
मालेगावमधील भिक्कू चौक भागातील निसार डेअरीसमोरील उपाहारगृहाजवळ २९ सप्टेंबर २००८ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास मोटारसायकलला (एमएच १५ पी ४५७२) लावलेल्या बाँबचा स्फोट होऊन सहा जण ठार झाले; तर शंभरहून अधिक जण जखमी झाले. मृतांमध्ये बारा वर्षीय मुलीचा समावेश देखील होता. स्फोट झालेल्या ठिकाणी हॉटेल होते रमजानचा महिना असल्याने तेथे गर्दी होती. त्यामुळे स्फोट नेमका सिलिंडरचा की बॉम्बचा याबाबत सुरवातीला शासकीय यंत्रणेसह नागरिकांत तर्कवितर्क लढविले जात होते. दरम्यान, स्फोटाची बातमी सगळीकडे वेगाने पसरली. अफवांचेही पीक पसरले. परिणामी, रात्री उशिरापर्यंत तणावाची स्थिती वाढत गेली.