esakal | प्राणवायूनेच घेतला जीव; ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेवर काय म्हणाले नेते

बोलून बातमी शोधा

accident of oxygen leakage in nashik

या दुर्घटनेबाबत राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

प्राणवायूनेच घेतला जीव; ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेवर काय म्हणाले नेते

sakal_logo
By
सुस्मिता वडतिले

नाशिक : नाशिकच्या डॉक्टर झाकीर हुसेन रुग्णालयात प्राणवायूमुळेच रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. रुग्णालयात ऑक्सिजनच्या टाकीला झालेल्या गळतीमुळे 22 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ऑक्सिजन व्हॉल्वमधून लिकेज झाल्यानं प्रेशर कमी झालं आणि 22 व्हेंटिलेटेड रुग्ण दगावल्याची धक्कादायक घटना घडली. याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. या दुर्घटनेबाबत राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नाशिकमध्ये घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे. ॲाक्सिजन लिकेज मुळे मृत्यू होणे अत्यंत वाईट आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी होत राहील मात्र आधी रूग्णांना दुसरीकडे लवकर शिफ्ट केले पाहीजे. आणि हा प्रकार इतर ठिकाणी होणार नाही याची काळजी घेतली पाहीजे.

बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुऴे म्हणाल्या, नाशिकमधील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन सिलिंडरची गळती होऊन काही रुग्ण दगावल्याची बातमी आहे. हे वृत्त अतिशय हृदयद्रावक आहे. या घटनेत दगावलेल्या रुग्णांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत.

विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले, निष्काळजीपणाने अजून किती बळी घेणार आहात? नाशिकच्या रुग्णालयात झालेली ऑक्सिजन टँकर गळती दुर्दैवी असून याबाबत आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. घटनेला जबाबदार असणार्‍यांवर त्वरित कारवाई करून अशा घटना पुन्हा घडू नयेत, याची काळजी घेण्यास सांगितले.

महाराष्ट्र युवक काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे म्हणाले, नाशिककडून खूप धक्कादायक बातमी समोर येत आहे. डॉक्टर झाकीर हुसेन रूग्णालयात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन लिकेजमध्ये आतापर्यंत 22 लोकांचा मृत्यू झाला आहे.