मराठी भाषेचा खेळखंडोबा कोण करतोय?: अजित पवार

सिद्धेश्वर डुकरे/विजय गायकवाड
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

सुरेश भट यांच्या मराठी गीतातील सातवे कडवे 
पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी ।
आपुल्या घरीच हाल सोसते मराठी ।
हे असे कित्येक खेळ पाहते मराठी ।
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी ।  

मुंबई : राज्यपालांचे अभिभाषण आणि मराठी भाषा दिन कार्यक्रमातील गलथानपणामुळे राज्याची लाज गेली असून मराठीचा जाणीवपुर्वक खेळखंडोबा करणाऱ्यांची गय करु नका, अशा शब्दात राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते अजित पवार विधानसभेत कडाडले.

आज (ता. 27) मराठी भाषा गौरव दिनी सुरेश भट यांचे मराठी गीत गायले गेले. हे गीत सात कडव्यांचे आहे, मात्र सरकारने आज जे गीत गाण्यासाठी छापले होते त्यातले शेवटचे कडवे गाळण्यात आले. सात कडव्यांचे गाणे असताना सहा कडवी छापली आणि गायली गेली. हा मराठी भाषेचा आणि सुरेश भट यांचा अपमान आहे. राज्यपालांच्या अभिभाषणात मराठी अनुवादकाला रोखून धरले. राज्यपालांनी देखील या प्रकरणी नाराजी व्यक्त केली. आज मराठी भाषा कार्यक्रमात माईक बंद पडला. मराठी गौरव गीताचे शेवटचे कवडे गाळले. कोणीतरी जाणीवपुर्वक मराठीचा खेळखंडोबा करत आहे. हे मुद्दाम केले जातेय का? अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. 

सुरेश भट यांच्या मराठी गीतातील सातवे कडवे 
पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी ।
आपुल्या घरीच हाल सोसते मराठी ।
हे असे कित्येक खेळ पाहते मराठी ।
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी ।  

हे कडवं वगळण्यात आले. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विधानसभा व विधानपरिषद सदस्यांकडून विधानभवनाच्या परिसरात मराठी गीत गाण्यात आले. या गीतातून सातवे कढवे काढण्यात आल्याने विधानसभेत गोंधळ झाला. अजित पवार, विरोध पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका करत माफी मागण्याची मागणी केली. तर, मुख्यमंत्र्यांनी हे कडवं कधी लिहलं गेलं ते शोधा. तेव्हा मुख्यमंत्री कोण होतं, ते बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल असे उत्तर दिले.

मराठी भाषा जास्तीत जास्त लोकाभिमुख होऊन ती ज्ञानभाषा व्हावी यासाठी विधानसभेत मराठी भाषेच्या विकास प्रक्रियेस सरकारने अधिक चालना द्यावी असा ठराव एकमताने मंजूर झाला.

गीतातून कडवे काढण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला: जयंत पाटील
मराठी गीतामध्हेये  कडवं लिहलं आजही सत्य आहे. गीतातून हे कडवं काढण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला, असा प्रश्न जयंत पाटील यांनी सरकारला विचारला. तर, मराठी भाषेची भावना व्यक्त करणारी ही कविता आहे. हा मराठी भाषेचा अवमान आहे, सरकारने माफी मागायला हवी, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले.

Web Title: Marathi news Maharashtra news Ajit Pawar on Marathi din