
मालेगाव : तब्बल १७ वर्षांचा कालखंड, अनेक फेरतपास, राजकीय व सामाजिक तणाव, आणि न संपणाऱ्या न्यायप्रक्रियेनंतर अखेर २००८ मधील मालेगाव (जि. नाशिक) बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल गुरुवारी (ता. ३१) विशेष न्यायालयात जाहीर झाला. मालेगाव शहरातील भिक्खू चौकात २९ सप्टेंबर २००८ ला रात्री झालेल्या स्फोटात सहा निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला होता; तर १०० हून अधिक जखमी झाले होते. या प्रकरणाने संपूर्ण देशाला हादरवून टाकले होते. तपास सुरुवातीला स्थानिक पोलिसांकडून झाला, त्यानंतर ‘एटीएस’ आणि नंतर ‘एनआयए’कडे तो वर्ग करण्यात आला. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, ले. कर्नल श्रीकांत पुरोहित यांच्यासह एकूण सात संशयित आरोपींवर खटला चालविण्यात आला होता. या प्रकरणात काही जण निर्दोष मुक्त झाले, काहींवर गुन्हे सिद्ध झाले. गुरुवारच्या निकालामुळे या दीर्घ न्यायलढ्याने अखेरचा टप्पा गाठला. पीडितांच्या न्यायाच्या आशा आणि आरोपींच्या बचावातील दावे यात वर्षानुवर्षे अडकलेली ही याचिका गुरुवारी निर्णायक वळणावर पोहोचली.