Maratha Reservation : मराठा म्हणजे नक्की कोण?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जून 2019

मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणानंतर मराठा समाज म्हणजे नक्की कोण? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर जाणून घेऊयात...

मुंबईः मराठा समाजाला आर्थिक-सामाजिक मागास गटात सोळा टक्के आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा धोरणात्मक निर्णय आज (गुरुवार) मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरविला. यामुळे मराठा समाजाला दिलासा मिळाला असून, राज्य सरकारही खूश झाले आहे. वंचित घटकाला आवश्‍यकता असल्यास राज्य सरकार स्वतःच्या विशेषाधिकारामध्ये आरक्षण देऊ शकते, असा निर्वाळाही न्यायालयाने दिला आहे. या निर्णयामुळे आर्थिक-सामाजिक मागास प्रवर्ग (एसईबीसी) या घटकालाही मान्यता मिळाली आहे.

मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणानंतर मराठा समाज म्हणजे नक्की कोण? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर जाणून घेऊयात...
'मराठा' म्हणजे मराठी भाषिक समाज. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मराठा समाजाला मोठे महत्त्व प्राप्त झाले. मराठा हा समाज लढवय्या म्हणून ओळखला जातो. स्वराज्यासाठी शिवाजी महाराजांबरोबर अनेक लढायांमध्ये मराठा समाज अग्रस्थानी होता. महाराष्ट्राची एक तृतीयांश लोकसंख्या मराठा समाजाची आहे. राज्यातील अन्य समाजांच्या तुलनेने या समाजातील लोक राजकारणात अधिक सक्रिय आहेत. 1960पासून आतापर्यंत या समाजाचे 18 मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले आहेत.

राजकारणात वर्चस्व असूनही हा समाज शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास असल्याचे महाराष्ट्र राज्य मागास प्रवर्ग आयोगाने जाहीर केले. आयोगाच्या म्हणण्यानुसार, शिवकाल संपल्यानंतर या समाजाला उतरण लागली. कोणत्याही राजकीय पक्षाने या समाजाची पुरेशी दखल घेतली नाही, तसेच घरच्या जमिनीचे भावंडांत अनेक तुकडे होत गेले. संपत्तीचे वाटप झाल्याने हा समाज आर्थिकदृष्ट्या दुर्बल होत गेला. तरीही ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये या समाजाचा मोठा हातभार आहे.

मराठा समाजाविषयी जाणून घेऊया...
राज्यातील 80 टक्केहून अधिक जमीनींचे मालक मराठा समाजाचे
- 105 पैकी 86 साखर कारखाने मराठा नेत्यांचे आहेत.
- 55 टक्के शिक्षण संस्था मराठा समाजाचे
- 70 टक्के सहकारी संस्था
- 1962 पासून 60 टक्के लोकप्रतिनिधी मराठा
- 18 पैकी 12 मुख्यमंत्री मराठा समाजाचे
 
मराठा समाजाच्या मुख्य समस्या
- आर्थिक असमानता
- रोजगारापासून वंचित
- शैक्षणिक मागासलेपण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maratha Reservation Who is Maratha?