प्रशासनात मोठे फेरबदल ; वित्त विभागात यूपीएस मदान

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 मे 2018

सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांची नियुक्‍ती मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव पदावर करण्यात आली असून, दिल्लीतील राजशिष्टाचार आयुक्‍त लोकेश चंद्रा यांची बदली सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर करण्यात आली आहे.

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रशासनात मोठे फेरबदल केले असून, तब्बल 27 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. राज्याच्या मुख्य सचिव पदावर डी. के. जैन यांची नियुक्‍ती केल्यानंतर त्यांच्या जागी वित्त विभागाच्या अपर मुख्य सचिव पदावर एमएमआरडीएचे आयुक्‍त यूपीएस मदान यांची नियुक्‍ती केली आहे. वित्त विभागातील व्ययचे प्रधान सचिव आर. ए. राजीव यांच्याकडे एमएमआरडीएच्या आयुक्‍त पदाचा कार्यभार सोपविला आहे. 

सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांची नियुक्‍ती मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव पदावर करण्यात आली असून, दिल्लीतील राजशिष्टाचार आयुक्‍त लोकेश चंद्रा यांची बदली सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला साडेतीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर प्रशासनातील बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या प्रस्तावित होत्या. 30 एप्रिल रोजी सुमीत मलिक सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी डी. के. जैन यांची नियुक्‍ती करण्यात आली.

सुमीत मलिक यापुढे पाच वर्षांसाठी राज्याचे मुख्य माहिती आयुक्‍त असतील. वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची चर्चा असताना मुंबईचा विकास आराखडा नुकताच जाहीर झाल्याने काही बदल्या लांबणीवर पडल्या आहेत. यात नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. नितीन करीर, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव आणि मुंबई महापालिकेचे आयुक्‍त अजोय मेहता यांचा समावेश आहे. 

श्रीवास्तव, गाडगीळ रजेवर 

दरम्यान, सेवाज्येष्ठता असताना मुख्य सचिव पदावर वर्णी लागली नसल्याने मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिव मेधा गाडगीळ आणि गृहविभागाचे अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव रजेवर गेले आहेत. गाडगीळ महिनाभराच्या सुटीवर, तर श्रीवास्तव यांनी पाच दिवसाची रजा टाकल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे गाडगीळ यांचा कार्यभार मनुकुमार श्रीवास्तव यांच्याकडे, तर श्रीवास्तव यांचा कार्यभार परिवहन विभागाचे मनोज सौनिक यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. 

बदल्या पुढीलप्रमाणे 

संतोष कुमार - लघुउद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, एम. एन. केरकट्टा - खादी ग्रामोद्योगचे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रराग नैनीतुया - महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक, एस. आर. दौंड - सामान्य प्रशासन विभागाचे सचिव, राजीव कुमार मित्तल - वित्त विभागाचे सचिव, पी. वेलारासू - सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, एम. शंकरनारायणन - संचालक, नगरपालिका प्राधिकरण, सुमंत भांगे - मत्स्यविकास महामंडळ, विजय वाघमारे - रस्तेविकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक, एस. डी. लाखे - सहसचिव, वित्त विभाग, दीपेंद्रसिंह कुशवाह - मुख्याधिकारी, मुंबई म्हाडा, बी. जी. पवार - जालना जिल्हाधिकारी.

डी. के. जगदाळे - मुंबई इमारत दुरुस्ती मंडळ, वीरेंद्र सिंग - नागपूर महापालिका आयुक्‍त, सुनील चव्हाण - रत्नागिरी जिल्हाधिकारी, प्रदीप पी. - माहिती व तंत्रज्ञान विभागाचे संचालक, संजय यादव - अतिरिक्‍त आयुक्‍त, आदिवासी विकास विभाग ठाणे, सी. के. डांगे - जळगाव महापालिका आयुक्‍त, पी. शिवशंकर - आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, शंतनू गोयल - परभणी जिल्हाधिकारी, विजय राठोड - गडचिरोली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, राहुल कर्डिले - सहायक जिल्हाधिकारी अमरावती, कैलास पगारे - अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Major reshuffle in the administration UPS Madan in finance department