Marathwada Mukti Sangram Day: CM शिंदेनंतर शिवसेनेचे अभिवादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Marathwada Mukti Sangram Day: CM शिंदेनंतर शिवसेनेचे अभिवादन

Marathwada Mukti Sangram Day: CM शिंदेनंतर शिवसेनेचे अभिवादन

आज हैदराबाद मुक्ती दिनाच्या सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. हैदराबाद मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते औरंगाबादमध्ये ध्वजारोहण करण्यात आले. सकाळी 9 वाजता होणारे ध्वजारोहण 7 वाजताच करण्यात आलं. याचा निषेध करत शिवसेनेकडून पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी ध्वजारोहण केलेल्या ठिकाणी 9 वाजता अभिवादन करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांचा निषेध म्हणून शिवसेनेकडून पुन्हा एकदा अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवेही उपस्थित होते.

औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यानामध्ये अभिवादन करण्यासाठी आलेल्या अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली आहे. यावेळी प्रतिक्रिया देताना विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे म्हणाले की, दिल्लीतून पातशहा हैदराबादमधील कार्यक्रमाला येणार आहे. त्याच कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुद्धा उपस्थित राहायचं होतं. या कारणांमुळे औरंगाबादमधील ध्वजहरणाची वेळ बदलण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ही भूमिका म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्रामासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान आहे असं दानवे म्हणालेत.

दरवर्षी 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणुन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र यावर्षी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या ध्वजारणाच्या वेळेवरून शिवसेना-शिंदे गटामध्ये राजकीय वाद सुरू झाला. दरवर्षी औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यानामध्ये सकाळी नऊ वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते. पण, यावर्षीचे ध्वजारोहण सकाळी सात वाजताच करण्यात आले आहे.

पुढे बोलताना दानवे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी ज्या घोषणा केल्या आहेत त्या जुन्याच आहेत, त्यातील अनेक कामे सुरू आहेत. कोणतीही नवीन घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली नसून हा मराठवाड्यावर अन्याय आहे. पश्चिम महाराष्ट्रापेक्षा मराठवाडा मागे आहे. त्याला पुढे आणण्यासाठी हा महत्वाचा क्षण होता, पण मुख्यमंत्र्यांनी काही घोषणा केली नाही.

पुढे बोलताना दानवे म्हणाले की, भूखंडाच्या सर्व फाईल थांबवल्या आहेत, एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. उद्योगासाठी हे घातक असून यापूर्वी असं कधीही झालेले नाही. उद्योजक नाराज असून दिल्लीपर्यंत याच्या तक्रारी गेल्या आहेत, असंही दानवे म्हणालेत.

मराठवाडा मुक्तिसंग्रामच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांनी फक्त 15 मिनिटं वेळ देणं हा मराठवाडा मुक्त करणाऱ्यांचा अवमान असल्याची टीकाही शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली आहे.

टॅग्स :CM Eknath ShindeShiv Sena