बारामतीमधील एसटी सेवा बंद

बारामतीमधील एसटी सेवा बंद

बारामती शहर - मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज सुरक्षिततेचा उपाय म्हणून बारामती शहर व एमआयडीसीतील एसटीची सेवा बंद ठेवण्यात आली. ‘सकाळ’पासूनच आंदोलनाची तीव्रता अधिक असल्याने पोलिस प्रशासनाच्या विनंतीवरून सेवा थांबविल्याची माहिती आगारप्रमुख अमोल गोंजारी यांनी दिली.

आज सकाळपासूनच बारामती आगारातून एकही बस बाहेरच पडली नाही. सर्व बसेस आगारातच लावून ठेवण्यात आल्या होत्या. काल बारामती आगारातून जाणाऱ्या गाड्या बंद असल्याने २२४५२ कि.मी. अंतराच्या ४५२ फेऱ्या रद्द झाल्या. त्यामुळे एसटीचे १० लाख १६ हजारांचे नुकसान झाल्याचेही गोंजारी यांनी सांगितले. आजही एसटीला पाच लाखांचे नुकसान सहन करावे लागेल, असे त्यांनी सांगितले. दुपारी तीनपर्यंत एसटीची सेवा ठप्प होती. पोलिस प्रशासनाकडून जोपर्यंत संदेश येत नाही, तोवर एसटी रस्त्यावर उतरवायची नाही, असा निर्णय घेतल्याने आज अनेकांना आपला प्रवासाचा बेत रद्द करावा लागला. बारामतीतून दररोज सरासरी सात हजार प्रवासी एसटीने प्रवास करतात. 

दुपारी तीननंतर हळूहळू एसटी रस्त्यावर आणण्यास प्रारंभ झाला होता. दुसरीकडे बारामती एमआयडीसी आगाराचे काल ७५६१ कि.मी.च्या फेऱ्या रद्द झाल्यामुळे ३ लाख ६० हजारांचे नुकसान झाले. 

अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल
बारामतीत मंगळवारी (ता. २४) प्रशासकीय इमारतीवर दगडफेक करून एक लाखाचे नुकसान केल्याबद्दल अज्ञात सहा जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशासकीय इमारतीचे झालेले नुकसान भरून देण्याची ग्वाही प्रदीप शिंदे व सहकाऱ्यांनी दिली आहे. कोणत्याही परिस्थितीत कोणाचेच नुकसान करण्याचा मराठा क्रांती मोर्चाचा हेतू नाही, काही समाजकंटकांनी गालबोट लावण्याचा केलेला प्रयत्न चुकीचा असून, आम्ही नुकसान भरपाई देण्यास तयार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. 

काहींना मदत 
दरम्यान, कालच्या दगडफेकीत जखमी झालेल्या फैयाज शेख, तसेच मोहन शिंदे यांना, तर नुकसान झालेल्या मोहसीन बागवान यांना आज गटनेते सचिन सातव, नगरसेवक गणेश सोनवणे, नवनाथ बल्लाळ यांनी आर्थिक मदत करत त्यांची विचारपूस केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com