esakal | वंचित आघाडीची मुख्यमंत्रिपदासह निम्म्या जागांची कॉंग्रेसकडे मागणी 
sakal

बोलून बातमी शोधा

residentional photo

वंचित आघाडीची मुख्यमंत्रिपदासह निम्म्या जागांची कॉंग्रेसकडे मागणी 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक ः विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात कॉंग्रेससोबत युतीची चर्चा सुरू आहे. वंचित आघाडीने कॉंग्रेसकडे 144 जागांची मागणी केली आहे. ऍड. प्रकाश आंबेडकर यांना मुख्यमंत्रिपद द्यावे, ही वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे. आमच्या मागणीवर सकारात्मक विचार झाल्यास कॉंग्रेससोबत युती होईल, अन्यथा तीन जिल्हे वगळता राज्यात सर्व जागांवर उमेदवारही आमच्याकडे तयार आहेत, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे पार्लमेंटरी बोर्डाचे सदस्य अण्णाराव पाटील व रेखा ठाकूर यांनी दिली. 

वंचित बहुजन आघाडीतर्फे विधानसभेच्या इच्छुक उमेदवारांच्या श्री. पाटील व श्रीमती ठाकूर यांनी नाशिक येथे शनिवारपासून मुलाखती सुरू केल्या. त्या वेळी पत्रकारांशी बोलताना श्री. पाटील यांनी ही माहिती दिली. जिल्हाध्यक्ष पवन पवार, महानगरप्रमुख अविनाश शिंदे उपस्थित होते. 
श्री. पाटील म्हणाले, की राज्यात गेल्या 70 वर्षांत प्रस्थापित राजकीय पक्षांनी फक्त मोठ्या जातीच्या उमेदवारांना राजकारणात घेत वंचित, दुर्बल घटकांवर कायम अन्याय केला आहे. त्यामुळेच "लोकशाहीचे सब हकदार' या न्यायाने कमी लोकसंख्येच्या जातीच्या उमेदवारांना वंचित बहुजन आघाडीने संधी देण्याचे धोरण ठेवले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी याच न्यायाने उमेदवार निवडले जातील. नाशिक, सोलापूर व नगर हे जिल्हे वगळता इतर सर्व जागांवरील इच्छुकांच्या मुलाखती झाल्या आहेत. नाशिकमध्ये चांगला प्रतिसाद असून, 15 जागांसाठी 110 इच्छुकांनी उमेदवारी मागितली आहे. 

मंत्रीही आमच्या संपर्कात 

बहुजन वंचित आघाडीकडे काही मंत्री संपर्क साधून आहेत. आताच नावे जाहीर करू नये, अशी संबंधितांनी विनंती केल्याने आम्ही नाव जाहीर करीत नाही. पण इच्छुकांत माजी खासदार, आमदार, सत्ताधारी भाजप व नागपूरला मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मतदारसंघात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ब्राह्मण समाजातील वंचित कार्यकर्त्याने उमेदवारी मागितली आहे. 
 

loading image
go to top