. अपात्रतेबाबत निर्णय नसताना बहुमत चाचणीसाठी एवढी घाई का? दोन बहुमत चाचणीसाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी हवा असा युक्तीवाद सिंघवी यांनी केला. दरम्यान अपात्रतेचा निर्णय आणि बहुमत चाचणीचा काय संबंध असा सवाल कोर्टाने शिवसेनेच्या वकिलांना केला आहे.

  • आधी अपात्रतेचा निर्णय व्हावा आणि त्यानंतर बहुमत चाचणीसाठी मागणी करण्यात यावी नाहीतर सध्या बंड केलेले आमदार मतदान करण्यासाठी पात्र ठरतील. ११ तारखेच्या कोर्टाच्या आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयानंतर बहुमत चाचणी करण्यात यावी असा युक्तीवाद सिंघवी यांनी केला आहे.

  • सिंघवी यांनी केलेल्या युक्तीवादावर उत्तर देताना, आमदारांच्या अपात्रतेवर अध्यक्षांनी कारवाई सुरू केली होती पण त्याच्यानंतर कुणीतरी आक्षेप घेतला असं कोर्टाने सांगितलं आहे.

  • विधानसभेच्या उपाध्यक्षांच्या विरोधात अविश्वाचा ठराव दाखल करण्यात आला होता त्यामुळे आमदारांना वेळ वाढवून दिला होता असं कोर्टाने सांगितलं आहे.

  • सिंघवी यांनी युक्तीवाद करताना राजेंद्र सिंह राणा यांच्या केसचा दाखला दिला आहे.

  • उद्या या आमदारांना मतदान करू देणं हे संविधानाच्या विरोधात आहे. राज्यपालांकडून खूप घाईने हा निर्णय घेण्यात आला, विरोधी पक्षनेत्याच्या सल्ल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणं गरजेचं आहे असा युक्तीवाद शिवसेनेच्या वकिलांकडून करण्यात आला आहे.

  • राज्यपालांनी बंडखोर आमदारांचे पत्र एक आठवडा तसंच ठेवून घेतलं, त्यांनी पत्र तपासलं नाही. आमदारांवर पक्षांतरबंदी कायद्यातून कारवाई न होण्यासाठी हे प्रयत्न केले जात आहेत असा आरोप सिंघवी यांनी केला आहे. बंडखोरांनी अनाधिकृत मेलवरून राज्यपालांना मेल पाठवला. तसेच कोरोनामुक्त होताच राज्यपाल विरोधी पक्षनेत्यांना भेटले. आणि लगेच निर्णय घेतला ते ११ जुलै पर्यंत वाट का नाही बघत? असा युक्तीवाद सिंघवी यांनी केला आहे.

  • दरम्यान राज्यपालाचे समाधान झाले यावर संशय का घ्यावा असा सवाल कोर्टाने व्यक्त केला आहे.

  • सगळे निर्णय कोर्टात आणले जावू नयेत, काही निर्णय विधीमंडळात घेण्यात यावेत असं कोर्टाने सांगितलं आहे.

३४ आमदारांनी राज्यपालांना दिलेल्या पत्राचं वाचन शिवसेनेच्या वकिलांकडून सुरू

बहुमत चाचणीवर सुप्रीम कोर्टाचा निर्णय

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या निर्देशांना आव्हान देणाऱ्या राज्य सरकारच्या याचिकेवर सुनावणीसाठी ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी सुनील प्रभू यांची अर्थात राज्य सरकारची बाजू मांडत आहेत. दुसरीकडे ज्येष्ठ वकील नीरज किशन कौल हे एकनाथ शिंदे अर्थात बंडखोर आमदारांच्या गटाची बाजू मांडत आहेत. तर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता हे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची बाजू मांडत आहेत.

अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी बहुमत चाचणीसाठी मतदान करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान मंत्रिमंडळाच्या बैठकीला अजित पवार आणि छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाल्याने ते ऑनलाईन उपस्थिती लावणार आहेत.

"गेल्या काही दिवसांत शासनाने अनेक GR काढले आहेत. मात्र मराठा आरक्षण व आझाद मैदानावरील उपोषणावेळी समाजाला दिलेली आश्वासने शासनाने विसरू नयेत. शासकीय नोकरीत निवड होऊनही नियुक्ती न मिळालेल्या मराठा उमेदवारांच्या कायमस्वरूपी नियुक्तीचा GR देखील काढावा." असं छत्रपती संभाजीराजे यांनी ट्वीट करत म्हटलं आहे.

आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला मुख्यमंत्री रवाना झाले आहेत. दरम्यान इकडे शिवसेनेचे वकील सुप्रीम कोर्टात दाखल झाले असून थोड्याच वेळात सुनावणी होणार आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीला आदित्य ठाकरे, अनिल परब, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेत काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते उपस्थित राहणार आहेत.

शिवसेनेचा वेगळाच पॅटर्न: मिलिंद नार्वेकर दिल्लीला रवाना झाल्याची माहिती समोर येत आहे.

थोड्याच वेळात शिंदे गट गोव्याला येण्यासाठी रवाना होणार आहे.

राज्यपालांनी आज सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी पत्र दिले होते. त्यानुसार शिवसेनेला आणि महाविकासआघाडीला बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. पण एका दिवसाचा कालावधी असल्यामुळे शिवसेनेने सुप्रीम कोर्टात धाव घेत या पत्राविरोधात याचिका दाखल केली होती. त्यावर थोड्या वेळात सुनावणी होणार आहे.

आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेना औरंगाबादच्या नामांतराचा प्रस्ताव आणणार आहे. औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव आणि नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यावर शिवसेना ठाम आहे. हे प्रस्ताव आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणले जाणार आहेत. दरम्यान काल नामांतराचे प्रस्ताव बैठकीत मांडले असल्याची माहिती शिवसेना नेते अनिल परब यांनी दिली होती.

बंडखोर आमदार मुंबईला येण्यासाठी तयार आहेत. थोड्याच वेळात ते मुंबईला येण्यासाठी रवाना होणार आहेत.

पुणे शिवसेनेचे नेचे विजय शिवतारे शिंदे गटात सामील होणार आहेत. आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे पुण्यात शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे.

मलिक, देशमुख यांची बहुमत चाचणीसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव

तुरुंगात असलेले महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फ्लोर टेस्टमध्ये मतदानाचा हक्क मागण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी दोघांनी मतदानाचा हक्क मागितला होता. मात्र, त्यांना मतदानाचा हक्क नाकारण्यात आला होता. त्यामुळे महाविकास आघाडीचे दोन मते कमी झाले होते. तसेच विधान परिषदेच्या वेळेही नवाब मलिक आणि अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी पुन्हा कोर्टात धाव घेतली होती. यावेळी त्यांना कोर्टाने मतदानाचा हक्क नाकारला होता.

राज ठाकरे यांनी भाजपला सपोर्ट केला आहे. मनसे आता उद्याच्या बहुमत चाचणीत भाजपाच्या बाजूने मतदान करणार आहे. मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील हे भाजपाच्या बाजूने मतदान करतील.

राज्यपालांनी बहुमत चाचणी घेण्याचे निर्देश दिल्यानंतर भाजपच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. आकड्यांचं समीकरण जुळवून आणल्याने फडणवीसांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा झालाय. यामुळे भाजप नेत्यांनी फडणवीसांच्या अभिनंदनाचे ट्वीट करण्यास सुरुवात केली आहे. आमदार अतुल भातखळकर यांनीही ट्वीट करत 'पुन्हा फडणवीस येणारच...' असं म्हटलंय.

विजय आमचाच! - एकनाथ शिंदे

५० लोक आमच्यासोबत आहेत. त्यामुळे आम्हाला बहुमत चाचणीची काळजी नाही. आम्हाला कोणी रोखू शकत नाही. या देशात संविधानापुढे कोणी जाऊ शकत नाही. ही बाळासाहेब आणि दिघेंच्या विचारांना पुढे नेणारी शिवसेना आहे. महाराष्ट्राला प्रगतिपथावर नेण्यासाठी ही शिवसेना पुढे घेऊन जातोय.आम्ही सगळ्या कायदेशीर प्रक्रियेत सहभागी होणार. आम्हाला प्रक्रिया माहित आहे. लोकशाहीत बहुमत महत्त्वाचं असतं. विजय आमचाच आहे, अशी भावना एकनाथ शिंदेंनी कामाख्या देवीचं दर्शन घेतल्यानंतर व्यक्त केली आहे. उद्या बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला भेट देणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोण असतील ते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे ठरवतील, असं विधान दीपक केसरकरांनी केलं आहे. उध्दव ठाकरे यांनी महविकास आघाडी तोडावी अशी कालपर्यंत आम्ही त्यांना विनंती केली, पण आता उशीर झालाय, असंही ते म्हणाले.

आसामच्या मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांचे आभार मानले!

शिंदे साहेब व शिवसेनेचे सर्व आमदार तसेच सहयोगी आमदारानचे धन्यवाद आपण आसामच्या महापुरा साठी ५१ लाखाची मुख्यमंत्री मदत निधी केली आपले खुप आभारी आहोत, असं ट्वीट आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सर्मा यांनी केलं आहे. एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदारांनी आसाममधल्या पूरग्रस्तांना ५१ लाखांची मदत केली आहे.

शिंदे गटाच्या संरक्षणासाठी भाजपा सतर्क; 'आरेला कारे'चीही तयारी

शिंदे गटातील आमदारांच्या संरक्षणासाठी भाजपा सज्ज झालं आहे. शिवसेना उद्या आक्रमक झाली तर भाजपा देखील देणार जशास तसे उत्तर देण्याची तयारी करत आहे. शिंदे गट उद्या मुंबईत येणार असल्याने शिवसैनिक रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे. मात्र या शिंदे गटातील आमदारांसाठी भाजपने देखील रस्त्यावर उतरण्याची तयारी केली. शिंदे गटाच्या समर्थनासाठी आता भाजपनंतर छावा संघटना देखील रस्त्यावर उतरणार आहे. छावा संघटनेचे 2 हजार कार्यकर्ते रस्त्यावर येणार असून उद्या विमानतळ ते विधानभवनापर्यंत आमदाराना संरक्षण देण्यात येणार आहे.

ठाकरे गटातल्या आमदारांना मातोश्रीहून बोलावणं!

ठाकरे गटातील आमदारांना मुंबईत पोहचण्याचे मातोश्रीवरून आदेश देण्यात आले आहेत. त्यांनी आपापल्या मतदारसंघात गेलेल्या आमदारांना मुंबईत बोलवले आहे. मतदार संघात परतलेले सेनेचे आमदार संध्याकाळपर्यंत मुंबईत पोहचणार.

टपरीवाला कसा चुना लावतो, ते वेळ आल्यावर दाखवेन - गुलाबराव पाटील

टपरीवाला कसा चुना लावतो ते वेळ आल्यानंतर त्यांना दाखवेन, अशा शब्दांत गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे. 302 काय असतं, 40 डिग्री तापमानात दिवसात 35 कार्यकर्त्यांची लग्नं लावणं, रात्री 12 वाजता पण फोनवर उपलब्ध असणं काय असतं राऊतांना माहिती नाही, असंही ते म्हणाले आहेत.

आता पवारच तारणहार... शिवसेनेसह राष्ट्रवादीचे नेते 'सिल्व्हर ओक'वर

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजप आणि शिंदेंच्या बंडाळीने राज्य सरकारला घेरल्याचं स्पष्ट आहे. फडणवीसांनी खेळी यामुळे यशस्वी होत असल्याचं दिसतंय. पण आता महाविकास आघाडीचे सगळे नेते शरद पवार यांच्या सिल्व्हर ओकवर दाखल झाले आहेत. पवारांच्या घरी राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांची खलबतं सुरू आहेत.

एकनाथ शिंदेंसह बंडखोरांकडून आसाममधल्या पूरग्रस्तांना मदत जाहीर

आसाम मधील पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी शिवसेनेचे सर्व आमदार तसेच सहयोगी आमदारांच्या वतीने आसाम मुख्यमंत्री मदत निधीत 51 लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय.

Devendra Fadnavis
एकनाथ शिंदेंसह बंडखोरांकडून आसाममधल्या पूरग्रस्तांना मदत जाहीर

महाराष्ट्राचे अॅडव्होकेट जनरल आशितोष कुंभकोणी राजभवनावर दाखल झाले आहेत. राज्यपालांच्या निर्देशांविरोधात शिवसेनेचे दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात संध्याकाळी तातडीची सुनावणी होणार आहे.

राज्यपाल दहपशाहीखाली?; अमोल मिटकरींचं ट्वीट चर्चेत

महामहिम राज्यपाल महोदय दडपशाहीखाली आहेत का हे सुद्धा तपासले पाहिजे. इकडे सोळा आमदारांचा निर्णय अजूनपर्यंत होत नाही आणि बहुमत चाचणीचा आदेश एका रात्रीत निघतो, हे कसे? नक्कीच काहीतरी गडबड आहे, असं ट्वीट राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलं आहे.

शिवसेनेचं राज्यपालांना आव्हान

उद्या विधानसभेत बहुमत चाचणी घेऊन महाविकासआघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्याच्या राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निर्देशाला शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. यावर आज संध्याकाळी ५ वाजता सुनावणी होणार आहे.

आधी गोवा, मग मुंबई; शिंदेगट तयार

आज खाजगी विमानाने सर्व आमदार साडेचार वाजताच्या दरम्यान गोव्यात पोहोचतील. ताजमध्ये 71 खोल्या राखीव करण्यात आलेल्या आहेत. एकनाथ शिंदेंसह 51 आमदार हे गोव्यामध्ये 'ताज कन्वेंशन' या हॉटेलमध्ये थांबतील आणि उद्या सकाळी मुंबईला पोहचतील.

'...भारतीय घटनेची पायमल्ली'; PM मोदी आणि फडणवीसांना टॅग करत संजय राऊतांचं ट्वीट

16 आमदार निलंबन प्रकरणी.. दोन दिवस कमी मुदत दिली म्हणून कोर्ट आमदारांना त्यांची बाजू मांडण्यासाठी११जुलै पर्यंत मुदत देते आणि राज्याचया विधान सभेचे आधिवेशन १ दिवसात बोलावतात हा फक्त अन्यायच नाही तर भारतीय घटनेची पायमल्ली आहे, असं ट्वीट शिवसेना खासदार संजय राऊतांनी केलं आहे.

शिवसेना सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यास सांगितल्यामुळे आता शिवसेना सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे. वृत्तांनुसार अपक्ष आमदारांचा गट हा कोश्यारी यांच्याकडे जाऊ शकतो. त्यांच्याकडून महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याचे सांगितले जाऊ शकते. त्यामुळे सरकार बहुमत गमवेल. महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेच्या वेळी हेच अपक्ष आमदारांनी ठाकरे यांना पाठिंबा दिला होता.

राज्यातल्या राजकीय गोंधळात ममता बॅनर्जींची उडी

महाराष्ट्रातलं सरकार पाडण्यासाठी भाजपा कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. राज्यातलं निवडून आलेलं सरकार पाडण्यासाठी एवढे पैसे त्यांच्याकडे कुठून येतायत? आपल्या देशातली लोकशाही कोणत्या दिशेने चाललीये. संसदीय संरचनेचं काय? भाजपाने सगळ्यावरच बुलडोझर चालवण्याचं ठरवलंय का?, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत.

कामाख्या देवीच्या मंदिरात दर्शनासाठी एकनाथ शिंदे गेले आहेत.

बहुमत चाचणीसाठी आपण उद्या मुंबईत जाणार असल्याची माहिती यावेळी एकनाथ शिंदेंनी दिली. एकनाथ शिंदे सर्व आमदारांसह मुंबईत पोहोचणार आहेत.

बहुमत सिद्ध करा; राज्यपालांचे ठाकरे सरकारला निर्देश

बहुमत सिद्ध करण्याचे पत्राद्वारे निर्देश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरे सरकारला दिले आहेत. राज्यपालांकडून बहुमत सिद्ध करण्यासाठीचे आदेश देणारं पत्र विधाभवन सचिवालय आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाठवण्यात आलं आहे.

एकनाथ शिंदे कामाख्या मंदिरात दर्शनासाठी रवाना

बंडखोरांचं नेतृत्व करणारे शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे गुवाहाटीतील प्रसिद्ध कामाख्या मंदिरात दर्शनासाठी रॅडिसन ब्लू हॉटेलमधून निघाले आहेत. बाकीचे आमदार दुपारी मंदिरात जातील.

महाराष्ट्रातलं महाविकास आघाडी सरकार आता धोक्यात येण्याची स्पष्ट चिन्हं दिसू लागली आहेत. भाजपाने आता या राजकीय गोंधळात थेट एन्ट्री घेतली आहे. महाविकास आघाडी सरकारने बहुमत सिद्ध करावी या मागणीसाठी आम्ही राज्यपालांकडे गेलो असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. त्यांनी सरकारच्या बहुमत चाचणीचं पत्रही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिलं आहे. त्यामुळे आता राज्यपालांच्या भूमिकेवर ठाकरे सरकारचं भवितव्य ठरणार आहे. राज्यातल्या राजकीय गोंधळाचे ताजे अपडेट्स येथे जाणून घ्या.. (Maharashtra Politics)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com