

solapur city crime branch
sakal
सोलापूर : येथील जुना देगाव नाका परिसरातील थोबडे वस्तीतील रजाक गफुर शेख (वय ४९) याच्या घरासमोर ३० मार्च रोजी पोलिसांना गांजाची ५९ झाडे सापडली आहेत. त्याच्याकडील पिशवीत देखील २२७ ग्रॅम गांजा सापडला. गांजाच्या झाडांचा वाळलेला पाला तो पुड्यांमधून विकत होता. सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकाने रजाकला जेरबंद केले आहे. न्यायालयाने रजाकला ४ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली.
संशयित आरोपी रजाक शेख घरामागील काटेरी झुडपात सारखा पिशवी घेऊन जायचा. त्याच्या घरासमोरील मोकळ्या मैदानात काही झाडे हिरवीगार होती. रजाक पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने पोलिसांचीही त्याच्यावर पाळत होतीच. शहर गुन्हे शाखेच्या पथकाला त्याच्या घरासमोरील झाडांबद्दल खबर लागली. गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक मुकेश गायकवाड यांच्या पथकाने त्याठिकाणी धाव घेतली. त्यावेळी रजाक शेख याच्या घरासमोरील मोकळ्या मैदानात गांजाची काही झाडे तर घरामागील काटेरी झुडपात देखील काही झाडे लावलेली दिसली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने देखील तेथे पोचले. सराईत गुन्हेगार रजाकचे कृत्य पाहून सगळेच अवाक झाले. पोलिसांनी सगळी झाडे उपटून पिशवीत भरली. त्याचे वजन २१.२१२ किलो झाले असून त्याची किंमत चार लाख ३९ हजार ९०० रुपये आहे.
गुन्हे शाखेने रजाकला अटक करुन फौजदार चावडी पोलिसांच्या ताब्यात दिले. ही कामगिरी पोलिस आयुक्त एम. राज कुमार, उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील, सहायक पोलिस आयुक्त राजन माने, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड यांच्या पथकाने पार पाडली. गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव करीत आहेत.
दोनदा तडीपार, एकदा स्थानबद्ध, तरीही रजाक शेख नाही सुधारला
थोबडे वस्तीतील रजाक शेख याच्यावर पूर्वीचे अवैध दारू विक्री, मारामारी, जुगार धंदा चालविणे, असे १८ गुन्हे दाखल आहेत. यावरुन २०१७ सालात त्याच्यावर तडीपारीची कारवाई झाली होती. त्यानंतरही गुन्हेगारी कृत्य सुरूच ठेवल्याने पुन्हा एकदा त्याच्यावर तडीपारीची कारवाई झाली होती. तसेच त्याच्यावर ‘एमपीडीए’ची कारवाई करून रजाकची रवानगी पुण्यातील येरवडा कारागृहात देखील केली होती. तरीपण, त्याने गुन्हेगारी वर्तन सोडले नाही. आता ‘ती झाडे माझे नाहीत, मी लावलेलीच नाहीत’, असे तो सांगत असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.