राज्यात मास्क सक्ती नाहीच! ‘हे’ १८ जिल्हे कोरोनामुक्त; १५ जिल्ह्यांमध्ये ७ पेक्षा कमी रुग्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona
राज्यात मास्क सक्ती नाहीच! ‘हे’ १८ जिल्हे कोरोनामुक्त; १५ जिल्ह्यांमध्ये ७ पेक्षा कमी रुग्ण

राज्यात मास्क सक्ती नाहीच! ‘हे’ १८ जिल्हे कोरोनामुक्त; १५ जिल्ह्यांमध्ये ७ पेक्षा कमी रुग्ण

सोलापूर : राज्यात कोरोनाचे अवघे १३४ सक्रिय रुग्ण असून सोलापूरसह १८ जिल्हे कोरोनामुक्त आहेत. १५ जिल्ह्यांमध्ये सातपेक्षा कमी रुग्ण आहेत. त्यामुळे परदेशातील रुग्णवाढीमुळे आपल्याकडे मास्क सक्ती तथा निर्बंधाची आवश्यता नाही, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. तरीपण, टेस्टिंग, ट्रॅकिंग, ट्रिटमेंट, वॅक्सिनेट व खबरदारी या पंचसूत्रीचा अवलंब करावा, असे आवाहन केले आहे.

चीनमध्ये सध्या ‘बीएफ ७’ हा कोरोनाचा नवा व्हेरियंट आढळला असून रुग्ण वाढत आहेत. अमेरिका, जपान व ब्राझिलमध्येही कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. आतापर्यंत राज्यातील ८१ लाखांहून अधिक व्यक्तींना कोरोनाची बाधा होऊन गेली आहे. त्यातील एक लाख ४८ हजार ४१४ रुग्णांचा कोरोनाने जीव घेतला आहे. परंतु, राज्यात कोविशिल्ड, कोवॅक्सिन, कोर्बोवॅक्स अशा लशींचे प्रतिबंधित लसीकरण मोठ्या प्रमाणावर झाले आहे. त्यामुळे सध्या निम्मा महाराष्ट्र पूर्णत: कोरोनामुक्त झाला असून पुणे, मुंबई वगळता बहुतेक जिल्हे कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर आहेत. तरीपण, नागरिकांनी गाफिल न राहता काळजी घ्यायलाच हवी. ज्यांनी प्रतिबंधित लसीचे दोन डोस घेतले आहेत, त्यांनी आता संरक्षित डोसची (बुस्टर) मात्रा घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

ठळक बाबी...

  • राज्यातील १८ जिल्हे कोरोनामुक्त तर १५ जिल्ह्यांमध्ये सातपेक्षा कमी रुग्ण

  • आतापर्यंत राज्यातील साडेआठ कोटी संशयितांची करण्यात आली कोरोनाटेस्ट

  • आतापर्यंत ८१.३६ लाख व्यक्तींना कोरोनाची बाधा; एक लाख ४८ लाख ४१४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

  • राज्यात सध्या १३४ सक्रिय रुग्ण; पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ५९ तर मुंबईत ३५ रुग्ण

मास्क सक्ती नाही; पंचसूत्रीवर भर

चीन, जपान, ब्राझिल व अमेरिकेत कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे रुग्ण वाढू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून राज्य सरकारने नागरिकांना घाबरू नका, पण काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. गर्दीच्या ठिकाणी अतिजोखमीच्या व ज्येष्ठांना पाठवू नका, असेही सांगितले आहे. दरम्यान, राज्यात मास्क सक्ती केली जाणार नाही, तरीपण आरोग्य विभागाने प्रतिबंधित लसीकरण विशेषत: संरक्षित डोसवर भर द्यावा, टेस्टिंग, ट्रॅकिंग, ट्रिटमेंट, वॅक्सिनेट व कोरोनापासून सुरक्षित राहण्याचे उपाय, या पंचसूत्रीवर भर देण्याचे आदेश राज्य सरकारने आरोग्य विभागाला दिले आहेत.

राज्यातील १८ कोरोनामुक्त जिल्हे

सोलापूर, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, नंदुरबार, धुळे, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली हे १८ जिल्हे सध्या कोरोनामुक्त आहेत. तर पालघर, रायगड, सातारा, नाशिक, जालना, लातूर, औरंगाबाद, उस्मानाबाद, अकोला, वाशिम, बुलढाणा, नागपूर, भंडारा, ठाणे, नगर हे १५ जिल्हे कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर आहेत. त्या जिल्ह्यांमध्ये सातपेक्षा कमी रुग्ण सक्रिय आहेत.