इंदिराजींवरून वाद ही तर बाटग्यांची उठाठेव; सामनाच्या अग्रलेखातून टीका

इंदिराजींवरून वाद ही तर बाटग्यांची उठाठेव; सामनाच्या अग्रलेखातून टीका

पुणे : माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी या अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला याला भेटायच्या असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले होते. त्यानंतर आता यावरून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखातून हा वाद म्हणजे 'बाटग्यांची उठाठेव' असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये 'फक्त विरोधासाठी विरोध' आहे, असेही यामध्ये म्हटले आहे.

सामनाच्या अग्रलेखातून विविध मुद्द्यांवर भाष्य करण्यात आले आहे. यामध्ये शिवसेना, इंदिरा गांधी, पंतप्रधान मोदी, करीम लाला यांसारख्या मुद्द्यांवर लेखन करण्यात आले आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी या उत्तुंग व्यक्तिमत्त्वास 'पेढेवाले' वगैरे थिल्लर उपमा देऊन त्यांचे हसे करणाऱ्यांच्या बाजूने संपूर्ण भाजप उभा राहिला आहे. त्यामुळे आम्ही त्यांचे स्वागत करतो, असे या अग्रेलखात म्हटले आहे. याशिवाय भाजपला इंदिरा गांधी प्रिय झाल्याचा सर्वात जास्त आनंद आहे. इंदिराजींच्या स्मृती कायमच्या मिटाव्यात असे ज्यांना वाटते त्यांनाच इंदिराजींच्या व्यक्तिमत्त्वाची काळजी वाटावी हे आश्चर्यच आहे. 

संजय राऊत यांच्याकडून 'ते' विधान मागे

संजय राऊत यांनी इंदिरा गांधी यांच्याबाबत केलेले वक्तव्य त्यांनी मागे घेतले आहे. शिवसेनेने कायमच इंदिराजींचा आदर केला आहे, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले होते. याच पार्श्वभूमीवर अग्रलेखामध्ये, शिवसेनेने सदैव इंदिराजींच्या महान व्यक्तिमत्त्वाचा व त्यांच्यातील मर्दानगीचा आदर केला. जेव्हा इंदिरा गांधींचे प्रतिमाभंजन करण्याचा प्रयत्न झाला त्या त्या वेळी शिवसेना ढाल बनून मध्ये उभी राहिली. शिवसेनेने सोयीसाठी ना छत्रपती शिवरायांचा वापर केला, ना इंदिरा गांधींचा, असे म्हटले आहे.

इंदिराजी महान होत्या

इंदिरा गांधी यांचे व्यक्तिमत्त्व महान होते. त्यास तडे देण्याचे प्रकार यामधील सरकारच्या कार्यकाळात सरकारकडून झाले. आता भाजपला वाटते की, इंदिरा गांधी यांचा अपमान झाला. त्यांना असे वाटणे हाच इंदिराजींचा सन्मान आहे. इंदिरा गांधी आज हयात नाहीत, पण त्यांच्या प्रतिमेचे भंजन करण्याचे उद्योग गेल्या पाच वर्षांत वारंवार झाले. इंदिराजी या शक्तिमान नेत्या होत्या. त्यांनी पाकिस्तानचे तुकडे करून फाळणीचा बदला घेतला, असेही या अग्रलेखात म्हटले आहे. 

इतका बेजबाबदार विरोधी पक्ष राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच

या अग्रलेखामध्ये भाजपा हा बेजबाबदार विरोधी पक्ष असून इतका बेजबाबदार विरोधी पक्ष राज्याच्या इतिहासात आधी निर्माण झाला नव्हता असा टोलाही लगावण्यात आला आहे. “भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांना समुपदेशनाची गरज असल्याचे आम्ही म्हणतो ते किती खरे आहे, याचे प्रत्यंतर आपल्या कृतीतून ते रोज देत आहेत. मूळ भाजप राहिला बाजूला, पण भाजपात घुसलेल्या इरसाल ‘बाटग्यां’नी ऊठसूट सिलिंडर वर करून ‘बांग’ देण्याचे प्रकार सुरू केले आहेत. हे काही चांगल्या मानसिकतेचे लक्षण नाही.

सत्ता हातून सटकल्याने निद्रानाशाचा रोग जडला हे समजू शकतो, पण त्या निद्रानाशातून त्यांना जे झटके व आचके येत आहेत त्यातून महाराष्ट्राच्या इभ्रतीस तडे जात आहेत. इतका बेजबाबदार विरोधी पक्ष महाराष्ट्राच्या इतिहासात निर्माण झाला नसेल, पण आधी अक्कल जाते व मग उरलेसुरले भांडवल जाते तसा काहीसा प्रकार सुरू आहे. सोयीनुसार टोप्या घालण्याचे व बदलण्याचे उद्योग सुरू झाले आहेत,” असं अग्रलेखात म्हटलं आहे.

मोदींना पेढेवाले म्हणणाऱ्यांबरोबर भाजपा असल्याचा आनंद

उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची काही वर्षांपूर्वी साताऱ्यातील पेढेवाल्यांशी केलेल्या तुलनेवरुनही अग्रलेखातून भाजपाला सुनावले आहे. अग्रलेखामध्ये, “पंतप्रधान मोदी या उत्तुंग व्यक्तिमत्त्वास ‘पेढेवाले’ वगैरे थिल्लर उपमा देऊन त्यांचे हसे करणाऱ्यांच्या बाजूने संपूर्ण भाजप उभा ठाकला आहे. म्हणजे मोदी यांची तुलना सातारच्या पेढेवाल्यांशी केली हे भाजप नेतृत्वास बिनशर्त मान्य असेल तर प्रश्नच संपतो, पण राज्याच्या भाजप नेतृत्वाने एकदा तसे स्पष्ट करावे हे बरे. छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा फक्त स्वराज्यासाठी होता, स्वतःसाठी नव्हता, हे समजून घेतले पाहिजे. शिवरायांनी मावळ्यांना स्वराज्याचे ध्येय दिले होते. जुलूमाविरुद्ध लढण्याचे धैर्य दिले होते. हे शिवरायांचे नाव घेऊन विरोधासाठी विरोध करणाऱ्यांनी विसरू नये. शिवराय जरा समजून घ्या इतकेच त्यांना सांगायचे आहे,” असं म्हटलं आहे.

…तर मोदी शाहांवर ती वेळ आली नसती

करीम लाला आणि इंदिरा गांधी भेटीच्या वक्तव्यावरुन वाद निर्माण करणाऱ्या भाजपाला मेहबुबा मुफ्तीशी गुफ्तगू करुन सरकार स्थापन करावे लागल्याचा टोला शिवसेनेनं लगावला आहे. “करीम लाला व इंदिरा गांधी यांच्या भेटीसंदर्भात एका जुन्या घटनेचा उल्लेख केल्यामुळे काँग्रेसने खुलासा करावा वगैरे पांचट प्रश्न भाजपच्या थिल्लर यंग ब्रिगेडकडून विचारले जात आहेत. भाजपास सध्या विशेष काम नसल्याने ते अनेक विषयांचे उत्खनन करू लागले आहेत. राजकारणात कोण कधी कुणास भेटेल व भेटण्याची परिस्थिती निर्माण होईल ते सांगता येत नाही. तसे नसते तर ज्यांच्यावर देशद्रोहाचे, फुटीरतेचे आरोप आहेत अशा मेहबुबा मुफ्तीशी ‘गुफ्तगू’ करून सरकार बनविण्याची वेळ श्री. मोदी किंवा शहांवर आली नसती,” अशा शब्दात भाजपाच्या राजकारणावर टीका केली आहे.

करीम लाला कोण होते?

करीम लाला कोण होते यासंदर्भातही अग्रलेखामध्ये सविस्तर माहिती देत भाजपाला लक्ष्य करण्यात आलं आहे. “साठच्या दशकात करीम लाला हे गृहस्थ मुंबईत बसून जगभरातील पठाणांच्या समस्या सोडविण्यासाठी एक संघटना चालवीत होते व खान अब्दुल गफारखान ऊर्फ सरहद्द गांधी हे त्यांचे प्रेरणास्थान होते. स्वातंत्र्यलढ्याशी निगडित पाकिस्तानातील प्रमुख दुवा म्हणून सरहद्द गांधी यांचे महत्त्व होते. त्यांची ‘खुदाई खिदमतगार’ ही संघटना होती व करीम लालासारखे तरुण त्या संघटनेशी जोडले गेले होते.

धार्मिक आधारावर देशाची फाळणी होऊ नये अशी ठामपणे भूमिका घेणाऱ्यांपैकी खान अब्दुल गफारखान होते. पठाण समुदायास पाकिस्तानच्या अमलाखाली चांगले जीवन जगता येणार नाही ही त्यांची खंत होती व त्यामुळे पठाण समुदायातील अनेक तरुण अफगाणिस्तान, पाकिस्तान व काहीजण हिंदुस्थानात येऊन आपल्या अस्तित्वासाठी लढत होते. त्यातले एक गृहस्थ करीम लाला. ही माहिती सरकारी रेकॉर्डवर आहेच व त्याच काळात खान अब्दुल गफारखान यांचे काम करीम लाला मुंबईत राहून करीत होता व अनेक नेत्यांच्या गाठीभेटी व बैठकांत तो त्या वेळी दिसला आहे. मुसाफिरखान्यात करीम लालाचे कार्यालय होते व त्यांच्या दर्शनी भागात करीम लालाचे जगभरातील अनेक प्रमुख नेत्यांबरोबरचे फोटो लावले होते. आज ते कार्यालय, त्यांचा तो दिवाणखाना अस्तित्वात नाही,” असं या अग्रलेखात म्हटलं आहे.

…तर तोंडे कायमची बंद होतील

करीम लाला यांचा संदर्भ देत वाल्याचे वाल्मीकी करून घेणारे ‘वॉशिंग मशीन’ राजकारणात आणणारा पक्ष कोणता आहे हे सर्वांना ठाऊक आहे अशा शब्दात भाजपाला फटकारले आहे. “करीम लाला यांच्या कार्यालयातील बड्या बड्या नेत्यांसोबतचे त्यांचे फोटो आजच्या भाजप नेत्यांनी पाहिले असते तर आज इंदिरा गांधी यांच्याबाबत जे आक्षेप घेत आहेत त्यांच्या डोळ्यांची बुबुळेच बाहेर पडली असती. सर्वच पक्षांच्या लोकांशी करीम लालाचे जिव्हाळय़ाचे संबंध होते व त्या वेळी मुंबईत अंडरवर्ल्ड नावाचा प्रकार सुरू व्हायचा होता. हा सर्व प्रकार खरे तर राजकारणात गेल्या काही वर्षांपासून जोरात सुरू आहे व मुख्य म्हणजे वाल्याचे वाल्मीकी करून घेणारे ‘वॉशिंग मशीन’ राजकारणात कोणी आणले व अशा नव्या वाल्मीकींसाठी पायघड्या कोणी घातल्या याचा खुलासा आम्ही करावा का? ये पब्लिक है! सबकुछ जानती है! इंदिरा गांधी या पंतप्रधान असताना कुणाला भेटल्या हा वादाचा विषय होऊच शकत नाही.

पंतप्रधान म्हणून अनेकदा फुटीरतावाद्यांशी चर्चा कराव्या लागतात व अशा चर्चा अलीकडच्या काळात अनेकदा झालेल्या आहेत. मुख्यमंत्री कार्यालयातून थेट तुरुंगात कुणाचे फोन मागच्या काळात जात होते? का? कशासाठी? यावर अनेकदा स्फोट झाले आहेत. कोल्हापूरसारख्या ठिकाणी जन्मपेठेच्या शिक्षा भोगलेल्यांना निवडणुका लढविण्यासाठी रसद पुरवणारे कोण होते व अशा अनेक आधुनिक वाल्मीकींना पोलीस संरक्षण कसे मिळत होते? यावर खुलासे झाले तर अनेकांची तोंडे कायमची बंद होतील,” अशा शब्दात भाजपाला सुनावले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com