

mantralay
तात्या लांडगे
सोलापूर : जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये आता १७६ पदांची भरती होणार आहे. महिला व बालविकास विभागाने भरतीचे वेळापत्रक जाहीर केले असून, २० ते ३१ जुलैपर्यंत इच्छुकांकडून अर्ज मागवून घेतले जाणार आहेत. त्यानंतर २७ ऑगस्ट रोजी निवडलेल्या महिला उमेदवारांना नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत. सेविकेस दरमहा १३,००० तर मदतनीस महिलेस ७,५०० रुपये मानधन दिले जाणार आहे.
राज्यातील १ लाख १० हजार ६६४ अंगणवाड्यांमधील १०१५ सेविका आणि ३९२८ मदतनीस पदांची भरती होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये ११५ मदतनीस व ६१ सेविकांची भरती केली जात आहे. त्यानुसार, पहिल्यांदा सध्या कार्यरत मदतनीसमधून सेवाज्येष्ठतेनुसार सेविका पदासाठी पात्र असलेल्या महिलांची यादी प्रसिद्ध होईल. त्यांना सेवाज्येष्ठतेनुसार सेविका म्हणून संधी मिळणार आहे. त्यानंतर २० ते ३१ जुलैपर्यंत रिक्त पदांच्या जाहिराती देऊन त्या-त्या गावातील इच्छुक महिला उमेदवारांकडून अर्ज मागवून घेतले जाणार आहेत.
३ ते ७ ऑगस्टपर्यंत अर्जांची छाननी होऊन प्राथमिक यादी तयार होईल. १० ते १२ ऑगस्ट दरम्यान पडताळणी समितीच्या माध्यमातून गुणवत्ता याद्यांची पडताळणी होणार आहे. या यादीवर कोणाची हरकत अथवा आक्षेप असल्यास, त्यांना १३ ते २६ ऑगस्टपर्यंत हरकती व आक्षेप नोंदविता येतील. त्यानंतर २७ ऑगस्टला अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होऊन निवडलेल्या महिलांना नियुक्तीपत्रे दिली जातील, असे शासनाने वेळापत्रक जाहीर केले आहे.
अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे काम काय?
घरपोच पोषण आहार वितरण, वृद्धी संनियंत्रण (गरोदर महिलांच्या वजनाच्या नोंदी), तीन ते सहा वर्षे वयोगटातील बालकांचे पूर्वप्राथमिक शिक्षण (दरमहा मुलांची किमान १६ दिवस उपस्थिती), गरम व ताजा आहार, आहार-आरोग्य दिन (दरमहा एक कार्यक्रम), बालकांच्या आरोग्याची काळजी, शासनाच्या अन्य योजनांची कामे, पोषण ट्रॅकरवर माहिती भरणे तसेच स्थूल, लठ्ठ व खुज्या बालकांचे प्रमाण कमी करण्यासाठी काम करणे, अशा जबाबदाऱ्या अंगणवाडी सेविकांवर असतात. तर, अंगणवाडी उघडणे, बालकांच्या शिक्षणासाठी मदत करणे, वृद्धी संनियंत्रणासाठी मदत (गरोदर माता व बालकांच्या वजन व उंचीच्या नोंदी ठेवणे) तसेच शासनाच्या अन्य योजनांच्या अंमलबजावणीसाठी मदत करणे, ही जबाबदारी अंगणवाडीतील मदतनीस यांच्यावर असते.
सोलापुरातील प्रकल्पनिहाय रिक्त जागा
प्रकल्पाचे नाव सेविका मदतनीस
अक्कलकोट १६ ३१
बार्शी ०७ १०
वैराग ०२ १०
करमाळा ०३ ०८
माढा ०२ ०२
टेंभुर्णी ०४ ०३
माळशिरस ०४ ०४
अकलूज ०४ ०३
मंगळवेढा ०१ ०६
मोहोळ ०५ ०२
उत्तर सोलापूर ०२ ०४
पंढरपूर-१ ०० १२
पंढरपूर-२ ०२ ०४
सांगोला ०२ ०२
कोळा ०२ ०७
दक्षिण सोलापूर ०५ ०७
एकूण ६१ ११५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.