'मुदतपूर्व'च्या फुक्‍या जोर-बैठका

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 16 जून 2017

मुंबई - मुदतपूर्व निवडणुकीच्या फुक्‍या जोर-बैठकांना चेव आला आहे. 'राजकीय भूकंपा'च्या शिवसेनेच्या धमकीला उत्तर देताना, 'राजकीय भूकंपाची भाषा वापरली जाणार असेल तर आम्ही मुदतपूर्व निवडणुकीत बहुमताने विजयी होऊ,' असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. या तोंडपाटीलकीत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनीही उड्या घेतल्या आहेत.

मुंबई - मुदतपूर्व निवडणुकीच्या फुक्‍या जोर-बैठकांना चेव आला आहे. 'राजकीय भूकंपा'च्या शिवसेनेच्या धमकीला उत्तर देताना, 'राजकीय भूकंपाची भाषा वापरली जाणार असेल तर आम्ही मुदतपूर्व निवडणुकीत बहुमताने विजयी होऊ,' असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. या तोंडपाटीलकीत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनीही उड्या घेतल्या आहेत.

दुसरीकडे, मुदतपूर्व निवडणुकीची तयारी असेल, तर तो पैसा शेतकऱ्यांना द्या, त्यांचा पूर्ण सातबारा कोरा करा, कुठलाही निकष लावू नका. मात्र, शेतकऱ्यांना कर्जमुक्त न करता मुदतपूर्व निवडणुकीचा मुद्दा पुढे करून भाजप या विषयाला कुठे तरी फाटा देत असल्याचा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेगाव येथे केला.
कर्जमाफीनंतर शिवसेनेने दबावाची भाषा कायम ठेवली असतानाच फडणवीस यांनी केलेले हे विधान सहकारी पक्षाला गर्भित इशारा देणारे मानले जात असून प्रत्येक राजकीय पक्षाने मुदतपूर्व निवडणुकीच्या चर्चेत आपापली भर टाकली.

सत्तारूढ भाजपने मात्र मुख्यमंत्र्यांचे विधान हे प्रतिक्रियात्मक असल्याचे स्पष्ट केले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मुंबईत बोलताना, 'असा निर्णय आम्ही घेणार नाही; पण कुणी वारंवार धमकीवजा भाषा वापरत असेल तर निवडणुकीत आम्हीच जिंकू,' असे स्पष्ट केले. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही हीच प्रतिक्रिया असल्याचे सकाळ माध्यम समूहातील संवादादरम्यान स्पष्ट केले.

मुंबई भेटीवर असलेल्या दिल्लीतील काही पत्रकारांनी काल रात्री फडणवीस यांच्याशी बोलताना तुमचा सहकारी पक्ष वारंवार बाहेर पडण्याचा दबाव टाकत असतो, त्यांनी पाठिंबा काढला तर काय करणार, असा प्रश्‍न शिवसेनेचे नाव न घेता केला. त्यावर फडणवीस यांनी, 'तसे झालेच तर भाजप मुदतपूर्व निवडणुकीला सामोरा जाईल आणि सर्वाधिक जागा निवडून आल्यानंतर क्रमांक एकचा पक्ष होईल,' असे स्पष्ट केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत भाजप प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरला असून आम्ही क्रमांक चारवरून एक पोचलो आहोत, असेही ते म्हणाले.

वेगळी क्रांती : ठाकरे
बुलडाणा जिल्ह्यातील शेगावमध्ये बोलताना उद्धव म्हणाले, की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी कर्जमुक्तीसाठी एक ठिणगी टाकून वेगळी क्रांती घडविली. आम्ही सत्तेची परवा न करता सुरवातीपासून उघडपणे शेतकऱ्यांच्या सोबत राहिलो. कर्जमुक्तीसाठी अभियान सुरू असताना शेतकऱ्यांनी विविध आंदोलन केली, संप केले. त्या वेळीसुद्धा शिवसैनिक शेतकऱ्यांच्या बाजूने उभे होते, आम्ही उघड पाठिंबा दिला. भाजपने कर्जमुक्ती केली असली तरी, निकष ठरल्यावरच शेतकरी कर्जमुक्त होईल.

शिवसेनेचे हसू : विखे
नगर : 'राज्यातील मुदतपूर्व निवडणुकीचा विषय मूळ विषयाला बगल देण्यासाठी आहे. तथापि, सरकार मुदतपूर्व निवडणूक घेत असेल, तर आम्ही तयार आहोत,' असा सूचक इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज दिला.

नगर येथील एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ''सरकारने केलेल्या कर्जमाफीच्या घोषणेबाबत अनेक प्रश्‍नचिन्हे आहेत. पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना दहा हजार रुपये देणार आहेत. मात्र, ते बॅंकेच्या नियमात बसते का, रिझर्व्ह बॅंक आणि 'नाबार्ड'ने हा निर्णय घेतला असता, तर तो मान्य होता. सरकार कसे काय शेतकऱ्यांना दहा हजार रुपये देऊ शकते? शिवसेनेच्या मागण्यांना सरकारने वाटण्याचा अक्षता लावल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेचे हसू झाले.

'राष्ट्रवादी' तयार : अजित पवार
नांदेड : केंद्र आणि राज्यातही बहुमत असताना मुख्यमंत्री मुदतपूर्व निवडणुकीला तयार असल्याची भाषा बोलत आहेत. मागील वेळेसही भाजप-शिवसेना युतीचे सरकार साडेचार वर्षेच राहिले. भाजपलाच त्यांच्या मित्रांबद्दल शंका येत असेल, असे शिवसेनेचे नाव न घेता माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले व त्यांची तयारी असेल तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचीही मुदतपूर्व निवडणुकीची तयारी असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, की पाच वर्षे सत्तेत राहायचे की मुदतपूर्व निवडणूक घ्यायची, हे सरकारने ठरवायचे असते आणि त्यांचा अंदाज कळायला मी काही मनकवडा किंवा ज्योतिषी नाही. त्यांची मुदतपूर्व निवडणुकीची तयारी असेल तर आमचीही असल्याचे त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news mumbai news elections cm devendra fadnavis