‘महाविकास’चा बैठकींचा धडाका

सकाळ न्यूज नेटवर्क 
बुधवार, 22 जानेवारी 2020

महाविकास आघाडीने कामांचा धडाका लावला असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह काही मंत्र्यांनी विविध बैठका घेत कामे मार्गी लावण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

मुंबई - महाविकास आघाडीने कामांचा धडाका लावला असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह काही मंत्र्यांनी विविध बैठका घेत कामे मार्गी लावण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. राज्यातील शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करणे, कौशल्यविकास अभ्यासक्रम तयार करणे, पाणीपुरवठा योजनांचे पुनरुज्जीवन आणि ‘शिवछत्रपती’ पुरस्कार या मुद्द्यांवर निर्णय घेण्यात आले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यात कार्यरत असलेल्या विविध मंडळांच्या शाळांमधून मराठी विषय सक्तीचा करण्यासंदर्भातील कायदा येत्या अधिवेशनात मांडण्यात येणार असून, या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी मराठी भाषा विभागमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. 

इयत्ता बारावीपर्यंत शालेय अभ्यासक्रमात मराठी विषय अनिवार्य करणारा मराठी शिक्षण अधिनियम लागू करण्यासाठी मराठी भाषा विभागाकडून समिती गठित करण्यात आली होती. विधी व न्याय विभागाने अन्य राज्यांचे अधिनियम व केंद्रीय शिक्षण हक्क अधिनियम २००९ च्या तरतुदी लक्षात घेऊन अभिप्राय दिले आहेत. हा कायदा लागू करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून मराठी भाषा विभागाला सहकार्य केले जाईल. देसाई यांनी अधिवेशनात मांडावयाच्या अन्य राज्यांच्या कायद्याच्या धर्तीवर तयार करण्यात आलेल्या मराठी भाषा अधिनियम प्रस्तावावर विस्तृत चर्चा केली व मार्गदर्शन केले. ते म्हणाले, कायदा तयार करताना त्यातील तरतुदींचे पालन करणे सर्व शाळांना सुलभ व्हावे. फिरतीची नौकरी असणाऱ्या पालकांच्या पाल्यांना बाहेरील राज्यातून महाराष्ट्रात आल्यानंतर वरच्या वर्गात मराठी विषय घेणे अवघड होईल, तेव्हा त्यांना यातून सूट मिळावी, यासाठीची तरतूदही त्यात असावी. मराठीचा वापर वाढावा, यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन परस्पर समन्वयाने कार्यवाही करण्याची गरज त्यांनी या वेळी व्यक्त केली.

कौशल्य विकासचे अभ्यासक्रम आखा
राज्यात येणारे खासगी, सार्वजनिक प्रकल्प, नवनवीन उद्योग यांना ज्या प्रकारचे कुशल मनुष्यबळ लागते आणि त्याची माहिती घेऊन तसेच रोजगाराच्या संधी लक्षात घेऊन त्याप्रमाणे कौशल्य विकासविषयक अभ्यासक्रम तयार करण्यात यावेत, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कौशल्य विकास विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. ठाकरे म्हणाले, कौशल्य विकासविषयक अभ्यासक्रमांचे जिल्हानिहाय नियोजन करणे गरजेचे आहे. त्या त्या भागातील गरजा, तेथील उद्योग, लघुउद्योग, उत्पादनसाधने आदींची माहिती घेऊन त्या अनुषंगाने अभ्यासक्रमांची आखणी होणे गरजेचे आहे.

बंद पाणीपुरवठा योजनांचे पुनरुज्जीवन
राज्यात अनेक प्रादेशिक पाणीपुरवठा योजना देखभाल-दुरुस्तीअभावी बंद पडलेल्या आहेत. त्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पाणीपुरवठा कार्यक्रम टप्पा-२ राबविण्याबाबतचा प्रस्ताव तत्काळ सादर करावा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या कामात सुधारणा करण्याच्या दृष्टीने आवश्‍यक ते धोरणात्मक निर्णय घ्यावेत, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. त्यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या कामाची आढावा बैठक झाली.

शिवजयंतीला शिवछत्रपती पुरस्कार
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी शिवछत्रपती पुरस्कारांचे वितरण करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत पवार बोलत होते. पवार म्हणाले की, राज्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी अत्याधुनिक क्रीडा संकुल, खेळाडूंना देण्यात येणारा भोजन भत्ता, पायाभूत सुविधांसह खेळाचे साहित्य घेण्यासाठी मागील वर्षीपेक्षा या वर्षी अधिकची आर्थिक तरतूद करण्यात येणार आहे. महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनला देय असलेली रक्कम तत्काळ वितरित करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी या वेळी दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahavikas Meetings