आठवणींचा अनमोल ठेवा सावरकर सदन

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर सदन
Savarkar Sadan
Savarkar Sadan
Updated on

- सुधीर वैद्य

गेल्या महिन्यात मी मुंबईला गेलो होतो. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर मुंबईच्या दादरला शिवाजी पार्कनजीक बालमोहन शाळेजवळ सावरकर सदनात अनेक वर्षे राहिले, याची मला कल्पना होती. त्यामुळे या वास्तूचे दर्शन घ्यावे, अशी अनेक वर्षांपासूनची इच्छा होती. अखेर ती पूर्ण झाली.

स्वातंत्र्यवीरांच्या सूनबाई म्हणजेच सुंदरताई सावरकर याच निवासस्थानी राहतात. त्यांच्याशी माझा काही वर्षांपूर्वी परिचय झाला. मुंबई भेटीत त्यांच्या भेटीच्या निमित्तानं सावरकर सदन पाहता येईल याचा मला आनंद झाला. मी सपत्नीक आणि मंदार जोशी यांच्यासह सावरकर सदनाला जायला निघालो.

सावरकर अनेक वर्षे ज्या निवासस्थानात राहिले किमान त्या रस्त्याला त्यांचे नाव दिले असावे, असा माझा समज होता. किंवा त्यांच्या निवासस्थानाकडे जाण्यासाठी मार्गदर्शन करणारा एखादा फलक तरी मुंबई महापालिकेनं लावला असावा. परंतु, असा कुठलाही फलक आम्हाला दिसला नाही. एवढेच नव्हे तर रस्त्यावरील व्यावसायिकांना विचारणा केल्यावर त्यांना सावरकर यांच्या निवासस्थानाबद्दल कल्पना नव्हती.

बराच शोध घेतल्यानंतर हे निवासस्थान सापडलं. माझ्याप्रमाणेच सावरकर सदन पाहायला येणाऱ्या अनेकांना असाच अनुभव यापूर्वी आल्याचे समजले. या गोष्टीचे खूप वाईट वाटले. सावरकर सदनाची वास्तू अजूनही भक्कम आहे. तळमजल्यावर सावरकरांशी संबंधित काही वस्तूंचे जतन करण्यात आले आहे. ही वास्तू सर्वसामान्यांना सायंकाळी चार ते सात या वेळेत अजूनही पाहाता येते.

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या सदनातच शेवटचा श्वास घेतला. सावरकरांच्या सूनबाई सुंदर सावरकर यांचीही भेट झाली. तासाभराच्या भेटीत सुंदरताईंनी स्वातंत्र्यवीरांच्या बऱ्याच आठवणी सांगितल्या. सुंदरताईंचं लग्नानंतर नाव बदलावं, अशी इच्छा त्यांचे पती म्हणजे सावरकरांचे चिरंजीव विश्वास सावरकर यांची होती. परंतु, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सुंदर नाव चांगलं असून, ते बदलू नकोस असे सांगितले. याच भेटीत सुंदरताईंनी सावरकरांचे वैयक्तिक आयुष्य कसे होते, याची माहिती दिली. ८८ वर्षीय सुंदरताई या वास्तूत एकट्याच राहतात. त्यांची एक मुलगी ठाण्यात तर दुसरी हैदराबादला राहते.

सुंदरताईंची भेट घेऊन आम्ही तिथे जवळच असलेल्या सावरकर स्मारकाला भेट दिली. हेे स्मारक दादर चौपाटीजवळ आहे. अतिशय मोक्याच्या ठिकाणी असूनही, येथे पर्यटकांची म्हणावी तशी रेलचेल दिसत नाही. येथे सावरकरांशी संबंधित मोठे ग्रंथालय आहे. ज्यांना सावरकर समजून घ्यायचे आहेत, त्यांनी या वास्तूला भेट देणे गरजेचे आहे. हल्ली काही ना काही क्षुल्लक विषय काढून सावरकरांवर होणारी टीका पाहून मन व्यथित होतं. सावरकर गेल्यानंतरही त्यांच्यावर तीव्र टोकाची टीका होणं क्लेशदायी आहे.

आजच्या पिढीला सावरकरांबद्दल, सावरकर स्मारकाबद्दल माहिती होणे गरजेचे आहे. मुंबईत दररोज शेकडो बसेस मुंबई दर्शनच्या नावाखाली फिरत असतात. दिवसभरात या बसेसमधून हजारो लोकांना मुंबईतील वास्तूंचं दर्शन दिलं जातं. अशा वास्तूंमध्ये सावरकर स्मारकाचा समावेश व्हावा. यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला पाहिजे.

- १०४, सहकारनगर, नागपूर मो. ९३२६१७६१३२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com