मंत्रिमंडळाचा चेहरा अस्सल मराठी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 डिसेंबर 2019

शिवसेनेचे सर्वच मंत्री मराठी आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवाब मलिक उत्तर भारतीय असले, तरी ते स्वच्छ मराठी बोलतात. गेल्या अनेक वर्षांत त्यांनी जाणीवपूर्वक आपली उत्तर भारतीय ओळख पुसली आहे.

मुंबई : शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला असून, या मंत्रिमंडळाचा चेहरा अस्सल मराठी असल्याचे दिसून येत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यापूर्वी काँग्रेस आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात कृपाशंकरसिंह, अरुण गुजराथी व अन्य राज्यांतील नेते सत्तास्थानी असायचे. काँग्रेस आघाडीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या फौजिया खान मंत्रिमंडळात होत्या. खान महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील होत्या, तरीही त्यांना अनेक वर्षे मराठी बोलता येत नव्हते. सन 2014 च्या युतीच्या सत्तेतही भाजपचे अनेक चेहरे अमराठी होते. प्रकाश महेता, विद्या ठाकूर, योगेश सागर मंत्रिमंडळात होते. त्यामुळे सरकारवर राजकीय टीका होत होती. महाविकास आघाडी सरकारचा चेहरा मात्र बऱ्यापैकी मराठी असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

खातेवाटप दोन दिवसांत 

शिवसेनेचे सर्वच मंत्री मराठी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक उत्तर भारतीय असले, तरी ते स्वच्छ मराठी बोलतात. गेल्या अनेक वर्षांत त्यांनी जाणीवपूर्वक आपली उत्तर भारतीय ओळख पुसली आहे. त्यामुळे त्यांना कुणीही परप्रांतीय म्हणायचे धाडस करीत नाही. हीच परिस्थिती काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याबाबतीत आहे. शेख हेदेखील अस्सल मराठी बोलतात आणि त्यांनी मुंबई हीच आपली कर्मभूमी असल्याचे अनेकदा स्पष्ट केले आहे. मुंबईतील मुस्लिम समाजाचे हे दोन नेते वगळता राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीम आणि शिवसेनेचे अब्दुल सत्तार मराठी मातीतील आहेत. महाविकास आघाडी सरकारमधील 42 मंत्र्यांवर नजर टाकली असता मंत्रिमंडळाचा मराठी चेहरा समोर आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi minister include in cabinet expansion Maharashtra government