महाराष्ट्रापेक्षा कर्नाटकात इंधन स्वस्ताई

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 जुलै 2017

पेट्रोल नऊ रुपयांनी, डिझेल साडेतीन रुपयांनी स्वस्त : सीमाभागातील पंपांना फटका

म्हाकवे - पेट्रोल, डिझेलवरील एलबीटी रद्द करून आकारण्यात येणाऱ्या स्थानिक व दुष्काळ करामुळे महाराष्ट्रात इंधन महागले आहे. कर्नाटकात इंधन स्वस्त असल्याने कर्नाटक सीमेवरील व महामार्गावरील महाराष्ट्रातील पेट्रोल पंपांना याचा फटका बसला आहे. कर्नाटक सीमेवरील पेट्रोल पंपांवर महाराष्ट्रापेक्षा स्वस्त असे फलक लावण्यात आले आहेत. 

राज्यात एक ऑक्‍टोबरपासून पेट्रोल-डिझेलवरील एलबीटी रद्द करून डिझेलवर प्रतिलिटर दोन रुपये दुष्काळ कर आकारणी सुरू झाली. त्यामुळे ग्रामीण भागातही डिझेल आणि पेट्रोल महागले आहे. विविध स्थानिक करांमुळे लगतच्या कर्नाटक, आंध्र, मध्यप्रदेश, तेलंगणा, गुजरात, छत्तीसगड, गोवा या सात राज्यांपेक्षा महाराष्ट्रात सरासरी ३.५० रुपये प्रतिलिटर डिझेलचा तर पेट्रोलचा ९ रुपयांनी दर जास्त आहे. त्यामुळे राज्याच्या सीमेवर असलेल्या पेट्रोल पंपांच्या इंधन विक्रीत घट झाली आहे. राज्यात मुंबई विकास कर (स्टेट स्पेसिफिक सरचार्ज) म्हणून प्रतिलिटर तीन रुपये आकारणी होते. पुणे, नाशिक, औरंगाबाद व अहमदनगर या शहरात लष्करी छावणी असल्याने येथे इंधनावर एलबीटी व जकात वसुली आजही सुरू आहे. त्यातच या महिन्यापासून डिझेलवर दुष्काळ कर आकारणी सुरू करण्यात आल्याने शेजारच्या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात इंधनाचे दर वाढले आहेत.  

दरवाढीमुळे डिझेल विक्री शेजारच्या राज्यात स्थलांतरित होऊन हजारो कोटींचे नुकसान होण्याची भीती राज्यातील पेट्रोल पंप चालकांना आहे. महाराष्ट्रात इंधन दरवाढ झाल्यामुळे कर्नाटक सीमेवरील पेट्रोल पंपांच्या विक्रीत घट झाली आहे. 

दररोज तीन हजार लिटरने वाढ
कोल्हापूर जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर असणाऱ्या रांगा आता कमी होत असून सीमेवरील कर्नाटकातील पेट्रोल पंपांवरील इंधन विक्रीत दररोज तीन हजार लिटर पेट्रोलच्या विक्रीत वाढ झाली आहे. यातच या पंपचालाकानी आपल्याकडे कमी दरात पेट्रोल आणि डिझेल मिळत असल्याच्या गाडी फिरवून जाहिराती करण्यास सुरवात केली आहे.

पंपचालक चिंताग्रस्त
महाराष्ट्राच्या तुलनेत डिझेल गोव्यात प्रतिलिटर ५.५० रुपये, गुजरातमध्ये ३.६२, कर्नाटकात ३.५२, छत्तीसगडमध्ये ३.५३, आंध्रमध्ये १.८१ रुपये स्वस्त आहे. त्यामुळे इंधन विक्री व्यवसायावर परिणाम झाला असल्याचे पेट्रोल पंप चालकांचे म्हणणे आहे.

Web Title: mhakave maharashtra news fuel cheap in karnataka than maharashtra