‘महाविकास’च्या जन्माची द्विवर्षपूर्ती

आजचा दिवस ठरला प्रादेशिक राजकारणास कलाटणी देणारा
mahavikas aghadi
mahavikas aghadisakal media

मुंबई : ‘‘साहेब पुण्याला निघालेत, सोबत प्रतिभाकाकी आहेत.’’ राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांचे वाक्य ऐकून समोरच्या घडामोडींचा अंदाज आला. मुंबईमध्ये राजकीय वर्तुळात अचानक फोनाफोनी सुरू झाली होती. शिवसेनेचे नेते संजय राऊत अनेकांशी संपर्क साधत होते. ‘मातोश्री’कडूनही चाचपणी सुरू झाली होती. शरद पवारांनी सावधपणे जनतेचा कौल मान्य केला पण प्रत्यक्षात पडद्याआड वेगळ्याच समीकरणांची उभारणी सुरू होती. देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारी महाविकास आघाडी सह्याद्रीच्या कुशीत आकाराला येत होती.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. भाजप १०५ आमदारांसह सर्वांत मोठा पक्ष झाला तर त्यापाठोपाठ ५८ आमदारांची विजयी सलामी देत शिवसेनेने दुसरे स्थान गाठले. भाजप आणि शिवसेना युती असल्याने पूर्ण बहुमत या युतीचे होते. पण हे यश भाजपला अपेक्षित नव्हते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या विरोधी पक्षांच्या पारड्यात देखील शतकी फळ पडले होते.

निकालाचा हा दिवस भाजपसाठी आनंदोत्सवाचा होता. पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावर विराजमान होणार म्हणून हा जल्लोष सुरू झाला होता. पण यामध्ये शिवसेनेला कुठेही स्थान नव्हते. निकाल युतीच्या बाजूने लागले पण भाजपने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना डावलून जल्लोष केला. देवेंद्र फडणवीस यांनीही ठाकरेंशी संपर्क करणे टाळले होते. बंद खोलीत ठरलेल्या युतीच्या सत्तावाटपाटचे सूत्र भाजप विसरल्याची खंत मातोश्रीवरून व्यक्त होत होती. एका बाजूला भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांचा जल्लोष होता तर दुसऱ्या बाजूला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची घालमेल असे चित्र पाहायला मिळत होते.

नव्या समीकरणांचा जन्म

या राजकीय घडामोडी अनपेक्षित असल्या तरी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी अपेक्षितपणे घडल्या. १०५ आमदारांसह सर्वांत मोठा पक्ष असलेला भाजप विजयाचे पेढे वाटत असताना मित्रपक्ष शिवसेनेला विसरला होता. युतीत लढलो म्हणून शिवसेनेला गृहीत धरताना भाजप एकतर्फी विजयोत्सव साजरा करत होता. भाजपचा हा जल्लोष शिवसेनेला मान्य नव्हता. कारण भाजपला १०५ ठिकाणी यश मिळाले असले तरी बहुमत नव्हते. यातूनच शिवसेनेचा स्वाभिमान दुखावला अन्‌ महाविकास आघाडीचा जन्म झाला.

मैलाचा दगड

आजच्या दिवशी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळाले. निकालाच्या अगोदर अनेक सर्वेक्षणात या दोन्ही पक्षांना एकत्रितपणे तीसपेक्षा अधिक जागा मिळणार नाहीत असे अंदाज होते पण प्रत्यक्षात या दोन्ही पक्षांनी नव्वदच्या पुढे जागा जिंकल्या आणि भाजपला सत्तास्थापनेचे आव्हान दिले. २०१९ चा आजच्या दिवशीचा विधानसभेचा निकाल हा भाजपविरोधी राष्ट्रीय आघाडी उभारण्यासाठी एक मैलाचा दगड ठरला हे नाकारता येणार नाही.

महाविकास आघाडीची पायाभरणी

राष्ट्रवादीला ५४ तर काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या होत्या. आजच्या दिवशीच महाराष्ट्रात नव्या राजकीय आघाडीचे सूत्र जुळविण्याचे संकेत देताना उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. युतीत लढण्याची गरज भाजपची होती त्यांची ती मजबुरी होती पण आमची देखील काही मजबुरी आहे असे स्पष्ट करत ठाकरे यांनी भाजपला सूचक इशारा दिला. नेमकी हीच संधी साधत शंभरीच्या आसपास पोचलेल्या काँग्रेस- राष्ट्रवादीच्या आघाडीने शिवसेनेसोबत सत्तेचा डाव मांडण्याची खेळी केली. ‘राष्ट्रवादी’चे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चेची तयारी केली तर काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांना दिल्लीतील पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून महाविकास आघाडी सरकारची स्थापना करण्याची विनंती केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com