#MarathaKrantiMorcha समाजकंटक घुसवून आंदोलनाची बदनामी: चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जुलै 2018

राज्यभरातील मराठा आंदोलनात समाजकंटक घुसवून बदनाम केले जात असल्याचा आरोप सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. 

सांगली : राज्यभरातील मराठा आंदोलनात समाजकंटक घुसवून बदनाम केले जात असल्याचा आरोप सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. 

ते म्हणाले की, राज्यभर आंदोलन सुरु आहे. त्यात अनेक समाजकंटक घुसले आहेत. ते मराठा आंदोलनाला बदनाम करीत आहेत. मराठा समाजात आरक्षण देणे हे सरकारच्या हातात नाही. ही बाब न्यायालयाच्या हातात आहे. यामुळे न्यायालयाने याबाबत निर्णय घ्यायचा आहे. सरकारने त्यासाठी सर्व काही केले आहे. जलसमाधी, आंदोलन करून, बसेस जाळून, आरक्षण मिळणार नाही. मराठा आंदोलकानी आपले आंदोलन मागे घ्यावे, सरकार आणि मुख्यमंत्री यावर चर्चेला तयार आहेत.

मराठा आरक्षणासाठी राज्यभरात वणवा पेटलेला असताना महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मराठा क्रांती मोर्चावर गंभीर स्वरुपाचा आरोप केला आहे. या आंदोलनात पेड लोक घुसलेले असून हे आंदोलन बदनाम महाराष्ट्राला हादरवण्याचा या पेड आंदोलकांचा प्रयत्न असल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

राज्यात मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा संघटनांनी आरक्षणाच्या मागणीवरुन जोरदार आंदोलन सुरु केले असून, या आंदोलनात सोमवारी (काल) औरंगाबादजवळ काकासाहेब शिंदे या युवकाकाचा मृत्यू झाला. यानंतर आंदोलन चिघळले असून मंगळवारी(आज) मराठा संघटनांतर्फे राज्यभरात बंदची हाक देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना चंद्रकांत पाटील  म्हणाले की, आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने काम केले आहे. आता हा मुद्दा न्यायालयाच्या अखत्यारित आहे. मंत्र्यांच्या गाड्या फोडून आरक्षण मिळणार असेल तर गाड्या फोडा. पण शेवटी यात समाजाचे मोठे नुकसान होणार आहे. काही पेड लोक या आंदोलनात घुसली असून त्यांना महाराष्ट्र अस्थिर करायचा आहे.

राज्यात चार वर्षे उत्तम कारभार चालला. शेतकऱ्यांना कर्जमाफीही झाली. पण आता निवडणुका जवळ येताच हिंसक आंदोलनाचे प्रकार वाढतील. आता जे खरे आंदोलक आहेत, त्यांनी समाजकंटकांना खड्यासारखे बाजूला काढावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MarathaKrantiMorcha chandrakarnt patil statement about MarathaKrantiMorcha