esakal | राज्यात 202 टॅंकर सुरू ! 13 जिल्ह्यांत जाणवू लागल्या पाणीटंचाईच्या झळा
sakal

बोलून बातमी शोधा

Water tanker

राज्यात 202 टॅंकर सुरू ! 13 जिल्ह्यांत जाणवू लागल्या पाणीटंचाईच्या झळा

sakal_logo
By
प्रदीप बोरावके : सकाळ वृत्तसेवा

माळीनगर (सोलापूर) : राज्यातील 13 जिल्ह्यांत पिण्याच्या पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. राज्यातील 241 गावे व 491 वाड्या-वस्त्यांना टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. 3 मेअखेर 39 शासकीय व 163 खासगी मिळून 202 टंचाईग्रस्त भागात टॅंकर पाणीपुरवठा करीत आहेत. मागील आठवड्यापेक्षा चालू आठवड्यात 70 टॅंकरने वाढ झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा 63 टक्‍क्‍यांनी टॅंकरच्या संख्येत घट झाली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे 34 पैकी 21 जिल्ह्यांत यावर्षी अद्यापतरी एकही टॅंकर सुरू नाही. (Many districts in the state are experiencing water scarcity and tanker water supply is on)

राज्य सरकारच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने जाहीर केलेल्या अहवालावरून ही बाब समोर आली आहे. मागील वर्षी या कालावधीत राज्यात 337 गावे व 778 वाड्यांना 320 टॅंकर पाणीपुरवठा करीत होते. यंदाच्या मोसमात गेल्या आठवड्यात 142 गावे व 243 वाड्यांना 132 टॅंकरने पाणीपुरवठा चालू होता. कोकणात पाणीटंचाईची तीव्रता अधिक असल्याचे दिसते. मराठवाडा, विदर्भात पिण्याच्या पाण्याची स्थिती समाधानकारक आहे. कोकणात टॅंकरने सर्वाधिक पाणीपुरवठा सुरू आहे. ठाणे जिल्ह्यातील 23 गावे व 93 वाड्यांना 27 टॅंकरने, रायगड जिल्ह्यातील 44 गावे व 128 वाड्यांना 21, रत्नागिरी जिल्ह्यात 33 गावे व 51 वाड्यांना 11 तर पालघर जिल्ह्यात 23 गावे व 76 वाड्यांना 32 टॅंकरने पाणी पुरवठा केला जात आहे.

हेही वाचा: सोने खरेदी करताहात तर सावधान ! इन्कम टॅक्‍स डिपार्टमेंटने लावले "हे' नवीन निर्बंध

नाशिक जिल्ह्यात 37 गावे व 15 वाड्यांना 25 टॅंकरने, पुणे जिल्ह्यात 22 गावे व 102 वाड्यांना 22, बुलढाणा जिल्ह्यात 12 गावांना 12 तर यवतमाळ जिल्ह्यात 22 गावांना 22 टॅंकरने पाणी पुरविले जात आहे. नगर, सातारा, हिंगोली, नांदेड, अमरावती या जिल्ह्यांत टॅंकरची संख्या एकेरी आकड्यात आहे. नगर जिल्ह्यात 5, साताऱ्यात 7, हिंगोलीत 2, नांदेडमध्ये 7 व अमरावती जिल्ह्यात 9 टॅंकर सुरू आहेत.

या जिल्ह्यात एकही टॅंकर नाही

सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, उस्मानाबाद, लातूर, अकोला, वाशीम, नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या 21 जिल्ह्यांत यावर्षी अद्याप एकही टॅंकर सुरू नाही, हे यावेळचे वैशिष्ट्य आहे.