भोंदूच्या सांगण्यावरुन निर्णय घेणाऱ्या चित्रा रामकृष्णनबाबत अंनिस आक्रमक; म्हणाले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dr. Hamid Dabholkar)

भोंदूच्या सांगण्यावरुन निर्णय घेणाऱ्या चित्रा रामकृष्ण यांच्याबाबत अंनिसची नवी मागणी

मुंबई: हिमालयात राहणाऱ्या एका कथित अज्ञात अध्यात्मिक गुरुच्या आदेशानुसार शेअर बाजार चालवल्याचा आरोप नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या (NSE) माजी एमडी चित्रा रामकृष्णन यांच्यावर करण्यात आला आहे. नुकताच सेबीनं (SEBI) हा धक्कादायक खुलासा केला होता. यानंतर आता या प्रकरणाची गंभीर दखल इन्कम टॅक्स विभागानं घेतली असून रामकृष्णन यांच्या मुंबईतील घरासह इतर विविध ठिकाणांवर छापेमारी सुरु केली आहे. (Income tax department raids former NSE MD Chitra Ramakrishnan premises) त्यानंतर आता या प्रकरणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही आपली मागणी नोंदवली आहे. शेअरबाजारातील भोंदूगिरीवर जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करा, तसेच चित्रा रामकृष्ण आणि भोंदूबाबाची कठोर चौकशी करण्याची मागणीही अंनिसने केली आहे.

हेही वाचा: वडिलांच्या अटकेवर निलोफर मलिकांची पहिली प्रतिक्रिया; 'डी-कंपनीशी प्रत्येकाचाच...'

अंनिसची काय आहे मागणी?

राष्ट्रीय शेअर बाजाराच्या माजी अध्यक्ष चित्रा रामकृष्ण आणि त्यांचे सहकारी आनंद सुब्रमण्यम यांच्यावर जादूटोणा विरोधी कायद्या अंतर्गत कारवाई केली जावी आणि त्यांनी सेबीला दिलेला जबाब गृहीत धरून त्यांना तातडीने अटक करण्याची मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने प्रसिद्धी पत्रकाच्या द्वारे केली आहे. अशा आशयाचे निवेदन अंनिस मार्फत ह्या प्रकरणाची तपासणी करणाऱ्या सीबीआयला तसेच मुंबईचे पोलीस आयुक्त यांना देखील देण्यात आल्याचे पत्रकात नमूद केले आहे.

पत्रकात पुढे म्हंटले आहे कr, राष्ट्रीय शेअर बाजाराच्या सारख्या देशाच्या आर्थिक दृष्टीने अत्यंत महत्वाच्या संस्थे मधील सर्वोच्च पदावरच्या व्यक्तीने आपले दैनदिन काम पाहण्यासाठी अध्यात्मिक गुरूच्या नावाच्या खाली भोंदू बाबाचा सल्ला घेणे हि शरमेची बाब आहे. महाराष्ट्रात लागू असलेल्या जादूटोणा विरोधी कायद्यान्वये हा गुन्हा देखील आहे. जादूटोणा विरोधी कायद्या नुसार, ‘’दैवी शक्तीचा दावा करणे आणि त्या आधारे लोकांना फसवणे हा गुन्हा आहे.’’ को-लोकेशन घोटाळा प्रकरणी चित्र रामकृष्ण ह्यांनी सेबीला दिलेल्या जबाबात आपण आनंद सुब्रम्हण्यम ह्यांची नेमणूक आणि इतर बाबींच्या मध्ये आपल्या हिमालयातील अध्यात्मिक गुरूचा सल्ला घेत होतो असे नमूद केले आहे. आणि ह्या गुरूचा ठावठिकाण विचारला असता त्यांना मानवी देह नाही असे अतींद्रिय शक्तींचा दावा करणरे उत्तर दिले आहे.

हेही वाचा: नवाब मलिकांच्या तिन्ही मागण्या मान्य; मुंबई सत्र न्यायालय म्हणालं....

प्रत्यक्षात शरीराच्या शिवाय माणसाचे अस्तित्व शक्य नाही, असे असताना लोकांच्या मनात असलेल्या धार्मिक भावनांचा गैरफायदा घेवून, अतींद्रिय शक्तीच्या नावावर शेअर बाजारा संबंधी निर्णय घेताना चित्रा रामकृष्ण आणि त्यांचे सहकारी आनंद सुब्रम्हण्यम यांनी लोकांची फसवणूक केली आहे असे देखील ह्या पत्रकात नमूद केले आहे. शेअर बाजारातील घोटाळा बाहेर आल्यावर सेबीने केलेल्या चौकशी मध्ये प्रत्यक्षात हि माहिती समोर आली आहे. तसेच ह्या अतींद्रिय शक्तीचा दावा असलेल्या बाबाच्या कडून आलेल्या इमेल देखील आहेत .सेबीच्या अहवालात ह्या गोष्टी स्पष्ट नमूद केल्या आहेत. सेबीने केवळ आर्थिक आणि प्रशासकीय अनियमिततेच्या दृष्टीने चौकशी केली असल्याने त्या मधील भोंदूगिरीच्या दाव्यांच्याकडे दुर्लक्ष झाले आहे. ह्या प्रकरणाची चौकशी करणा-या सीबीआयने ह्या भोंदूगिरीच्या अनुषंगाने तातडीने चौकशी करावी अशी मागणी महाराष्ट्र अंनि मार्फत करण्यात आली आहे.

राष्ट्रीय शेअर बाजाराचे मध्यवर्ती कार्यालय मुंबई येथे असल्यामुळे महाराष्ट्रात लागू असलेला जादूटोणा विरोधी कायदा ह्या प्रकरणात लागू होतो हे सीबीआय तसेच मुंबाई पोलीस कमिशनर ह्यांना देखील तक्रार अर्जाच्या द्वारे कळवण्यात आले असल्याचे ह्या मध्ये नमूद केले आहे.

अतींद्रिय शक्ती सारख्या कोणताही वैज्ञानिक आधार नसलेल्या गोष्टींच्या वर केवळ अशिक्षित लोक विश्वास ठेवतात असे नसून सुशिक्षित आणि उच्च पदस्थ लोक देखील अशा गोष्टींच्या वर विश्वास ठेवतात हे वास्तव या निमित्ताने पुढे आले आहे. आपण आपल्या खाजगी आयुष्यात कशावर विश्वास ठेवावा हे प्रत्येकाचा प्रश्न आहे पण देशाच्या दृष्टीने महत्वाच्या पदावरील व्यक्तीने महत्वाचे कार्यालयीन निर्णय हे भोंदू बाबांच्या सल्याने घेणे किंवा जनतेच्या धर्मभावनांचा फायदा उठवण्यासाठी एखाद्या बाबांच्या नावाआड आपले कृष्णकृत्य झाकण्याचा प्रयत्न करणे हे जनतेची फसवणूक आहे आणि हे लोकांच्या समोर यावे ह्या साठी महाराष्ट्र अंनिस ह्या तक्रारीचा पाठपुरावा करणार असल्याचे ह्या मध्ये नमूद केले आहे. अत्यंत उच्च शिक्षित आणि उच्च पदस्थ लोक देखील अशा भोंदू गिरीला बळी पडतात किंवा त्याच्या मागे लपतात ह्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अनिस येणाऱ्या काळात सुशिक्षितांच्या अंधश्रद्धा ह्या विषयी प्रबोधन मोहीम राबवणार आहे असे देखील ह्या मध्ये नमूद केले आहे.

Web Title: Mans New Demand Regarding Chitra Ramkrishna Who Took The Decision Based On Himalaya Yogi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top