शिवरायांच्या पुतळ्याच्या उंचीवरून गदारोळ

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 8 मार्च 2018

मुंबई - अरबी समुद्रात मुंबईत उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जगातील सर्वांत उंच पुतळ्याच्या उंचीवरून विधानसभेत बुधवारी रणकंदन झाले. यासंदर्भात स्थगन प्रस्ताव देत चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी केल्यानंतर ती मागणी फेटाळल्याने सदस्यांनी सभापतींसमोरील मोकळ्या जागेत (वेल) उतरून गदारोळ घातला. त्यामुळे काही काळासाठी कामकाज तहकूब करावे लागले.

मुंबई - अरबी समुद्रात मुंबईत उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जगातील सर्वांत उंच पुतळ्याच्या उंचीवरून विधानसभेत बुधवारी रणकंदन झाले. यासंदर्भात स्थगन प्रस्ताव देत चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी केल्यानंतर ती मागणी फेटाळल्याने सदस्यांनी सभापतींसमोरील मोकळ्या जागेत (वेल) उतरून गदारोळ घातला. त्यामुळे काही काळासाठी कामकाज तहकूब करावे लागले.

‘‘हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि स्वाभिमानाचा विषय आहे. मी सरकारच्या माध्यमातून जनतेला आश्‍वस्त करतो की, शिवरायांचा हा पुतळा जगातील सर्वांत मोठा पुतळा असेल,’’ असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले; मात्र यावर विरोधकांचे समाधान झाले नाही. या गोंधळात शिवसेना सभागृहात शांत भूमिकेतच दिसून आली.

चौथऱ्याची उंची वाढवली
राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा आराखडा बदलला आहे. या नव्या आराखड्यात चौथऱ्याची उंची वाढवली आणि पुतळ्याची उंची कमी केली आहे. ही गंभीर बाब आहे. जनतेला वस्तुस्थिती कळली पाहिजे. खर्च कमी करण्यासाठी हा बदल केला जात आहे. पुतळा कास्य धातूचा आहे. त्याची उंची कमी करून सिमेंटच्या चौथऱ्याची उंची वाढवली आहे. पर्यावरण विभागाची जुन्या आराखड्याला मंजुरी मिळाली होती. नव्या आराखड्याला परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे अद्याप काम सुरू करता आलेले नाही, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

किंमत मोजावी लागेल - पवार
छत्रपतींचे नाव घेऊन राज्य करता आणि शिवस्मारकाची उंची कमी केली जाते. जगातील सर्वांत उंच स्मारक बनले पाहिजे, त्याची इतिहासात नोंद झाली पाहिजे. उंची कमी करण्याचा प्रयत्न केला तर जनता तुम्हाला माफ करणार नाही. याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा विधिमंडळ गटनेते अजित पवार यांनी दिला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची उंची १६० वरून १२६ मीटर कमी केली असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. हा विषय महत्त्वाचा आहे. कामकाज स्थगित करून या विषयावर चर्चा करण्याची विनंती ज्येष्ठ सदस्य गणपतराव देशमुख यांनी केली. 

हक्कभंग आणू का? - चव्हाण
अरबी समुद्रातील नियोजित स्मारकावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी करण्यात आलेली नसल्याचा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका निवेदनाद्वारे विधानसभेत करताच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे भलतेच संतापले. पुतळ्याची उंची कमी केल्याचे पत्र दाखवू का? नाही तर तुमच्या विरोधात हक्कभंग आणेन, असा संतप्त इशारा त्यांनी बुधवारी दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news shivaji maharaj vidhan sabha maharashtra