राज्यातील विद्यापीठ परीक्षांच्या नियोजनासाठी समिती

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 एप्रिल 2020

विद्यापीठाच्या परीक्षांसाठी अॅक्शन प्लान ए आणि बी तयार केले जाणार आहे. ए मध्ये  लॉकडाउन संपल्यावर परीक्षा घेण्याचे नियोजन असेल. तर बी मध्ये लॉकडाउन लांबले आणिबाणीची स्थिती निर्माण झल्यास परीक्षा कशा घ्यायच्या, याचे नियोजन असेल. याबाबत राज्यपालांना माहिती दिली जाणार आहे.
- उदय सामंत, मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण विभाग

पुणे - कोरोनामुळे राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षांसह ‘सीईटी’चे वेळापत्रक कोलमडले आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ न देता सर्व परीक्षांचे नियोजन आणि नियंत्रण करण्यासाठी कुलगुरू व अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विद्यापीठांच्या परीक्षांचा आढावा घेण्यासाठी सामंत यांनी सोमवारी राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. प्रत्येक विद्यापीठाच्या किती परीक्षा झाल्या, किती शिल्लक आहेत, याचा आढावा सामंत यांनी घेतला.  

सामंत म्हणाले, ‘‘विद्यापीठ, महाविद्यालय आणि ‘सीईटी’ सेलने पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. त्या रद्द होणार नाहीत. या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले जाईल. त्यामुळे अफवांवर विश्‍वास ठेवू नये. शैक्षणिक वर्ष किमान दीड महिना पुढे ढकलले जाणार आहे. नवे वेळापत्रक ठरविण्यासाठी समिती स्थापन केली असून, यात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, एसएनडीटीच्या शशिकला वंजारी, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू देवानंद शिंदे, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. अभय वाघ, उच्च तंत्रशिक्षण विभागाचे संचालक धनराज माने यांचा समितीत समावेश आहे.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: management committee for university exam