खडसे यांची दिल्लीत पवारांशी अर्धातास चर्चा; आज उद्धव ठाकरेंची भेट 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

खडसे यांनी दिल्लीत सकाळी दाखल झाल्यावर सायंकाळी पवारांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. उभयतांत अर्धा तास चर्चा झाली. नेमकी कार्य चर्चा झाली ते समजू शकले नसले तरी रावेर भागातील शेळगाव बंधारा व बोदवड सिंचन प्रकल्पाच्या संदर्भात ही चर्चा झाल्याचे खडसे यांनी पत्रकारांना सांगितले. जाणकारांच्या म्हणण्यानुसार पवार यांना भेटून खडसे अर्धा तासात बाहेर येतात त्याअर्थी त्यांना फारसा आशादायक प्रतिसाद मिळाला असण्याची चिन्हे नाहीत. 

नवी दिल्ली : भाजपमधून बाहेर पडण्याचे सूतोवाच करणारे व इशारे देणारे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज दिल्लीवारी करून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. मात्र त्यांना भाजपाध्यक्ष तर सोडाच; पण कार्यकारी अध्यक्षांचीही वेळ रात्री उशिरापर्यंत मिळालेली नव्हती. ""आपल्याला पक्षातून दूर करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येत आहे. मी "यांची' आरती करावी काय?'' असे विचारणारे खडसे यांना भाजपच्या दृष्टीने बोलायचे तर रिकाम्या हातानेच माघारी परतण्याची वेळ येणार असे दिसत आहे. 

खडसे यांनी दिल्लीत सकाळी दाखल झाल्यावर सायंकाळी पवारांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. उभयतांत अर्धा तास चर्चा झाली. नेमकी कार्य चर्चा झाली ते समजू शकले नसले तरी रावेर भागातील शेळगाव बंधारा व बोदवड सिंचन प्रकल्पाच्या संदर्भात ही चर्चा झाल्याचे खडसे यांनी पत्रकारांना सांगितले. जाणकारांच्या म्हणण्यानुसार पवार यांना भेटून खडसे अर्धा तासात बाहेर येतात त्याअर्थी त्यांना फारसा आशादायक प्रतिसाद मिळाला असण्याची चिन्हे नाहीत. 

दरम्यान, खडसे यांनी भाजप नेतृत्वाचीही भेटीची वेळ मागितली असली तरी गृहमंत्री अमित शहा रात्री उशिरापर्यंत लोकसभेत असल्याने त्यांना आजची वेळ मिळणार नसल्याचे सांगण्यात आले. त्यांना कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेण्यास सांगण्यात आले. मात्र नड्डा यांचीही आजची वेळ मिळणार नसल्याचे नंतर सांगितले गेले. त्यानंतर खडसे यांनी माघारी परतण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. 

मुख्यमंत्री ठाकरे यांना भेटणार 
खडसे यांची दिल्ली येथे दोन दिवसाचा दौरा होता. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर ते तातडीने विमानाने मुंबईकडे रवाना झाले आहे. रात्री साडे आठवाजेपर्यंत ते मुबंईत पोहोचणार असल्याचे सांगण्यात आले. ते राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचीही भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले. शेळगाव बॅरेजच्या प्रकल्पासंदर्भातच ते चर्चा करणाऱ्या असल्याचे सांगण्यात आले. परंतु भाजपवर नाराज असलेल्या खडसेंची राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते शरद पवार यांच्या भेटीनंतर उद्या मुबंईत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट होत असल्याने राज्यातील राजकाणात मोठी खळबळ उडाली आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news eknath khadse cm thakre meet mumbai