म्हाडाची महासोडत 15 ऑगस्टपूर्वी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जुलै 2019

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी म्हणजे 15 ऑगस्टपूर्वी राज्यात 14 हजार 621 घरांची सोडत काढली जाईल, अशी माहिती म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी मंगळवारी (ता. 9) पत्रकार परिषदेत दिली.

मुंबई - विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी म्हणजे 15 ऑगस्टपूर्वी राज्यात 14 हजार 621 घरांची सोडत काढली जाईल, अशी माहिती म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी मंगळवारी (ता. 9) पत्रकार परिषदेत दिली; परंतु सामान्य मुंबईकरांना घरे उपलब्ध होणार नसून, फक्त गिरणी कामगारांसाठी 5090 घरांची सोडत काढली जाईल. त्यामुळे गिरणी कामगारांच्या घराचे स्वप्न अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर साकार होणार आहे. 

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे (म्हाडा) अध्यक्ष उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सोडतीसाठी राज्यात उपलब्ध असलेल्या घरांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला मुंबई मंडळाचे सभापती मधू चव्हाण, कोकण मंडळाचे सभापती बाळासाहेब पाटील, मुंबई इमारती दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर आदी उपस्थित होते. राज्यात विधानसभा निवडणूक ऑक्‍टोबरमध्ये होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर म्हाडाच्या विविध मंडळांमधील घरांची सोडत 15 ऑगस्टपूर्वी काढण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. 

म्हाडा मंडळाच्या सर्व विभागांत 14 हजार 621 घरांची सोडत काढली जाईल. मुंबईत गिरणी कामगारांसाठी 5090 घरे, पुणे विभागात 20 टक्के कोट्यातील सुमारे 2000 घरे, अमरावती विभागात 1200, नागपूरमध्ये 891 घरे, औरंगाबाद विभागात 148 घरे, नाशिक विभागात 92 घरे आणि पंतप्रधान आवास योजनेंतर्गत कोकण विभागातील सुमारे 5300 घरांची सोडत काढली जाणार आहे. 

परवडणाऱ्या दरात मुंबईत घर घेणे शक्‍य नसल्यामुळे नागरिक म्हाडाच्या सोडतीची चातकासारखी वाट पाहत असतात; परंतु यंदा सामान्य मुंबईकरांच्या पदरी निराशाच पडणार आहे. 15 ऑगस्टपूर्वी निघणाऱ्या म्हाडाच्या सोडतीत मुंबईकरांच्या वाट्याला एकही घर येणार नाही. 

पत्रकार, सरकारी कर्मचाऱ्यांना खूशखबर? 
मुंबईतील पत्रकार, म्हाडा कर्मचारी आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरांचा प्रश्‍न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या मुद्द्यावर म्हाडाच्या पुढील बैठकीत निर्णय होईल. त्यासाठी म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती नेमण्यात आली आहे. या समितीत म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर, कोकण मंडळाचे सभापती बाळासाहेब पाटील यांचा समावेश आहे. घरांसाठी जागा कुठे उपलब्ध होईल; तसेच किती घरे बांधता येतील, या बाबी तपासून निर्णय घेतला जाईल, असे सामंत यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MHADA lottery before August 15