
वादग्रस्त विधानांनी अनेकदा चर्चेत आलेले राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे विधीमंडळाच्या सभागृहात ऑनलाइन गेम खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अडचणीत आले आहेत. त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनीही कोकाटेंबाबत नाराजी व्यक्त केली. दरम्यान, कोकाटे यांनी राज्य सरकारबद्दलही वादग्रस्त विधान केलं. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयात मंगळवारी सकाळी दोघांचीच बैठक झाली. या बैठकीत अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांचे कान टोचल्याची चर्चा आहे. सभागृहात गेम खेळत असल्याच्या व्हिडीओ प्रकरणी आणि राज्य सरकारबद्दल केलेल्या विधानावर माणिकराव कोकाटे यांनी दिलगिरी व्यक्त केली असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. तर दुसरीकडे माणिकराव कोकाटेंना मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगितलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.