
बीड - ‘ठरल्याप्रमाणे आरक्षण द्या अन्यथा पुढचे आंदोलन जड जाईल. सरकार समाजाची फसवणूक करत आहे. समाजातील मुलांचे मुडदे पडत असतानाही सरकार त्याकडे लक्ष देत नाही. आपण मात्र हे बघू शकत नाही. आता आरक्षण हिसकावून घेणार,’ असा इशारा देत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी २० जानेवारीपासून मुंबईच्या आझाद मैदानावर बेमुदत उपोषणाची घोषणा केली.
अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथून उपोषण यात्रेला सुरुवात होईल. ‘मुंबईत या उपोषणादरम्यान लोक भेटायला येऊ शकतात. त्यांना कोणीही अडवू शकत नाही,’ असेही त्यांनी सांगितले. आरक्षणासाठी राज्य सरकारने जरांगे यांना दिलेली मुदत रविवारी (ता. २४) संपत आहे.
‘शासनाच्या शिष्टमंडळाने अलीकडेच दोन वेळा भेट घेऊन अल्टिमेटमवर ठाम राहू नका, वेळ द्या!’ अशी विनंती जरांगे यांना केली होती. दरम्यान, यापूर्वीच घोषणा केल्याप्रमाणे जरांगे यांची शनिवारी येथे निर्णायक इशारा सभा झाली. या सभेत त्यांनी पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट केली.
‘कुणी म्हणते घरे जाळली, कुणी म्हणते हॉटेल जाळली. यांनीच यांची घरे आणि हॉटेल जाळले अन् आमचे बांधव त्यात अडकविले. आपण गप्प होतो, पण त्याच्या पोटात अळी असून ती नेहमीच वळवळ करते. आपल्या व समाजाच्या नादी लागू नको,’ अशा शब्दांत त्यांनी नाव न घेता मंत्री छगन भुजबळ यांच्यावर हल्लाबोल केला.
अन्याय केल्यास जड जाईल
‘सरकारने निष्पाप पोरांना गुंतविण्याचे कारस्थान आखले आहे. आज एवढ्या मोठ्या संख्येने समाजबांधव जमूनही काहीच घडले नाही. मराठा समाज शांतीचा संदेश देणारा आहे. त्यामुळे सरकारने झोपू नये. मराठा आरक्षणाच्या विरोधात कुणी बोलले तर सुटी नाही.
मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण द्यावे, शहाणपणाची भूमिका घ्यावी. एकट्याचे ऐकून अन्याय करू नका. मराठ्यांवर अन्याय केला तर जड जाईल. अंतरवालीत एकदा प्रयोग केला; आता सावध व्हा. सामंजस्याने ठरल्याप्रमाणे आरक्षण द्या. नाहीतर पुढचे आंदोलन जड जाईल,’ असा इशारा त्यांनी दिला.
ओबीसीतूनच आरक्षण मिळणार
‘आधी समाज, मग कुटुंब. मराठा समाज आपल्यासाठी मायबाप आहे. गद्दारी करायला आंदोलन उभे केले नाही. समाजासाठी जीवन समर्पित केले आहे. कानाकोपऱ्यातून एकजुटीने निर्माण झालेली ताकद वाया जाऊ देणार नाही. मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार. कुणबी नोंदी सापडल्या आहेत. सरकार मराठ्यांचा अपमान आणि फसवणूक करत आहे. ते निर्णय घेत नाही,’ असे जरांगे म्हणाले.
आरक्षण घेऊनच परतणार
‘मराठा आमदार, खासदार मंत्री यांनीही मराठा लेकरांच्या पाठीशी उभे राहावे. जे पाठीशी उभे राहणार नाहीत त्यांना दारात उभे करू नका,’ असा सल्ला त्यांनी समाजबांधवांना दिला. ‘उपोषणाला बसेपर्यंत आणि मराठा बांधव मुंबईकडे निघेपर्यंत वेळ आहे. तोपर्यंत आरक्षण द्यावे,’ असे आवाहन करत ‘आरक्षण घेऊनच मुंबईमधून परत येऊ,’ असेही जरांगे यांनी सांगितले.
जेसीबींसह हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी
धुळे - सोलापूर महामार्गावरील छत्रपती संभाजी महाराज चौक परिसरातील मैदानात झालेल्या या सभेला मोठी गर्दी होती. सभास्थळी जागा न मिळालेल्या समाज बांधवांनी महामार्गावर थांबून सभा ऐकली. त्यामुळे सभा काळात वाहतूक ठप्प होती. तत्पूर्वी जरांगे यांच्या नेतृत्वाखाली शहरातून फेरी काढण्यात आली होती. तिचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. जरांगे यांच्यावर २०१ जेसीबींसह हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.
‘क्युरेटिव्ह’वर २४ जानेवारीला सुनावणी
नवी दिल्ली - मराठा आरक्षणासाठी दाखल करण्यात आलेल्या क्युरेटिव्ह याचिकेवर सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर येत्या २४ जानेवारीला सुनावणी होणार आहे. गेल्या वर्षी पाच सदस्यीय घटनापीठाने हे आरक्षण नाकारले होते. यावर पुनर्विचार करावा, यासाठी क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर शेवटची सुनावणी गेल्या ६ डिसेंबरला झाली होती. आता या याचिकेवर पुन्हा सुनावणी करायची असल्यास सात सदस्यांचे घटनापीठ स्थापन करावे लागेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
क्युरेटिव्ह याचिकेवर येत्या २४ जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईल. न्यायालय मराठा समाजाचे म्हणणे ऐकून घेणार आहे, हा एक मोठा दिलासा आहे. वकिलांची मोठी फौज न्यायालयात बाजू मांडेल. सर्वोच्च न्यायालयाने काढलेल्या त्रुटी दूर केल्या जातील. आम्ही मराठा समाजाला न्याय देऊ.
राज्यातील कायदा-सुव्यवस्था कायम राहिली पाहिजे त्यामुळे सर्व जाती धर्माच्या लोकांनी संयम ठेवावा. महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाला मागास ठरविण्यासाठी जे पुरावे द्यायला हवे होते ते नीटपणे मांडले गेले नव्हते. परंतु, यावेळी ते व्यवस्थितपणे मांडण्यात येतील.
- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळेल. आमचीसुद्धा तीच मागणी आहे. मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे. तसेच जातीनिहाय जनगणना करावी आणि त्यानुसार आरक्षण ठरवावे.
- छगन भुजबळ, मंत्री आणि ओबीसी नेते
मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून क्युरेटिव्ह याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या प्रक्रियेतील एक दुवा म्हणून याचा प्रचंड आनंद होतो. सरकारच्या प्रयत्नांना नक्कीच यश येईल.
- चंद्रकांत पाटील, मंत्री
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.