मराठा आरक्षणाच्या अध्यादेशास निवडणूक आयोगाची परवानगी; वैद्यकीय प्रवेशाचा मार्ग मोकळा

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 17 मे 2019

राज्यातील वैद्यकीय व दंतवैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. मराठा आरक्षाबाबत अध्यादेश काढण्यास आज निवडणूक आयोगाने मान्यता दिली. 

मुंबई - राज्यातील वैद्यकीय व दंतवैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. मराठा आरक्षाबाबत अध्यादेश काढण्यास आज निवडणूक आयोगाने मान्यता दिली. 

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने 250 मराठा विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा पेच निर्माण झाला होता. त्यामुळे आझाद मैदानात त्यांनी आंदोलन सुरू केले होते. आचारसंहिता सुरू असल्याने सरकारचीदेखील कोंडी झाली होती. यासाठी अध्यादेश काढून या 250 मराठा विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला संरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने निवडणूक आयोगाकडे विनंती केली होती. निवडणूक आयोगाने सरकारची विनंती मान्य करीत अध्यादेश काढण्यास आज परवानगी दिली. उद्यापर्यंत (ता. 17) हा अध्यादेश काढण्यात येईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिली. 

राज्य सरकारने शिक्षण प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू केले आहे. पण, सरकारचा हा कायदा लागू होण्याअगोदरच वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशाचा निर्णय झाल्याने मराठा आरक्षण लागू होणार नसल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. मात्र, केंद्र सरकारने आर्थिक दुर्बलांसाठी 10 टक्‍के आरक्षणाचा घेतलेला निर्णय हा मराठा आरक्षणानंतरचा असतानाही वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठी तो लागू झालेला होता. त्यामुळे मराठा विद्यार्थ्यांनी आक्रमक होत राज्य सरकारविरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Medical courses admission entrance problem sloved