विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही! - चंद्रकांत पाटील

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 16 मे 2019

शरद पवारांना साकडे
राज्य सरकारने मराठा आरक्षणाची चुकीच्या पद्धतीने अंमलबजावणी केल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. या गोंधळातून मार्ग काढावा, अशी मागणी आंदोलक विद्यार्थ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन केली. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, असे आश्‍वासन पवार यांनी दिले.

मुंबई - मराठा समाजातील वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी मराठा आरक्षणातून प्रवेश घेतलेल्या एकाही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही, याची दक्षता घेत आहोत. या मुद्द्यावर कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असून, या विषयावर मार्ग काढण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाकडे परवानगी मागितली आहे. लवकरच त्यावर तोडगा काढण्यात येईल, अशी माहिती महसूलमंत्री व मराठा आरक्षण अंमलबजावणी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी दिली. 

वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी मराठा आरक्षणातून प्रवेश घेतलेले; परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे प्रवेश रद्द झालेले विद्यार्थी, पालक व मराठा समाजातील नेत्यांशी पाटील यांनी आज चर्चा केली. त्यानंतर ते म्हणाले, ‘‘वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेशासंबंधी तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रवेश रद्द झालेल्या मराठा समाजातील सर्व विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत. त्यासाठी निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली आहे.’’

वैद्यकीय पदव्युत्तरच्या जागा वाढवून मिळण्याबाबतही केंद्र सरकारकडे पत्र पाठविण्यात आले आहे. निवडणूक आयोगाची परवानगी आल्यानंतर राज्य सरकार तातडीने कार्यवाही करणार असून, त्यासंबंधीच्या कायदेशीर बाबींची प्रक्रिया सुरू केली आहे. एकाही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेण्यात येत असल्यामुळे विद्यार्थ्यांनी अस्वस्थ होऊ नये, असे आवाहन पाटील यांनी केले.

दरम्यान, नव्याने प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी २५ मे अंतिम तारीख असून, ही मुदत ३१ मेपर्यंत वाढवून देण्याची विनंती करणारा अर्ज सर्वोच्च न्यायालयाकडे करण्यात आला आहे. तसेच, वैद्यकीय पदव्युत्तरच्या जागा वाढवून मिळण्यासंबंधीही केंद्र सरकारकडे पत्र पाठविण्यात आल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Medical Students will not be loss Chandrakant Patil