
Nagpur MLC Election : नागपूरमध्येच भाजपला धक्का! सुधाकर अडबाले यांचा विजय
नागपूरः नागपूर शिक्षक मतदारसंघाचा निकाल हाती आलेला असून भाजप पुरस्कृत नागो गाणार यांचा पराभव झालेला आहे. तर महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले यांचा विजय झालेला आहे.
नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघासाठी २२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. आज सकाळी ८ वाजण्यापासूनच मतमोजणीला सुरुवात झाली. नागो गाणार हे भाजप समर्थित शिक्षक परिषदेचे उमेदवार होते. मागील दोन टर्म गाणार हे आमदार होते. ते हॅटट्रिक करतील, असं सांगितलं जात होतं.
परंतु महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले हे विजयी झालेले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्विट करुन ही माहिती दिली. नागपूरमधली सहा जिल्ह्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली होती. तब्बल ८६.२६ टक्के मतदान झाले होते.
३९ हजार ८३४ मतदारांपैकी ३४ हजार ३५९ मतदारांनी मतदान केलेलं. आज निकाल हाती येताच आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. भाजपच्याच बालेकिल्ल्यात भाजप उमेदवाराचा परभव झाला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्विट करुन सांगितलं की, भाजप मातृसंस्थेच्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडीचा भाजपला दणका. नागपूर शिक्षक मतदारसंघातून महाविकास आघाडीचे सुधाकर अडबाले विजीय.. असं ट्विट पटोलेंनी केलं आहे.