
Manoj Jarange : वडेट्टीवारांच्या भुजबळविरोधी भूमिकेनंतर जरांगेंची प्रतिक्रिया; म्हणाले...
पुणेः अंबडमध्ये झालेल्या ओबीसी मेळाव्यानंतर छगन भुजबळ यांच्या भाषणाविरोधात मतं मांडली जात आहेत. त्या मेळाव्याला उपस्थित असलेले विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आता भुजबळांच्या विरोधात मत मांडलं आहे.
ओबीसींच्या आरक्षण लढ्यात दोन समाजामध्ये विष पेरणं चुकीचं असल्याचं वडेट्टीवारांचं म्हणणं आहे. ते म्हणाले की, यापुढे मी भुजबळांच्या मंचावर कुठल्याही कार्यक्रमात जणार नाही. सत्तेतल्या माणसाने समस्या सोडवायच्या असतात, दोन समाजामध्ये विष पेरणं सोपं आहे परंतु त्यातून कुणाचा जीव गेला तर कोण जबाबदार आहे? दोन समाज भिडले तर राज्यकर्त्यांना आनंद मिळवायाचा आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
त्यावर बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, विरोधी पक्षनेत्याने समाजाचे प्रश्न सोडवायचे असतात, हे मी आधीच सांगत होतो. आता त्यांनी योग्य भूमिका घेतली आहे. उशिरा का होईना मराठा आरक्षणाच्या बाजूने ते उभे राहिले आहेत.
अंतरवाली सराटीमध्ये झालेल्या लाठीहल्ला प्रकरणावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन दिलं, परंतु अजूनही गुन्हे मागे घेतलेले नाहीत. महिलांवर लाठीचार्ज करणारं कोण आहे, ते शोधून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. खुनी हल्ल्याचा कट नेमका कुणी रचला, ते शोधून काढा, अशी मागणी जरांगे यांनी केली आहे.